इराणचे राष्ट्रपती रायसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, जगभरातून चिंता व्यक्त

0
इराणचे
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी तैनात असणारी बचाव वाहने. इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतातील वर्झाकान येथे 19 मे 2024 रोजी हेलिकॉप्टर कोसळले. (अझिन हघिघी/मोज न्यूज एजन्सी/डब्ल्यू. ए. एन. ए. (पश्चिम आशिया न्यूज एजन्सी) व्हाया रॉयटर्स

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने ‘हार्ड लँडिंग’ केल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या वृत्तावर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘तीव्र चिंता’ व्यक्त केली आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

“राष्ट्रपती रायसी यांच्या हेलिकॉप्टर संदर्भात आज आलेल्या बातम्यांमुळे मी खूप चिंतित आहे. संकटाच्या या काळात आम्ही इराणी लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत आणि राष्ट्रपती तसेच त्यांच्या परिवाराच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो “, असे त्यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रपती रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमिराबदोल्लाहियान यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ नेत्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी खराब हवामानामुळे पूर्व अझरबैजान प्रांतात अपघात झाला. बचाव पथकांनी तातडीने त्या भागात शोधकार्य सुरू केले आहे.

इराणी माध्यमांनुसार, उत्तर इराणमध्ये दाट धुक्यामुळे उड्डाणासाठी अडचणी निर्माण झाल्यामुळे राष्ट्रपतींच्या ताफ्यातील तीनपैकी एका हेलिकॉप्टरचे ‘हार्ड लँडिंग’ झाले. या बातमीवर सौदी अरेबियाने “मोठी चिंता” व्यक्त करत शोध कार्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

“आम्ही हे जाहीर करतो की या कठीण परिस्थितीत आमचा देश, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या पाठीशी उभा आहे आणि इराणी एजन्सींना आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास तयार आहे,” असे इराणचा कट्टर शत्रू असलेल्या सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

इराणी शोध आणि बचाव पथके दाट धुके असलेल्या डोंगराळ भागात अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध घेत आहेत. 63 वर्षीय रायसी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर याच भागात कोसळले आहे.

एक्स, पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या निवेदनात कतारने, इराणचे अध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री प्रवास करत असलेल्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरबद्दल आपली “तीव्र चिंता” व्यक्त केली असून “शोधकार्यात आवश्यक सर्व प्रकारच्या मदतीचा प्रस्ताव दिला” आहे.

आखाती राज्याच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी “राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कतारकडून शुभेच्छा,” असे निवेदनात म्हटले आहे.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)


Spread the love
Previous articleकॅनडात मरणानंतरही सरणाची वाट दुस्तरच
Next articleMimicking Might: How China Uses Indian and U.S. Weapon Replicas for Strategic Testing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here