तैवानचे अध्यक्ष लाई चिंग ते यांचा चीनवर पुन्हा आरोप
दि. १६ जून: जगाच्या नकाशावरून तैवानला संपविणे हे चिनी साम्यवादी पक्षाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा आरोप तैवानचे अध्यक्ष लाई चिंग ते यांनी केला आहे. तैवानच्या राष्ट्रीय लष्करी अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या छात्रांशी ते बोलत होते. ‘आपण आपला खरा शत्रू कोण आहे हे ओळखले पाहिजे आणि त्याच्याशी सामना करण्याचा असेल तर पराभूत मनोवृत्तीचा त्याग केला पाहिजे,’ असेही लाई यांनी छात्रांना सांगितले.
तैवानच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत लाई यांचा विजय झाल्यापासूनच चीनकडून तैवानवर लष्करी आणि राजनैतिक दबाव वाढविण्याचे सत्र सुरु करण्यात आले आहे. लाई यांची चिनी साम्यवादी पक्षाकडून फुटीरतावादी अशा शब्दांत संभावना केली जाते. लाई यांनीही अध्यक्षपदी शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात चीन आणि तैवान हे दोन वेगळे देश असल्याचे प्रतिपादन केले होते आणि तैवानच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ तैवानी जनतेला आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर चीनशी चर्चा करण्याबाबत त्यांनी सातत्याने भूमिका मंडळी होती. मात्र, चीनकडून लाई यांनी दिलेला चर्चेचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला होता. लाई यांच्या या भूमिकेमुळे त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याच्या उद्देशाने चीनकडून तैवानच्या खाडीच्या परिसरात अत्यंत आक्रमक असा युद्धसरावही करण्यात आला होता.
तैवानच्या व्हाम्पोआ लष्करी अकादमीच्या शताब्दी सोहोळ्यात बोलताना लाई यांनी, नव्या जगाची आव्हाने काय आहेत हे छात्रांनी ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. तैवानमधील प्रतिष्ठित मानली जाणारी ही लष्करी अकादमी तैवानच्या दक्षिणेला असलेल्या कोहसिउंग येथे आहे. ‘चीनचा एक शक्तिशाली देश म्हणून झालेला उदय हे तैवानसाठी सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे तैवानच्या खाडीतील जैसे थे स्थितीला सुरुंग लागत आहे आणि ‘रिपब्लिक ऑफ चायना’ला (तैवानचे अधिकृत नाव) संपविणे आणि त्याला चीनशी जोडून घेणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे,’ असा आरोप लाई यांनी केला. तैवानी छात्रांनी तैवानला संलग्न करून घेण्याचा चीनचा डाव हाणून पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ तैवानी लष्करी अधिकारी आणि अमेरिकी राजनैतिक अधिकारी नील गिब्सन उपस्थित होते.
चीनच्या तैवानविषयक कार्यालयाने लाई यांच्या या विधानाबाबत अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, चिनी राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी तैवानचे चीनशी संलग्नीकरण ही ऐतिहासिक गरज आहे, असे चिनी साम्यवादी पक्षातील चौथ्या क्रमांकाचे नेते वँग हुनिंग यांनी शनिवारी ‘सॅटर्डे फोरम’मध्ये बोलताना सांगितले. तसेच फुटीरतावाद्यांकडून रचण्यात आलेले सर्व कट आम्ही उद्ध्वस्थ करू, असेही ते म्हणाले. तैवानने अधिकृतपणे आपले स्वतंत्र जाहीर केल्यास त्यांनी चीनला आक्रमणासाठी आमंत्रित केल्याचे समजून चीनकडून त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)