उष्णतेची लाट आणि जोरदार वाऱ्यांमुळे, दक्षिण युरोपात वणव्याचा हाहाकार

0

उष्णतेची लाट आणि जोरदार वाऱ्यांमुळे, बुधवारी दक्षिण युरोपमध्ये वणव्याचा हाहाकार पाहायला मिळाला. जाणीवपूर्वक लावलेल्या किंवा वादळामुळे लागलेल्या या वणव्यांमुळे अनेक घरे नष्ट झाली, मात्र हजारो रहिवासी आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

युरोपियन युनियनच्या जॉइंट रिसर्च सेंटरच्या मते, 2025 मध्ये आतापर्यंत युरोझोनमध्ये सुमारे 440,000 हेक्टर (1,700 चौरस मैल) क्षेत्राला वणव्याचा फटका बसला आहे, जो 2006 पासून या वर्षाच्या सरासरीपेक्षा दुप्पट आहे.

अथेन्सच्या पश्चिमेकडील ग्रीक शहर- पॅट्रासच्या बाहेरच्या भागात, ऑलिव्हची झाडे आणि जंगलांमध्ये पसरलेल्या वणव्यामुळे एका सिमेंट कारखान्याला आग लागली, ज्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि आकाशात ज्वाला व काळ्या धुराचे लोट पसरले.

अग्नी प्रलय

“हे एखाद्या प्रलयासारखे दिसते आहे. देव आपल्या लोकांना मदत करो,” असे अथेन्सहून पॅट्रासला बचावकार्यासाठी आलेले स्वयंसेवक जॉर्ज कार्व्हानिस म्हणाले.

मंगळवारी, पॅट्रासजवळील सुमारे 7,700 लोकसंख्या असलेल्या एका शहरातील रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आणि बुधवारी दोन जवळच्या गावातील रहिवाशांना तिथून निघून जाण्याचा सल्ला देण्यात आला.

पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ग्रीक बेटांवर, पूर्वेकडील चिओस आणि पश्चिमेकडील सेफालोनिया येथे, आग पसरल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले.

स्पेनमध्ये, एका स्वयंसेवक अग्निशमन दलाच्या जवानाचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला आणि अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पेनच्या हवामान विभागाने (AEMET) जवळजवळ संपूर्ण देशाला आगीचा धोका अत्यंत जास्त असल्याचे सांगितले आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, “एक 35 वर्षीय तरूण, मध्य कॅस्टिल आणि लिओन प्रदेशातील नोगाऱ्यास शहराच्या जवळ ‘फायरब्रेक्स’ (पसरणाऱ्या आग रोखण्याकरिता तयार केलेली जागा) तयार करण्याचा प्रयत्न करत असताना आगीच्या कचाट्यात सापडला.”

यावर्षी, स्पेनमधील वणव्यात मृत्यू झालेला ही सहावा व्यक्ती आहे. आपत्कालीन सेवांनुसार, या वणव्यात तार्रागोना आणि आव्हिला येथील दोन अग्निशमन दलाचे जवानही आगीच्या भक्षस्थानी पडवे.

युरोपियन फॉरेस्ट इन्स्टिट्यूटमधील अग्निव्यवस्थापन तज्ञ अलेक्झांडर हेल्ड म्हणाले की, “कुठलीही पूर्वतयारी नसलेल्या परिस्थितीत काम करणे, अग्निशमन दलाच्या जवानांनासाठी अत्यंत धोकादायक आहे.” त्यांनी तात्काळ ‘बफर झोन’ तयार करणे आणि ज्वलनशील वनस्पती साफ करणे, यासारख्या महत्वपूर्ण कामांची गरज व्यक्त केली.

“एखाद्या औद्योगिक इमारतीचा विचार करा आणि कल्पना करा की तिथे अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंकलर सिस्टिम्स, अग्निरोधक दरवाजे आणि बाहेर पडण्याचे मार्ग नसतील, तर अग्निशमन दलाचे जवान आत जाण्यास नकार देतील, पण आपल्या भूभागात आपण त्यांच्याकडून हीच अपेक्षा करतो,” असे हेल्ड म्हणाले.

