रशियन सैन्याने बुधवारी युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी आणि मध्यवर्ती भागातील क्रोपिव्नीत्स्की या दोन शहरांवर अनेक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ऊर्जेच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, असे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ले
रशियाने रात्रभरात मारा केलेल्या 52 पैकी 46 ड्रोन युक्रेनच्या हवाई दलाने यशस्वीरित्या अडवले. युक्रेनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने तीन मार्गदर्शित हवाई क्षेपणास्त्रांचाही वापर केला, अर्थात तीनही क्षेपणास्त्रे त्यांच्या लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरली. ड्रोन हल्ले प्रामुख्याने सुमी शहराला लक्ष्य करून केले गेले. तिथल्या ऊर्जानिर्मितीच्या पायाभूत सुविधांवर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे, ज्यामुळे युक्रेनला बॅक-अप ऊर्जा प्रणालींचा वापर करावा लागला.
सुमीमधील अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार या प्रदेशात 16 ड्रोन पाडण्यात आले. सध्या युक्रेनचा वीजपुरवठा विस्कळीत करणे हे रशियाचे प्रमुख लक्ष्य आहे.
क्रोपिव्नीत्स्कीमधील जीवितहानी आणि नुकसान
युक्रेनच्या मध्य किरोव्होहराद प्रदेशात असलेल्या क्रोपिव्नीत्स्कीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक 90 वर्षीय महिला जखमी झाली. या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींचे नुकसान झाले, परंतु कीवच्या आसपासच्या भागात कोणत्याही महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर परिणाम झाला नाही कारण या ठिकाणी हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली.
युक्रेनची हिवाळी तयारी आणि सध्या सुरू असलेल्या हल्ले
जसजसा हिवाळा जवळ येत आहे, युक्रेन या महिन्यांसाठी त्याच्या ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांची तयारी करत आहे. युक्रेनचे उपपंतप्रधान ओलेक्सी कुलेबा यांनी सुमीच्या ऊर्जाविषयक सुविधांचे संरक्षण करणे आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा बळकट करणे यासाठी समन्वय मुख्यालय स्थापन करण्याची घोषणा केली.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने संपूर्ण ताकदीनिशी आक्रमण सुरू केल्यापासून रशिया युक्रेनच्या ऊर्जाविषयक प्रणालीला सातत्याने लक्ष्य करीत आहे. युक्रेनी अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की या हल्ल्यांचा हेतू हिवाळ्याच्या हंगामापूर्वी देशाचा वीजपुरवठा कमकुवत करणे हा आहे.
युक्रेनचा रशियन लक्ष्यांवर प्रतिहल्ला
युद्धआघाडीवर, युक्रेनच्या एसबीयू राज्य सुरक्षा सेवेने ट्वेर प्रदेशातील रशियन लष्करी गोदामावर यशस्वी ड्रोन हल्ले झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या हल्ल्यात क्षेपणास्त्रे, मार्गदर्शित बॉम्ब आणि तोफांसाठी आवश्यक दारूगोळा नष्ट झाला आहे. यामुळे रशियन सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.
रेशम
(रॉयटर्स)