सिंगापूरच्या न्यायालयाने गुरुवारी एका माजी मंत्र्याला न्यायामध्ये अडथळा आणल्याबद्दल आणि 3 लाख डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या भेटवस्तू स्वीकारल्याबद्दल 12 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. स्वच्छ प्रशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या पहिल्या माजी मंत्रिमंडळ सदस्याला ही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे.
13 वर्षे कॅबिनेट सदस्य असलेले आणि व्यापार, दळणवळण आणि वाहतूक अशी विविध खाती सांभाळणारे एस. ईश्वरन यांनी अयोग्यरित्या भेटवस्तू स्वीकारल्याबद्दलच्या चार आणि न्यायामध्ये अडथळा आणल्याबद्दलच्या एका गुन्ह्याची कबुली दिली होती.
62 वर्षीय ईश्वरन यांना पुढील काही दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला असून सोमवारी त्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुरू होईल, असे न्यायालयाने सांगितले.
सर्वात कमी भ्रष्ट देश
या प्रकरणामुळे सिंगापूरला मोठा धक्का बसला आहे. या देशाला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या असणाऱ्या संधी, कार्यक्षम नोकरशाहीची, तसेच मजबूत आणि स्वच्छ प्रशासन असल्याचा अभिमान आहे. ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार, गेल्या वर्षी सिंगापूर हा जगातील सर्वात कमी भ्रष्ट असलेल्या पहिल्या पाच देशांपैकी एक होता.
सिंगापूरमध्ये शेवटचा भ्रष्टाचाराचा खटला 1986 मध्ये नोंदवला गेला ज्यात एका मंत्र्याचा समावेश होता.त्यावेळी राष्ट्रीय विकास मंत्र्याची कथित लाचखोरीसाठी चौकशी करण्यात आली होती, परंतु न्यायालयात कोणतेही आरोप दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
नव्या खटल्यातील तपासामुळे आशियाई आर्थिक केंद्रामध्ये खळबळ उडाली आणि ईश्वरनन यांच्या आरोपांवर लक्ष केंद्रित केले गेले. या माजी परिवहन मंत्र्यांनी व्यावसायिकांकडून भव्य भेटवस्तू स्वीकारल्या ज्यात इंग्लिश प्रीमियर लीग सॉकर सामने, सिंगापूर फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स, लंडन म्युझिकल्स अशा कार्यक्रमांची तिकीटे आणि खाजगी जेटमधून केलेला प्रवास या गोष्टींचा समावेश होता.
आरोप सिद्ध
या सगळ्याची एकूण किंमत 4 हजार सिंगापूर डॉलर्सपेक्षा जास्त होती, असे फिर्यादी पक्षाने सांगितले. ईश्वरन यांच्यावर पहिल्यांदा जानेवारीत आरोप लावण्यात आले तेव्हा त्यांना परिवहन खात्याचा कार्यभार स्वीकारून तीन वर्षांपेक्षा कमी काळ झाला होता. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना या खात्यातील मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचे ईश्वरन यांनी सुरुवातीला सांगितले होते. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आपण लढा देऊ असेही जाहीर केले. मात्र न्यायालयासमोर ठेवलेल्या एकूण आरोपांपैकी पाच आरोपांसाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले. यापैकी दोन आरोप सुरुवातीला भ्रष्टाचाराशी संबंधित होते परंतु नंतर ते भेटवस्तू स्वीकारणे यांमध्ये बदलण्यात आले.
फिर्यादी पक्षाने सुरुवातीला त्यांच्यावर 35 गुन्ह्यांचा आरोप केला होता, मात्र त्यातील केवळ पाच गुन्ह्यांसाठी प्रत्यक्ष शिक्षा ठोठावण्यात आली.