23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यापूर्वी, रशिया आणि भारत यांच्यातील सागरी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी रशियाचे नौदल प्रमुख भारत भेटीवर आले आहेत. 19 ते 22 ऑगस्ट या कालावधीत अधिकृत दौऱ्यावर आलेल्या ॲडमिरल अलेक्झांडर अलेक्सेविच मोईसेयेव्ह यांनी सोमवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली.
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संबंधांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या रशिया आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य गटासोबत आपली दीर्घकालीन संतुलित धोरणात्मक संबंध राखण्याचा भारत एकीकडे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे चीन आणि रशिया यांच्यातील वाढत्या धोरणात्मक युतीबाबतही भारताला चिंता आहे.
ॲडमिरल मोईसेयेव आणि जनरल चौहान यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेमध्ये सागरी सुरक्षा वाढवणे, धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करणे आणि दोन्ही देशांमधील मजबूत संरक्षण भागीदारीला चालना देण्याच्या परस्पर वचनबद्धतेला अधोरेखित करण्यात आल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे सांगण्यात आले.
रशियन नौदल प्रमुखांनी भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांची भेट घेतली. दोन्ही नौदलांमधील सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी सहयोगी यंत्रणा आणि उपाययोजना यांवर चर्चा करण्यात आली.
ही भेट रशिया आणि भारताच्या नौदलांमधील दीर्घकालीन संबंधांची साक्ष आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल संबंध मजबूत करणे तसेच नौदल सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधणे हा आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
रशियन नौदल प्रमुख मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड आणि माझगाव डॉकचाही दौरा करणार आहेत. रशिया भारतासाठी दोन मार्गदर्शित-क्षेपणास्त्र फ्रिगेट्स तयार करण्याच्या प्रक्रियेत असताना ही भेट होत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे, भारतीय हवाई दलासाठी या फ्रिगेट्स आणि पाच S-400 ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या उर्वरित दोन स्क्वॉड्रन्सच्या वितरणात लक्षणीय विलंब झाला आहे. यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
टीम भारतशक्ती