स्वीडिश लष्कराचा दावा: बाल्टिक समुद्रात ओलांडली सीमा
दि. १५ जून: युक्रेनवर लादलेल्या युद्धामुळे जागतिक समुदायाने वाळीत टाकलेल्या रशियाने पुन्हा कागली करताना शुक्रवारी स्वीडनची हवाईहद्द ओलांडल्याचा दावा स्वीडिश लष्कराने केला आहे. स्वीडनच्या हवाईदलाच्या लढाऊ विमानांशी रशियाच्या विमानांची गाठ पडताच रशियन विमाने पुन्हा रशियाच्या हद्दीत परतली, असे स्वीडिश लष्कराकडून शनिवारी सांगण्यात आले.
रशियन हवाईदलाच्या एसयू-२४ या लढाऊ विमानांनी शुक्रवारी बाल्टिक समुद्राच्या पूर्वेला असलेल्या गोटलँड बेटांजवळ स्वीडनची हवाईहद्द ओलांडली. रशियाने आपल्या हवाई हद्दीचा भंग केल्याचे लक्षात येताच स्वीडनच्या लष्करी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने त्यांना परत जाण्याचा इशारा दिला. मात्र, रशियाच्या विमानांनी हवाई नियंत्रण कक्षाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी दोन ग्रीपेन ही लढाऊ विमाने पाठविण्यात आली. स्वीडनच्या विमानाशी सामना होताच रशियन विमाने पुन्हा रशियाच्या हवाई हद्दीत परतली, असे स्वीडिश लष्कराकडून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रशियाचे हे कृत्य अनाकलनीय आणि अस्वीकारार्ह आहे. रशियाला आमच्या क्षेत्रीय अखंडतेबद्दल जराही आदर नाही, हेच त्यांच्या कृत्यातून सिद्ध होते, असे स्वीडनचे हवाईदलप्रमुख जोनास विक्मन यांनी म्हटले आहे. आम्ही हा सगळ्या घटनाक्रमाचे बारकाईने निरीक्षण केले आहे आणि त्याला उत्तरही दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. स्वीडन हा उत्तर अटलांटिक क्षेत्रीय सहकार्य संघटनेत (नाटो) नव्याने सहभागी झाला असून, त्याच्या सहकारी देशांबरोबर स्वीडनकडून बाल्टिक समुद्रात नौदल सराव करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर रशियाकडून हे कृत्य करण्यात आले आहे.
रशियाकडून २०२२मध्येही स्वीडनच्या हवाईहद्दीचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यावेळी गोटलँड बेटांजवळची हवाईहद्द ओलांडून रशियाच्या दोन एसयू-२७ आणि दोन एसयू-२४ या विमानांनी स्वीडनमध्ये प्रवेश केला होता. स्वीडनचा शेजारी असलेल्या फिनलंडनेही रशियाने आपल्या हवाईहद्दीचा १० जून रोजी भंग केल्याचा संशय व्यक्त केला आहे. स्वीडनने नुकतीच रशियाच्या आक्रमणाविरुद्ध झुज देत असलेल्या युक्रेनला आर्थिक आणि लष्करी मदत पुरविली होती. त्यामुळे रशियाने हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)