आण्विक सरावाचे पुतीन यांचे आदेश, युद्ध ‘सर्वात धोकादायक टप्प्यावर’

0
पुतीन
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आण्विक सरावाच्या दुसऱ्या फेरीचे आदेश दिले आहेत

मंगळवारी युक्रेन युद्धाच्या निर्णायक टप्प्यावर रशियाच्या आण्विक सैन्याच्या नवीन सरावाला सुरुवात करण्याचे आदेश अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिले. मागील दोन आठवड्यांमध्ये  मॉस्कोने आयोजित केलेला हा दुसरा सराव आहे.
रशियन सैन्याची पूर्व युक्रेनमध्ये आगेकूच सुरू असून पश्चिम युक्रेनवर कब्जा कसा मिळवायचा याचा विचार आम्ही करत आहोत असे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या मते  गेली अडीच वर्ष सुरू असणारे युद्ध त्याच्या सर्वात धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहे.
जर अमेरिका आणि त्याचे मित्रपक्ष युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे सोडण्यास मदत करणार असतील तर मॉस्को त्याला प्रत्युत्तर देईल असा इशारा रशिया कित्येक आठवड्यांपासून पाश्चिमात्य देशांना देत आहे. तर नाटोच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियाने पश्चिम रशियात सैन्य पाठवले आहे.
“आम्ही बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांच्या व्यावहारिक प्रक्षेपणाबरोबरच अण्वस्त्रांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करू,” असे पुतीन या सरावाची घोषणा करताना एका व्हिडिओ क्लिपमध्ये सांगत असल्याचे बघायला मिळाले.
क्रेमलिनने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये पुतीन म्हणाले की, अण्वस्त्रांचा वापर करणे हा एक “अत्यंत अपवादात्मक उपाय” असेल परंतु ते वापरासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे.
“आम्ही त्यांच्या (अण्वस्त्रांच्या) सर्व घटकांमध्ये सुधारणा करत राहू. यासाठीची संसाधने उपलब्ध आहेत. मी यावर जोर देतो की आपण नवीन शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत सहभागी होणार नाही, मात्र आपण आवश्यक पर्यायांच्या पातळीवर आण्विक शक्ती कायम ठेवू,” असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या शहरांवर हल्ला करण्यास सक्षम असलेल्या यार या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या तुकडीचा समावेश यावेळच्या सरावात करण्यात आला असून मॉस्कोच्या वायव्येकडील ट्वेर प्रदेशात 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या सरावानंतर हा दुसरा सराव सुरू झाला आहे.
रशियाकडून अंतिम निर्णय घेणारे पुतीन यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आण्विक सिद्धांतात बदल करण्यास मान्यता दिली-ज्यात रशिया अशा शस्त्रांचा वापर करण्याचा विचार करू शकेल अशा अटी ठरवल्या आहेत.
या अटींनुसार,आण्विक शक्तीच्या जोरावर रशियावर केलेला कोणताही हल्ला हा संयुक्त हल्ला मानला जाईल- त्यामुळे युक्रेनला रशियावर पारंपरिक शस्त्रांनी हल्ला करण्यास मदत देऊ नये यासाठी अमेरिकेला दिलेला हा एक स्पष्ट इशारा आहे.
तणाव वाढला
रशियाकडे जगातील सर्वात मोठी अणुशक्ती आहे. रशिया आणि अमेरिकेचे एकत्रितपणे जगातील 88 टक्के अण्वस्त्रांवर नियंत्रण आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी युद्धादरम्यान रशियाच्या आण्विक स्थितीत कोणताही बदल पाहिला नाही.
मात्र 2022 मध्ये रशियाकडून सामरिक आण्विक शस्त्रांच्या संभाव्य वापराबद्दल अमेरिकेला इतकी चिंता वाटत होती की त्यांनी पुतीन यांना अशा शस्त्रांच्या वापराच्या परिणामांबद्दल इशारा दिला, असे केंद्रीय गुप्तचर संस्थेचे संचालक बिल बर्न्स यांनी सांगितले.
पाश्चिमात्य देशांना पतनशील आक्रमक म्हणून चित्रित करणारे पुतीन आणि रशियाला भ्रष्ट हुकूमशाही म्हणून चित्रित करणारे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन या दोघांनीही इशारा दिला आहे की  रशिया-नाटो संघर्षाची परिणती तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनीही अणुयुद्धाच्या धोक्याचा इशारा दिला आहे.
“वाढता भू-राजकीय तणाव तसेच नवीन बाह्य धोके आणि जोखीमांचा उदय लक्षात घेता, आधुनिक आणि सतत वापरण्यासाठी धोरणात्मक शक्तीने सज्ज असणे महत्वाचे आहे”, असे पुतीन म्हणाले.
पुतीन पुढे म्हणाले की, रशिया नवीन “स्थिर आणि मोबाईलवर-आधारित क्षेपणास्त्र प्रणालीं” कडे वाटचाल करत आहे, ज्यांचा प्रक्षेपण तयारीचा वेळ कमी असून त्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींवर मात करू शकतात.
नाटोच्या दाव्यानुसार उत्तर कोरियाच्या लष्करी तुकड्या रशियातील कुर्स्क प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जर उत्तर कोरिया रशियाच्या युद्धात सामील झाले तर अमेरिका युक्रेनच्या अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या वापरावर नवीन निर्बंध लादणार नाही, असे पेंटागॉनने सोमवारी सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स) 


Spread the love
Previous articleस्वावलंबन 3.0 चे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleLAC Patrolling To Resume Next Week: Diwali Sweets Exchange To Mark Fresh Thaw

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here