भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांनी पदभार स्वीकारला

0
शिवमणी
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी 

महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) 26 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.   संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांनीं आपल्या साडेतीन दशकांहून अधिक काळातील गौरवशाली कारकिर्दीत विविध पदांवर काम केले आहे. ते दिशादर्शन आणि संचालन यातील तज्ज्ञ असून त्यांच्या सागरी जबाबदारीत भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व प्रमुख नौकांवर त्यांनी काम केले आहे.

फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांनी तटरक्षक क्षेत्र (पूर्व), तटरक्षक क्षेत्र (पश्चिम), तटरक्षक दल कमांडर इस्टर्न सी बोर्ड इथले प्रमुखपद भूषवले आहे. ते नॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत.

परमेश शिवमणी यांना सप्टेंबर 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना तटरक्षक दल मुख्यालय, नवी दिल्ली येथे नियुक्त करण्यात आले. महासंचालक राकेश पाल यांच्या अकाली निधनानंतर शिवमणी यांच्याकडे ऑगस्ट 2024 मध्ये तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

या कालावधीत त्यांनी अनेक मोहिमा आणि सराव पूर्ण केले. यात मादक द्रव्य/अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती आणि किनारी सुरक्षा सरावादरम्यान मानवतावादी साहाय्य, तीव्र चक्रीवादळात खलाशांची सुटका, परदेशी तटरक्षक दलांसोबत संयुक्त सराव, प्राण्यांच्या तस्करीविरोधात कारवाई, यांचादेखील यात समावेश आहे.

फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल 2014 मध्ये तटरक्षक  पदक आणि 2019 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक प्रदान करण्यात आले. त्यांना 2012 मध्ये डीजी तटरक्षक दल प्रशंसा  आणि 2009 मध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पूर्व) प्रशंसा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहेत.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleमध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती
Next articleMillion More Eager to Join Army, North Korea Claims

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here