भारताच्या सीमांचे रक्षण करणे याला कायमच प्राधान्य आहे आणि त्यासाठी कोणतीही तडजोड नसल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी क्वालालंपूर येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना केले.
‘सीमा सुरक्षित ठेवणे हे भारतीयांप्रती माझे पहिले कर्तव्य आहे. मी त्यात कधीही तडजोड करू शकत नाही. चीनसोबत अजूनही आमच्या वाटाघाटी सुरू आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत माझा संवाद सुरू आहे, त्यासाठी आम्ही वेळोवेळी भेटत असतो, याशिवाय दोनही देशांचे लष्करी अधिकारी एकमेकांशी वाटाघाटी करत आहेत. पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की आमच्यात एक करार झाला होता ज्याद्वारे जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे, त्यावर सैन्य न आणण्याची परंपरा आहे. आपल्या दोघांचेही तळ काही अंतरावर आहेत जे आपले पारंपरिक तैनातीचे ठिकाण आहे आणि आम्हाला ती सामान्य स्थिती परत हवी आहे. सैन्य तैनात करण्याच्या बाबतीत आपण जिथे होतो तिथे परतणे हा संबंध पुढे नेण्याचा आधार असेल. आणि याबाबत आम्ही चीनशी अतिशय प्रामाणिकपणे चर्चा करीत आहोत,” असे जयशंकर म्हणाले.
जयशंकर यांच्या क्वालालंपूर येथील भेटीच्याच दिवशी, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमधील वादावर चर्चा करण्यासाठी भारत आणि चीनचे राजनैतिक अधिकारी भेटले.
भारत चीन सीमांबाबत सल्लामसलत आणि समन्वयासाठी चीनची राजधानी बीजिंगमध्ये 29वी बैठक बुधवारी पार पडली.
दोन्ही बाजूंनी शांततेसाठी कोणते प्रयत्न करावेत आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्यांचे निराकरण कसे करावे यावर बैठकीत विचार विनिमय झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली.
गलवान, पँगॉन्ग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनारी, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स येथून सैन्य माघारी झाली असली तरी, दोन फ्रिक्शन पॉईंट – डेपसांग आणि डेमचोक – येथील सैन्य माघारी अजूनही झालेली नाही.
चर्चेच्या या ताज्या फेरीनंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात पूर्ण माघार घेण्याबाबत अस्पष्टता असल्याचे दिसून आले. मुत्सद्देगिरी आणि लष्करी अधिकारी स्तरावरील चर्चेतून नियमित संपर्कात राहण्याची तसेच विद्यमान द्विपक्षीय करार आणि राजशिष्टाचाराला अनुसरून सीमावर्ती भागात शांतता राखण्यावर या बैठकीत सहमती झाल्याचे चीनकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटले आहे.
2020 मध्ये पूर्व लडाख आणि गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत.
त्यावेळी झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. चीनचे किती सैनिक मारले गेले याबद्दल चीनकडून कोणतीही अधिकृत कबूली दिली गेली नसली तरी माध्यमांच्या वृत्तानुसार ही संख्या 40 किंवा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत आणि चीनमधील सीमेवर असणारी शांतता आणि शांतता करार मोडून काढले. अनेक दशकांत प्रथमच त्यावेळी सीमेवर रक्तपात झाला.
“दुर्दैवाने 2020 मध्ये हे करार नेमक्या कोणत्या कारणांमुळे मोडले गेले आणि प्रत्यक्षात सीमेवर हिंसाचार आणि रक्तपात का झाला त्याबद्दल आम्ही अजूनही अनभिज्ञ आहोत,” असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर म्हणाले.
आतापर्यंत दोन्ही बाजूंनी लष्करी पातळीवर चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत, त्यातील शेवटची बैठक 19 फेब्रुवारी रोजी झाली होती.
चीन द्विपक्षीय संबंधांमधील इतर पैलू सुधारण्यासाठी उत्सुक असताना, भारत मात्र सीमेवरील परिस्थिती जोवर सामान्य होत नाही तोवर संबंधही सामान्य होऊ शकत नाहीत यावर ठाम आहे.
सुब्रत नंदा