चौकशीला सुरुवात: संरक्षण मंत्रालयात मोठ्या फेरबदलांची शक्यता
दि. १४ मे: रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी त्यांच्या नव्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयातील कथित भ्रष्टाचाराच्या निर्मुलानाकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याची चिन्हे रशियाच्या संरक्षण मंत्रालयात घडलेल्या ताज्या घटनेवरून निदर्शनास येत आहेत. त्याच मालिकेत मंगळवारी आणखी एक पाऊल पुढे टाकत भ्रष्टाचारविरोधी पथकाने रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील मानव संसाधन विभागाचे प्रमुख युरी कुझ्नेस्तोव यांना अटक केली. कुझ्नेस्तोव यांनी काही प्रकरणात मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचा संशय आहे.
रशियाच्या भ्रष्टाचार विषयक चौकशी समितीने दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयातील मानव संसाधन विभागाचे प्रमुख युरी कुझ्नेस्तोव यांनी काही प्रकरणात मोठ्या प्रमाणात लाच घेतल्याचे समोर आले आहे. कुझ्नेस्तोव यांनी नक्की कोणत्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केले अथवा लाच घेतली याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात रशियाचे संरक्षण उपमंत्री तिमूर इवानोव यांचाही समावेश आहे. त्यांना लाचप्रकरणी २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. तर, सोमवारी अचानक रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगु यांची अनपेक्षितपणे उचलबांगडी करण्यात आली. शोईगु यांच्याकडे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्या जागी आंद्रेई बेलौसोव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेलौसोव यांच्याकडे लष्करी अनुभव नाही. ते अर्थतज्ज्ञ असून, त्यांच्याकडे आधी नव्याने सत्तेवर आलेल्या पुतीन यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी होती. पुतीन यांच्या या नव्या मंत्रिमंडळाला अद्याप रशियाच्या संसदेची मान्यता मिळाली नाही. त्यांनी काम पहिले आहे.
रशियन लष्कराच्या आठव्या संचालनालयाचे मानव संसाधन प्रमुख असलेल्या कुझ्नेस्तोव यांच्याविरोधात गेल्या चार वर्षांपासून चौकशी सुरु आहे. त्यांनी काही व्यावसायिकांच्या अवाजवी लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून लाच स्वीकारल्याचे २०२१-२०२३ दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे, असे चौकशी समितीने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून रशियाच्या संरक्षण मंत्रालयात काही आलबेल नसल्याची चिन्हे दिसत होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला दोन वर्षे होऊन गेली. मात्र, अद्यापही या युद्धाचा निर्णय रशियाच्या अपेक्षेप्रमाणे झाला नाही. उलट, काही वेळा युक्रेन वरचढ झाल्याचे पाहायला मिळाले. रशियन लष्करी अधिकाऱ्यांचा युक्रेनच्या ताकदीबाबतचा अंदाज चुकल्यामुळेच रशियाला ही नामुष्की स्वीकारावी लागल्याचे जागतिक समुदायाचे मत आहे. रशियन लष्करी अधिकाऱ्यांवर या मुळेच पुतीन यांची वक्रदृष्टी वळल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांची उचलबांगडी आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला झालेली अटक या घटनांचा युक्रेन विरोधातील युद्धावर कोणताही परिणाम होणार नाही, असे रशियाच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘क्रेमलिन’मधील सूत्रांनी म्हटले आहे.
विनय चाटी
(‘रॉयटर्स’च्या ‘इनपुट्स’सह)