युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा दावा
दि. २५ मे: घुसखोर रशियन फौजांना खार्कीव्हमधून पिटाळून लावल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. युक्रेनच्या खार्कीव्ह विभागाच्या उत्तर भागात घुसखोरी केलेल्या रशियन फौजांना युक्रेनच्या सैन्याने पिटाळून लावले असून, त्या भागावर युक्रेनी सैन्याचा पूर्ण ताबा असल्याचे झेलेन्स्की यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. रशियाने काही दिवसांपूर्वी या भागाचा ताबा घेतला होता.
खार्कीव्ह हे युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर मानले जाते. लष्करी दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे शहरावर पुन्हा ताबा मिळविल्याचा झेलेन्स्की यांचा दावा महत्त्वाचा मानला जात आहे. खार्कीव्हमधील लष्करी आणि विभागीय अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी हा दावा केला आहे. मात्र, रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आणि झेलेन्स्की यांच्या दाव्यात तफावत असल्याचे ‘रॉयटर्स’च्या वृत्तात म्हटले आहे. रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘ड्युमा’चे सदस्य विक्टर वोडोलास्त्स्की यांनी झेलेन्स्की यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. युक्रेनच्या सीमेच्या पाच किलोमीटर आत असलेल्या वोव्चान्स्क या शहराच्या निम्य्याहून अधिक भागावर रशियाचा ताबा आहे. एकदा हे शहर ताब्यात आले, की रशियन फौजा युक्रेनच्या तीन मुख्य शहरांवर लक्ष केंद्रित करतील. युक्रेनच्या पूर्व दोनेत्स्क भागातील स्लोविंस्क, क्रमातोरस्क आणि पोक्रोव्स्क ही ती तीन शहरे आहेत, असे त्यांनी रशियाच्या ‘तास’ (टीएएएस) या वृत्तसंस्थेला सांगितले. मात्र, दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्याची पुष्टी होऊ शकली नाही.
रशियाच्या फौजांनी या महिन्याच्या सुरुवातीला खार्कीव्हमध्ये प्रवेश केला होता आणि या शहरातील १२ विभागांवर ताबा मिळविला होता, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. मात्र, या भागात स्थैर्य प्रस्थापित केल्याचा दावा झेलेन्स्की आणि युक्रेनचे लष्करी अधिकारी करीत आहेत. ‘वोव्चान्स्कमधील परिस्थिती तणावपूर्ण मात्र संरक्षणदलांच्या नियंत्रणात आहे, असे युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी शुक्रवारी रात्री माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. रशियाच्या लष्कराने आज, शनिवारी वोव्चान्स्कवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान आठ ‘गायडेड बॉम्ब’ शहरावर पडले. खार्कीव्हच्या उत्तर भागावरही किमान दोन हवाई हल्ले रशियाकडून करण्यात आले आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. रात्री उशिरा त्यांनी या हल्याची माहिती दिली असून, युक्रेनच्या सैन्याने रशियाने या भागावर केलेले दहा हल्ले परतवून लावले आहेत,असे त्यांनी सांगितले. तर, खार्कीव्हच्या पूर्वेला असलेल्या कुपिंस्क शहराजवळ असलेल्या काही भागात रशियाच्या फौजांना काही प्रमाणात यश मिळाल्याचे त्यांनी मान्य केले. दोनेत्स्क शहराच्या दक्षिण भागात असलेल्या पोक्रोव्स्क शहरात तुंबळ युद्ध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. युक्रेनच्या फौजांनी वोव्चान्स्कमधील आपले मोर्चे अधिक मजबूत केले आहेत. त्यांना हुसकावून लावण्यासाठी रशियन फौजांनी तोफांचा मारा सुरु केला आहे. मात्र, तो म्हणावा तसा अचूक नाही, असे युक्रेनच्या मिलिटरी ब्लॉगरनी म्हटले आहे.
विनय चाटी
(रॉयटर्स)