दक्षिण कोरिया – उत्तर कोरिया तणावावरून सीमेवरील रहिवाशी चिंतेत

0
दक्षिण

दक्षिण कोरिया – उत्तर कोरिया तणाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. मागील आठवड्यात उत्तर कोरियाने सीमेवरून कचरा वाहून नेणारे शेकडो फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडले. त्यावरून शेजारी देशांनी आपत्कालीन इशारे प्रसारित केले तर प्रसारमाध्यमांकडून त्याचे वार्तांकन सुरू झाले. मात्र  अनेक दक्षिण कोरियन लोकांनी या घटनेला फार काळ महत्त्व दिले नसले तरी सीमेजवळ राहणाऱ्यांच्या दृष्टीने उभय देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू लागला आहे.

सीमावर्ती भागातील शहर पाजूमध्ये अतिथीगृह आणि ट्रॅव्हल एजन्सीचे मालक असलेले यून सेओल-ह्यून म्हणाले, “काही नागरिक याला दुसऱ्याच कोणत्यातरी देशाच्या शेजाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या मानतात.” त्यांनी दक्षिण कोरियाच्या सर्व नागरिकांना परिस्थिती शांत करण्यासाठी अधिक लक्ष देणे आणि मदत करणे यासाठी आवाहन केले आहे.

सीमारेषेवर लष्करी हालचालींमध्ये वाढ करत दक्षिण कोरियाने या फुग्यांच्या कृतीवर प्रतिसाद दिल्याने संघर्ष वाढत आहे. उत्तरेकडील सीमेवर प्रचाराचा धडाका उडवून देण्यासाठी परत एकदा लाउडस्पीकरचा वापर करण्याची शक्यता नाकारलेली नाही.

दक्षिण कोरियाचा सीमावर्ती भाग स्थानिक आणि परदेशी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, जिथून उत्तर कोरियाकडे डोकावून पाहता येणे शक्य होते. पण  यून यांच्या मते राजधानी सेऊलच्या उत्तरेस सुमारे 35 किमी (22 मैल) अंतरावर असलेल्या पजू येथील त्यांच्या व्यवसायावर वाढत्या तणावाचा मोठा परिणाम झाला आहे.

पजूमधील आणखी एक रहिवासी, 60 वर्षीय ह्यून-की यांनाही दोनही देशांच्या जशास तसे उत्तर देण्याच्या अलीकडे वाढलेल्या प्रकारांबद्दल चिंता वाटते.

“सध्या कोणताच पर्याय नाही. उत्तर कोरियाच्या तोफांमधून उडणारे गोळे या ठिकाणाकडे येऊ शकतात अशी कायमच भीती बाळगण्याशिवाय पर्याय नाही,” असे ह्यून-की यांचे मत आहे. पजूचे वर्णन ते “सर्वात तणावपूर्ण शहर” असे करतात.

1950-1953 दरम्यान झालेल्या कोरियन युद्धातील युद्धविराम करार आता संपुष्टात आल्याने दोन्ही कोरियन देशांमध्ये तांत्रिकदृष्ट्या युद्ध सुरू आहे. त्यांचे सैन्य आंतर-कोरियन सीमेवर समोरासमोर आहे, उत्तर कोरियाने दक्षिणेला लक्ष्य करत क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स तैनात केली आहेत, तसेच नियमितपणे आपल्या शेजाऱ्याचा नाश करण्याची धमकी दिली जात आहे.

उत्तर कोरियाने कचरा वाहून नेणाऱ्या फुग्यांचे उड्डाण स्थगित करण्याची घोषणा केली आहे, पण देशावर टीका करणारी पत्रके पुन्हा दक्षिणेकडून उडवली गेली तर हे फुगे पुन्हा उडवले जातील अशी धमकी उत्तर कोरियाने दिली आहे.  उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन जोपर्यंत त्यांच्या “चुकीच्या कृत्यांबद्दल” माफी मागत नाही तोपर्यंत उत्तर कोरियाच्या विरोधातील पत्रके घेऊन फुगे पाठवत राहण्याची आपण शपथ घेतली असल्याचे कार्यकर्ते पार्क सांग-हक यांनी जाहीर केले आहे.

यावरील प्रतिक्रियेसाठी पार्क यांच्याशी त्वरित संपर्क होऊ शकला नाही, परंतु त्यांच्या पक्षाच्या संकेतस्थळावरील निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला 3 लाख पत्रके तसेच के-पॉप आणि कोरियन नाटके असलेली 2 हजार यूएसबी कार्ड्स घेऊन 20 फुगे उत्तरेच्या दिशेने पाठवले होते. उत्तर कोरियाशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने सांगितले की ते सीमेवरून पत्रके पाठवण्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मात्र ही पद्धत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येते हे त्यांनी मान्य केले.

सीमेपलीकडे उत्तर कोरिया विरोधी पत्रके पाठवण्याच्या या कृतीमुळे दक्षिण कोरियामध्ये अनेकदा वाद निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सीमावर्ती शहरांमधील कार्यकर्ते आणि रहिवाशांमध्ये या प्रकरणी अधूनमधून संघर्ष निर्माण झाला आहे.

“पजूमधील कोणत्या रहिवाशांना तणाव वाढवणाऱ्या अशा गोष्टी आवडतील?” असे यून विचारतात. आपल्या देशातून फुग्यांचे प्रक्षेपण रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण इतर स्थानिकांसोबत काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेशम

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleHamas Wants Israeli Commitment To Permanent Ceasefire, Full Withdrawal From Gaza
Next articleTiananmen Crackdown Anniversary: Security Tight In China, Hong Kong Even As Taiwan Recounts

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here