रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या व्हिएतनाम दौऱ्यात महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

0
रशियाचे
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन 20 जून 2024 रोजी व्हिएतनामच्या हनोई येथील सरकारी कार्यालयात छायाचित्रासाठी पोज देताना. (रॉयटर्सतर्फे लुंग थाई लाइन/पूल)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उत्तर कोरिया आणि व्हिएतनाम अशा दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. काल कम्युनिस्ट व्हिएतनाममध्ये त्यांचे आगमन झाले. हा त्यांचा पाचवा राजकीय दौरा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामची राजधानी हनोई येथे पोहोचल्यानंतर व्हिएतनामचे उपपंतप्रधान ट्रान हाँग हा आणि आग्नेय आशियाई देशाचे सर्वोच्च मुत्सद्दी ले होई ट्रुंग यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. व्हिएतनाम हा रशियाचा जुना भागीदार असून विविध विषयांवरील संबंध वाढवण्यासाठी पुतीन या देशाच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्याचा भर प्रामुख्याने व्यापार, ऊर्जा, शिक्षण, सुरक्षा, गुंतवणूक आणि आण्विक तंत्रज्ञानावर आहे. रशिया आणि व्हिएतनामही वादग्रस्त साऊथ चायना सीमध्ये नैसर्गिक वायूचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनमधील संघर्षावरून पाश्चिमात्य देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले असल्याने या भेटीचा मुख्य उद्देश पर्यायी देयक पद्धती असा आहे. दोन्ही देश स्थानिक चलनांमध्ये म्हणजेच रुबल आणि डोंगमध्ये व्यवहार करण्यासाठी एकाच यंत्रणा वापरण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. याआधी रशियाने भारत आणि चीनशी याच मुद्द्यावर करार केला आहे.

युक्रेनमधील संघर्षावरून व्हिएतनामच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचे पुतीन यांनी कौतुक केले आहे. पुतीन यांच्या व्हिएतनाम दौऱ्यावरून अमेरिकेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही देशाने पुतीन यांना व्यासपीठ देऊ नये आणि त्यांना त्यांच्या अत्याचारांबाबत (युक्रेनमध्ये) स्पष्टीकरण देण्याची मुभा देऊ नयेत, असे अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे. तर दुसरीकडे देश संतुलित परराष्ट्र धोरणाचे पालन करतो आणि तो कोणत्याही मोठ्या शक्तीच्या बाजूने झुकणारी नाही हे या भेटीतून दिसून येते असे सांगून व्हिएतनामने या भेटीबाबत बचावात्मक धोरण अवलंबले आहे. व्हिएतनामच्या परराष्ट्र धोरणाला ‘बांबू मुत्सद्देगिरी’ असे संबोधले गेले आहे, कारण हे धोरण बांबू सारखे लवचिक असून ते न मोडता बदलू शकते. गेल्या वर्षी दक्षिण पूर्व आशियाई उत्पादन क्षेत्रातील या दिग्गज देशाने अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचेही आपल्या देशात स्वागत केले होते.

रशिया आणि व्हिएतनाम यांच्यात दीर्घ आणि निकोप संबंध आहेत. तत्कालीन उत्तर व्हिएतनामशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या देशांपैकी सोव्हिएत रशिया हा एक देश होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये सोव्हिएत युनियनने उत्तर व्हिएतनामला अमेरिका आणि त्याआधी फ्रान्सविरुद्धच्या युद्धात मोठ्या प्रमाणात मदत केली होती. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी रशिया आणि व्हिएतनाम यांच्यात झालेल्या कराराला यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षातील कथित युद्ध गुन्ह्यांसाठी पुतीन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे पुतीन यांच्यासाठी रशियाबाहेर जाण्याची ही एक दुर्मिळ संधी आहे. आयसीसीच्या निकालावर स्वाक्षरी करणाऱ्या कोणत्याही देशाला पुतीन यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात प्रवेश केल्यास त्यांना अटक करणे बंधनकारक आहे. व्हिएतनाम मात्र आयसीसीचा  सदस्य नाही.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleRussian President Putin Visits Vietnam, Inks Key Agreements
Next articleइस्रायलला शस्त्रे देण्यात अमेरिकेची चालढकल : नेतान्याहूंचा दावा तर अमेरिकेची तीव्र नाराजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here