श्योक बोगद्याचे उद्घाटन, 5 हजार कोटींच्या 125 सीमावर्ती प्रकल्पांचा शुभारंभ

0

भारताच्या सीमावर्ती भागातील, संपर्क साधनांना बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी, सीमा रस्ते संघटना (BRO) द्वारे पूर्ण करण्यात आलेल्या, 5,000 कोटी मूल्याचे 125 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले, जे लडाखमधून एकाच वेळी सुरु केलेले सर्वाधिक प्रकल्प आहेत. हे प्रकल्प– अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि मिझोरम या सात राज्यांमध्ये, तसेच लडाख आणि जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत.

या नवीन मालमत्तांमध्ये, 28 रस्ते, 93 पूल आणि चार इतर महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पांचे उद्दिष्ट लष्करी गतिशीलता वाढवणे, स्थानिक उपजीविकेला चालना देणे आणि दूरवरच्या सीमावर्ती गावांना राष्ट्रीय प्रवाहात आणणे हे आहे.

श्योक बोगदा: उंच पर्वतीय प्रदेशातील नवीन जीवनवाहिनी

सिंह यांनी दार्बुक–श्योक–दौलत बेग ओल्डी (DSDBO) मार्गावरून या प्रकल्पांचे उद्घाटन केले, जिथे BRO ने 920 मीटरचा श्योक बोगदा बांधला आहे. जगातील सर्वात कठीण भौगोलिक भूभागांपैकी एक असलेल्या या प्रदेशात, हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रकल्प ठरला आहे. ‘कट-अँड-कव्हर’ संरचनेनुसार बांधलेला हा बोगदा, अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ज्या भागांमध्ये तीव्र हिमवर्षाव, हिमस्खलन आणि अति-शून्य तापमानाचा वारंवार सामना करावा लागतो, तेथे वर्षभर वाहतुकीची सोय उपलब्ध होईल.

हा बोगदा, उत्तरेकडील महत्त्वपूर्ण सीमारेषेवर सैन्य दलाच्या जलद तैनाती क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करेल, अशी अपेक्षा आहे.

गलवान युद्ध स्मारकाचे अनावरण

सिंह यांनी, जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी बांधलेल्या गलवान युद्ध स्मारकाचे देखील आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी, सीमावर्ती प्रदेशांच्या विकासासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संपर्क साधने ही “सुरक्षा, समृद्धी आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी नवी जीवनवाहिनी” असल्याचे म्हटले.

संरक्षण मंत्री म्हणाले की, “उत्तम सीमा पायाभूत सुविधांमुळे लष्करी गतिशीलता, सुलभ दळणवळण व्यवस्था, अधिक पर्यटन, अधिक रोजगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकास आणि लोकशाहीवरील दृढ विश्वास सुनिश्चित होतो.”

‘ऑपरेश सिंदूरमध्ये आणखी बरेच काही करू शकलो असतो’: सिंह

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत, सिंह यांनी नमूद केले की: या ऑपरेशनच्या त्वरित यशात मजबूत संपर्क साधनांनी निर्णायक भूमिका बजावली.

ते म्हणाले की, “त्या दहशतवाद्यांचे काय झाले, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही यापेक्षा खूप काही करू शकलो असतो, परंतु आमच्या जवानांनी शौर्य आणि संयम दाखवत, आवश्यक तेवढीच कारवाई केली.” त्यांनी याचे श्रेय वेळेवर झालेल्या लॉजिस्टिक पुरवठ्याला तसेच सैन्यदल, नागरी प्रशासन आणि सीमावर्ती समुदायांमधील अखंड समन्वयाला दिले.

पायाभूत सुविधा: सुरक्षा आणि विकासाचा चालक

सीमावर्ती भागातील विकासाचा संबंध भारताच्या आर्थिक कामगिरीशी जोडत, सिंह यांनी आर्थिक वर्ष 2025–26 च्या दुसऱ्या तिमाहीतील देशाच्या 8.2% जीडीपी वाढीवर प्रकाश टाकला. जागतिक संघर्ष आणि प्रादेशिक सुरक्षा आव्हाने असतानाही, भारत आर्थिक आणि धोरणात्मक अशा दोन्ही आघाड्यांवर पुढे वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्र्यांनी 2024–25 मध्ये BRO चा 16,690 कोटींचा विक्रमी खर्च आणि 2025–26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 7,146 कोटींची वाढीव आर्थिक तरतूद देखील नमूद केली. चालू आर्थिक वर्षासाठी 18,700 कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

BRO ची विस्तारित भूमिका

BRO चे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन म्हणाले की, उच्च केंद्रीय मंत्रालयांसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणारी प्राधान्य एजन्सी म्हणून BRO उदयास आली आहे. गेल्या केवळ दोन वर्षांत, उंच पर्वतीय प्रदेश, वाळवंट, पूरग्रस्त आणि घनदाट जंगल असलेल्या भूभागांवर BRO चे 356 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

ते म्हणाले की, “एजन्सीच्या वाढत्या कार्यामुळे, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यात आणि भारताच्या काही सर्वात दुर्गम प्रदेशांमध्ये विकास प्रक्रियेला गती देण्यामधील तिची मध्यवर्ती भूमिका स्पष्ट होते.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleजमात-ए-इस्लामीकडून अल्पसंख्याक जागेसाठी हिंदू उमेदवाराची निवड
Next articleतिबेटी बौद्ध धर्म हा चीनी बौद्ध धर्म नाही: बीजिंगच्या कथनाची पडताळणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here