उत्तर कोरिया सैन्याने गुरुवारी सकाळी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे दक्षिण कोरियाच्या सैन्याने त्यांना इशारा देण्यासाठी गोळीबार केला. दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने (जेसीएस) सांगितले की, इशारा देणारा गोळीबार केल्यानंतर उत्तर कोरियाच्या सैनिकांनी माघार घेतली.
उत्तर कोरियाच्या सैनिकांनी डिमिलिटराईज्ड झोनला मध्यभागी (डीएमझेड) विभाजित करणाऱ्या लष्करी सीमारेषेचे उल्लंघन केले. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या महिन्यात घडलेली ही किमान तिसरी घटना आहे.
उत्तर कोरियाच्या डझनभर सैनिकांनी सीमा रेषेचे उल्लंघन केल्यानंतर दक्षिण कोरियाच्या सैन्याने गुरुवारी इशारा देण्यासाठी त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
कोरियन युद्धाच्या समाप्तीमुळे या देशांमधील लढाई थांबली असली तरी गेल्या अनेक दशकांपासून आपसातील संघर्ष सुरूच आहे. अलीकडे घडणाऱ्या घटनांमुळे सीमा रेषेजवळील संघर्षात प्रचंड वाढ झाली आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी उत्तर कोरियाला भेट दिल्यानंतर ही घटना घडली. पुतीन यांचा गेल्या 24 वर्षांतील हा पहिलाच दौरा होता. उत्तर कोरियाच्या किम जोंग उनची बहीण किम यो जोंग हिने दक्षिण कोरियाच्या कार्यकर्त्यांचा निषेध करणारे निवेदन जारी केले. गुरुवारी उशिरा कार्यकर्त्यांनी उत्तरेच्या दिशेने पत्रके घेऊन जाणारे फुगे उडवले.
फुगे उडवणे हे दोन्ही कोरिया दरम्यान वाढत्या तणावाचे कारण ठरले आहे. उत्तर कोरियाने कचरा घेऊन जाणारे फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने उडवले होते.
सीमेवरील लाऊडस्पीकर प्रसारण पुन्हा सुरू करून दक्षिण कोरियाने त्याला प्रत्युत्तर दिले. उत्तर कोरियाचे बंडखोर पार्क सांग-हाक यांनी सांगितले की, त्यांच्या ‘फायटर्स फॉर फ्री नॉर्थ कोरिया’ या गटाने सीमावर्ती शहर पोचेऑन येथून 10 फुगे सोडले होते. त्या फुग्यांमध्ये 2 लाख फ्लायर, के-पॉप व्हिडिओ आणि नाटके असलेल्या 5 हजार युएसबी स्टिक आणि एका डॉलरच्या 2 हजार नोटा होत्या.
उत्तर कोरिया याला कसा प्रतिसाद देईल हे किम यांनी जाहीर केलेले नाही.
सीमेजवळ राहणाऱ्या दक्षिण कोरियाच्या रहिवाशांनी सुरक्षेच्या कारणास्तव अशा कारवाया थांबवण्याची मागणी केली आहे.
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)