सौदी अरेबिया: मदीना जवळील बस दुर्घटनेत 42 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू

0
सौदी अरेबिया

गल्फ न्यूज आणि सौदी अरेबियाच्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मक्का ते मदीना असा प्रवास करणाऱ्या एका बसची डिझेल टँकरला जोरदार धडक बसली, यामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 42 भारतीय यात्रेकरू जे उमराह तीर्थयात्रा करुन परतत होते, त्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. हा भीषण अपघात आज (सोमवार, 17 नोव्हेंबर 2025) पहाटे घडला.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही बस दुर्घटना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1.30 च्या सुमारास, सौदी अरेबियातील मुफ्रिहात जवळ, म्हणजे मदीनापासून अंदाजे 160 किलोमीटर अंतरावर घडली. उमराह तीर्थयात्रा पूर्ण करून परतत असताना भारतीय यात्रेकरूंचा हा समूह, ज्यात प्रामुख्याने तेलंगणाच्या हैदराबादमधील नागरिकांचा समावेश होता, तो या दुर्घटनेला बळी पडला.

खलीज टाईम्सच्या हवाल्याने एनडीटीव्हीने सांगितले की, डिझेल टँकरला धडक बसल्यानंतर बसमध्ये भीषण आग लागली, यावेळी अनेक प्रवासी झोपलेले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची फारशी संधी मिळाली नाही.

सुरुवातीच्या अनधिकृत अहवालांनुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे, तर काही सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मृतकांमध्ये 11 महिला आणि 10 लहान मुले असू शकतात. सौदी अरेबियातील अधिकारी अद्याप, नेमक्या आकडे पडताळणी करण्याचे आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

सरकारची प्रतिक्रिया

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी, या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आणि सांगितले की, “रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास पीडित कुटुंबांना पूर्ण मदत करत आहेत. त्यांनी पीडितांप्रति संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.”

तेलंगणा सरकारने सांगितले आहे की, ‘ते सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत आहेत. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना, वेळोवेळी घटेनेचे ताजे अपडेट्स देण्याचे आणि मदत कार्य सुलभ करण्यासाठी मिशनसोबत जवळून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.’

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी, या बसमध्ये 42 प्रवासी असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली, आणि ते रियाधमधील भारतीय दूतावासाचे उप-मिशन प्रमुख अबू मथेन जॉर्ज यांच्या संपर्कात असल्याचे, त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी केंद्र सरकारला मृतांचे पार्थिव भारतात परत आणण्याची आणि बचावलेल्या लोकांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवण्याची विनंती केली आहे.

हेल्पलाईन कार्यान्वित

दुर्घटनेनंतर, जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने माहिती आणि शोध घेत असलेल्या कुटुंबांसाठी, 24×7 नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित केली आहे. सोबतच, 800244003 हा टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleअ‍ॅडमिरल त्रिपाठी यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे संयुक्त उपक्रमांना मिळाली चालना
Next articleArmy Chief Warns Pakistan, Says Operation Sindoor Was ‘Just a Trailer’; Notes Major Thaw on LAC With China

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here