दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग
दि. २६ मे: भारतीय नौदलाच्या दक्षिण चीन समुद्रातील सामरिक आणि परिचालनात्मक तैनातीचा भाग म्हणून ‘आयएनएस किल्तन’ ही युद्धनौका शनिवारी ब्रुनेईतील मुआरा बंदरात दाखल झाली. भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील युद्धनौका दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीवर आहेत. पूर्व ताफ्याचे प्रमुख रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे अभियान सुरु आहे. बृनेईला भेट देण्यापूर्वी या युद्धनौकांनी सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांना भेट (पोर्ट कॉल) दिली आहे. तसेच, त्यांच्या नौदल आणि तटरक्षकदलाबरोबर द्विपक्षीय सागरी सरावही केला आहे.
#INSKiltan arrived at Muara, #Brunei on #25May 24 & was accorded a warm welcome by the Royal Brunei Navy & @hicomindBrunei.
The visit is part of the Operational Deployment of @IN_EasternFleet to the #SouthChinaSea & reiterates the longstanding friendship & cooperation b/n the two… pic.twitter.com/u231WZNgmV— SpokespersonNavy (@indiannavy) May 25, 2024
ब्रुनेइच्या ‘पोर्ट कॉल’साठी भारतीय नौदलाची ‘आयएनएस किल्तन’ ही युद्धनौका शनिवारी २५ मे रोजी ब्रुनेइतील मुआरा या बंदरावर पोहोचली. ‘किल्तन’ स्वदेशी बनावटीची युद्धनौका (कॉरव्हेटी) कोलकाता येथील ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स’ (जीआरएसई) यांनी बांधली आहे. भारतीय नौदलाच्या ‘पी-28 अँटी-सबमरीन वॉरफेअर कॉरव्हेटीपैकी ‘आयएनएस किल्तन’ ही तिसरी युद्धनौका (कॉरव्हेटी) आहे. ‘किल्तन’ आणि तिच्यावरील भारतीय नौदलातील कर्मचाऱ्यांचे मुआरा बंदरावर रॉयल ब्रुनेई नौदलाने स्वागत केले. या भेटीमुळे दोन्ही सागरी राष्ट्रांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. या ‘पोर्ट कॉल’दरम्यान ‘किल्तन’ आणि ब्रुनेईच्या नौदलाचा संयुक्त सागरी सुरक्षा सरावही होणार आहे. त्याचबरोबर उभय देशांच्या नौदलात व्यावसायिक संवाद, क्रीडा सामने, सामाजिक देवाणघेवाण, नौदलाची सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करणारे उपक्रम आदी प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. दोन्ही देशांतील नौदलाच्या अधिकाऱ्याची परस्पर जहाजांना भेटही (डेक व्हिजिट) आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौदल आणि रॉयल ब्रुनेई नौदल यांच्यातील सागरी सरावाने या भेटीचा समारोप होणार आहे. दोन्ही देशांतील नौदलांची आंतर-परिचलन क्षमता वाढण्यासाठी हा सराव उपयोगाचा ठरणार आहे.
भारतीय नौदलाकडे हिंदी महासागर तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रातील एक प्रबळ नौदल (नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर) म्हणून पाहिले जाते. बदलत्या भूराजकीय परिस्थितीत दक्षिण चीन समुद्रही जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामुळे या भागातील भारतीय नौदलाची उपस्थितीही महत्त्वाची मानली जाते. भारताने आपल्या ‘लूक ईस्ट’ धोरणानुसार या भागातील आणि आग्नेय आशियातील देशांशी (आसियान) संबंध वाढविण्यास सुरुवात केली होती. त्यातून पुढे भारताने आपल्या ‘ॲक्ट ईस्ट’ आणि ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ (सागर) या बहुपक्षीय भागीदारीच्या धोरणाचे सुतोवाच केले. या भागातील चीनच्या दादागिरीमुळे त्रस्त असलेल्या देशांना द्विपक्षीय संबंधांच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे आणि शस्त्रप्रणालीही भारताने देऊ केली आहे. फिलिपिन्सने नुकतीच भारताकडून ब्राह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची खरेदी केली आहे. चीनला शाह देण्यासाठी केलेली हे मोठी खेळी मानली जात आहे. तसेच, या व्यवहारामुळे संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील एक निर्यातदार देश म्हणूनही भारताचे स्थान अधोरेखित झाले आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)