तियानमेन स्वेअर … 4 जून 1989 …. निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष गोळीबार करत त्यांना रणगाड्यांखाली चिरडले गेले. यंदा या घटनेला 35 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनमधील सुरक्षा कडक केली गेली. याशिवाय मंगळवारी बीजिंगच्या तियानमेन चौकात कोणत्याही व्यक्तीसाठी प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. चीन व्यतिरिक्त इतरत्रही कार्यकर्ते हा स्मृतीदिन साजरा करण्याच्या तयारीत असल्याने हाँगकाँगनेही सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची संख्या वाढवली आहे.
तियानमेन हा अजूनही चीनसाठी निषिद्ध विषय
विद्यार्थी आणि कामगारांकडून अनेक आठवड्यांपासून सुरू असणाऱ्या निषेधाचा अंत करण्यासाठी 4 जून 1989 रोजी पहाटेपूर्वीच चिनी रणगाडे या चौकातील आंदोलनकर्त्यांवर चालवले गेले. या लष्करी दडपशाहीनंतर अनेक दशके उलटून गेली तरी कार्यकर्त्यांचे म्हणण्यानुसार या निदर्शनांची मूळ उद्दिष्टे-ज्यात मुक्त पत्रकारिता आणि भाषण स्वातंत्र्याचा समावेश होता-अजूनही दूर आहेत. 4 जून हा अजूनही चीनमध्ये निषिद्ध विषय आहे.
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने कधीही मृतांची संख्या जाहीर केली नाही. मात्र, कार्यकर्ते आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार ही संख्या हजारोंच्या घरात असू शकते.
तियानमेनची स्मृती नाहीशी होणार नाही : तैवानचे अध्यक्ष
तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांनी एका निवेदनात म्हटले आहे की “4 जूनची स्मृती इतिहासाच्या प्रवाहात नाहीशी होणार नाही”. लाई पुढे म्हणाले की तैवान “चीनच्या हुकूमशाहीला स्वातंत्र्याने प्रतिसाद देईल.”
तियानानमेन टॉवरच्या अधिकृत वेबसाइटवर यापूर्वीच चौकाकडे जाणारे सर्व रस्ते 4 जून रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील अशी सूचना पोस्ट केली आहे. ज्यांनी भेट देण्यासाठी आधीच तिकिटे खरेदी केली होती, त्यांना पैसे परत मिळू शकतात.
बीजिंग सबवे नेटवर्कनेही घोषणा केली की तियानमेन पूर्व स्थानकात बाहेर पडण्याचे मार्ग 2 ते 5 जूनपर्यंत बंद केले जाईल.
“शांतता प्रस्थापित” करणाऱ्या स्वयंसेवकांचे लहान गट गेल्या आठवड्यापासून मध्य बीजिंगमधील परिसरावर लक्ष ठेवून आहेत. पादचारी पुलांवरही पहारेकरी तैनात केले गेले आहेत. ही राजकीयदृष्ट्या संवेदनशील काळात अमलात आणली जाणारी नियमित प्रथा आहे.
चिनी अधिकारी गप्प, चीनमधील सोशल मीडिया प्रोफाईल्सही नियंत्रणाखाली
ऑनलाइन पोस्ट आणि रॉयटर्सच्या अहवालानुसार, वी चॅट आणि डुयिनसह इतर चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते त्यांचे प्रोफाइल फोटो बदलू शकले नाहीत.
“पस्तीस वर्षे उलटली आहेत आणि अजूनही अधिकारी गप्प आहेत. इंटरनेटवर फक्त ‘चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संक्षिप्त इतिहास’ दिसतो. त्यात असे म्हटले आहे की 1989 मधील विद्यार्थी चळवळीमुळे एक दुःखद घटना घडली होती.”
असे तियानमेनमध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या मातांनी लिहिले आहे. चीनमधील तियानानमेन हल्ल्यातील पीडितांच्या आणि त्यातून बचावलेल्यांच्या कुटुंबांचा गट आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्स)