इस्रायली हल्ल्यांदरम्यान शारा यांनी ड्रूझ नागरिकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले

0

सीरियाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष अहमद अल शारा यांनी, गुरुवारी सांगितले की, “इस्रायलने दक्षिण सीरियामध्ये ड्रूझ समुदायावर हल्ला करणाऱ्या सीरियन सैन्याचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली असली, तरी ड्रूझ नागरिकांची सुरक्षा व त्यांचे हक्क हे आपले सर्वोच्च प्राधान्य राहील.”

दमास्कसवर झालेल्या शक्तिशाली इस्रायली हवाई हल्ल्यांनंतर आपल्या पहिल्या दूरचित्रवाणी संदेशात, शारा यांनी ड्रूझ नागरिकांना उद्देशून सांगितले की: “तुम्हाला बाहेरील शक्तीच्या हातात सोपवण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा आम्ही स्पष्टपणे विरोध करतो.”

“आम्ही युद्धाला घाबरणाऱ्यांपैकी नाही. आम्ही संपूर्ण आयुष्य संकटांचा सामना करत आमच्या लोकांचे रक्षण करत आलो आहोत. मात्र आम्ही अराजकता आणि विनाशाला नव्हे तर, कायमच सीरियन जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी हेही नमूद केले की, “जर सीरियन जनतेचा स्वाभिमान धोक्यात आला, तर ते लढण्यासाठी तयार आहेत.”

राष्ट्राध्यक्ष भवनावर हल्ला

इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये, सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाचा भाग उडवून टाकण्यात आला आणि राष्ट्राध्यक्ष भवनाजवळही हल्ला करण्यात आला, कारण इस्रायलने ड्रूझ समुदायावर हल्ले करणाऱ्या सरकारी दलांचा नाश करण्याचा इशारा दिला होता.

हे हल्ले, शारा यांच्या इस्लामिक नेतृत्वाखालील प्रशासनाच्या विरोधातले मोठे पाऊल ठरले. हे त्या काळात घडले, जेव्हा शारा यांचे अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरक्षाविषयक संबंध बळकट होत होते.

इस्रायलने सीरियाच्या नव्या नेतृत्वाला ‘छुपे जिहादी’ म्हणून संबोधले आहे आणि सांगितले की, “ते दक्षिण सीरियामध्ये अशा शक्तींना वाढू देणार नाहीत. इस्रायलमधील ड्रूझ अल्पसंख्याकांच्या मागण्यांमुळे हे धोरण अधिक ठाम करण्यात आले आहे.”

लढाई लवकरच थांबेल – अमेरिका

“आम्ही सीरियातील सर्व संबंधित पक्षांशी संवाद साधला आहे आणि ही भीषण परिस्थिती आटोक्याक आणण्यासाठी आवश्यक उपायांवर सहमती झाली आहे,” असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी सामाजिक माध्यमांतून सांगितले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, गुरुवारी या संघर्षावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहे, अशी माहिती मुत्सद्द्यांनी दिली.

इस्रायलचे यूएनमधील राजदूत डॅनी डॅनॉन यांनी सांगितले की, “सीरियन भूमीवर निरपराध नागरिकांवर झालेल्या अमानुष गुन्ह्यांचा परिषदेकडून निषेध व्हायला हवा. इस्रायल आपल्या सीमांवरील कोणत्याही दहशतवादी धोक्याविरोधात कठोर कारवाई करत राहील.”

दमास्कसवर लढाऊ विमानांच्या घिरट्या

सिरियन नेटवर्क फॉर ह्युमन राइट्सने म्हटले आहे की, “या आठवड्यातील हिंसाचारात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे.” तर सुरक्षा सूत्रांनी ही संख्या 300 असल्याचे सांगितले. दरम्यान, रॉयटर्स या आकड्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकले नाही.

रॉयटर्सच्या पत्रकारांनी बुधवारी, दमास्कस शहरावर लढाऊ विमानांना घिरट्या घालताना आणि जोरदार हल्ले करताना पाहिले. संरक्षण मंत्रालयाजवळील परिसरात धुराचे लोट दिसून आले. इमारतीचा एक भाग नष्ट झाला असून, परिसरात फक्त मलबा उरला आहे.

इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, “दमास्कसमधील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि राष्ट्राध्यक्ष भवनाजवळील एक लष्करी तळावर हल्ला केला गेला.” “सीरियन दल ड्रूझ समुदायावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी काहीच करत नाही, उलट ते समस्येचाच एक भाग आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायलचे लष्करप्रमुख आयाल झमीर यांनी सांगितले की, “दक्षिण सीरिया हा दहशतवाद्यांचा अड्डा होऊ देणार नाही.”

शारा यांच्यासमोरील आव्हाने

इस्लामिक शासनाविषयी संशय असलेल्या विविध गटांच्या भीतीमुळे, शारा यांच्यासमोर सीरियाला पुन्हा एकत्र बांधण्याचे मोठे आव्हान उभे आहे. मार्च महिन्यात झालेल्या अलवाइट अल्पसंख्याकांच्या सामूहिक हत्येमुळे, त्यांच्यावरील अविश्वास आणखी वाढला आहे.

ड्रूझ समुदाय, जो इस्लामचा एक उपगट आहे तो सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल या तिन्ही देशांमध्ये विखुरलेला आहे.

इस्रायलमधील ड्रूझ लोकांच्या विनंतीनंतर, अनेक इस्रायली ड्रूझ नागरिकांनी बुधवारी सीमारेषा तोडून सीरियन ड्रूझ समुदायाशी संपर्क साधला, असे Reuters च्या एका साक्षीदाराने सांगितले.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, “इस्रायली लष्कर ड्रूझ नागरिकांचे रक्षण करत आहे आणि इस्रायली ड्रूझ नागरिकांनी सीमा ओलांडू नये, असे आवाहन केले.” “जे नागरिक सीरियात गेले आहेत, त्यांना सुरक्षित परत आणण्याचे काम लष्कर करत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

इस्रायली ड्रूझ नागरिक फाएझ शकेर म्हणाले की, “सीरियामधील हिंसाचार पाहताना मला हतबल वाटते. माझे कुटुंब तिथे आहे. माझी बायको, काका, आणि संपूर्ण कुटुंब स्वेदामध्ये आहे. त्यांना घराबाहेर हाकलण्यात आले, घरे लुटली गेली आणि पेटवून दिली गेली, पण दुर्देवाने मी काहीच करू शकत नाही.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजर्मनी आणि ब्रिटन नवीन ‘मैत्री करारावर’ स्वाक्षरी करण्यास सज्ज
Next articleGalwan to Sindoor: Why India’s Defence Reset Is Overdue

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here