ग्रीनपीसच्या मते, दरवर्षी 1 अब्ज युरो ($1.2 अब्ज) वन व्यवस्थापनात गुंतवल्यास 9.9 दशलक्ष हेक्टर, पोर्तुगालच्या आकाराचे क्षेत्र आणि आग विझवण्यासाठी तसेच पुनर्वसन कार्यावर खर्च होणारे 99 अब्ज युरो वाचू शकतात.

संशयास्पद आग

स्पेनच्या पर्यावरण मंत्री सारा आगसेन, यांनी एसईआर रेडिओ स्टेशनला सांगितले की, “देशभरातील अनेक आगी त्यांच्या हेतुपुरस्सर लावण्यात आल्या असाव्यात.”

पोलिसांनी सांगितले की, “दोन आठवड्यांपूर्वी माद्रिदच्या उत्तरेकडील आव्हिला भागात लावलेल्या आगीप्रकरणी मंगळवारी एका पुरुष अग्निशमन दलाच्या जवानाला अटक करण्यात आली, तर मंगळवारी त्यांनी ऑगस्टमध्ये गॅलिसियाच्या मुक्सिया भागात आग लावल्याच्या आरोपाखाली एका 63 वर्षीय महिलेची चौकशी करत असल्याचे सांगितले.”

युरोपा प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका संशयितालाही ओळखले आहे, ज्याच्या हातांना दक्षिणेकडील किनारपट्टीवरील कादिझ भागात समुद्राजवळील एका वस्तीत छोटी आग लावल्यामुळे भाजले असण्याची शक्यता आहे.

वादळांमुळेही इतर ठिकाणी आग लागल्या आहेत.

मंगळवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर, अंदालुसियाच्या अग्निशमन विभागाला हुएल्वा शहराच्या उत्तरेकडील लॉस रोमेरोस येथील चेस्टनट आणि ओकच्या जंगलात विजेच्या कडकडाटाने आग लागल्याची माहिती देणारे अनेक फोन आले. या आगीमुळे सुमारे 250 रहिवाशांना बाहेर काढावे लागले, परंतु बुधवारी सकाळपर्यंत ती बऱ्यापैकी नियंत्रणात आणली गेली.

पोर्तुगालमधील ट्रँकोसो येथील आग शनिवारी लागली होती, जी रात्री अधिक तीव्र झाली, कारण एका विजेच्या कडकडाटाने सुरक्षित मानल्या गेलेल्या भागात पुन्हा आग लागली, असे नागरी संरक्षण सेवेने सांगितले.

‘क्लेशदायक आठवडा’

अल्बानियामध्ये, संरक्षण मंत्री पिरो वेंगु म्हणाले की, “हा एक क्लेशदायक आठवडा” आहे, कारण देशभरात अनेक मोठे वणवे पेटत आहेत.”

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “बुधवारी सुमारे 10,000 अग्निशमन दलाचे जवान, सैनिक आणि पोलीस आपत्कालीन युनिट्स एकूण 24 वणव्यांशी झुंज देत होते.”

ज्वाला देशाच्या मध्यभागी असलेल्या दोन गावांमध्ये हा वणवा पोहोचल्या, त्यामुळे ग्रामस्थांना आपली जनावरे घेऊन पळून जावे लागले.

“आम्ही दोन नद्यांच्या मध्ये जात आहोत, कारण आग इथे पोहोचली आहे,” असे नार्टे येथील 68 वर्षीय हाजरी ड्रॅगोटी म्हणाले, जे आपल्या पत्नीसह एक गाय, एक गाढव आणि एक कुत्रा घेऊन पळून जात होते. “आम्ही काहीही करू शकत नाही; हे दारूगोळ्यासारखे आहे.”

स्पेनमध्ये उष्णतेची लाट 10व्या दिवशीही तीव्र होती, जी मंगळवारी 45 अंश सेल्सिअस (113 अंश फॅरेनहाइट) पर्यंत पोहोचली होती. EMET ने, ही लाट सोमवारपर्यंत कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, ज्यामुळे ती सर्वात लांब लाटांपैकी एक ठरली आहे.

पोप लिओ यांनी, “थोड्या वेळासाठी सूर्यप्रकाश आणि अत्यंत उष्णतेपासून दूर राहण्यासाठी,” त्यांचे साप्ताहिक उपदेश सेंट पीटर स्क्वेअरमधून व्हॅटिकनमधील एका इनडोअर ठिकाणी हलवले. बुधवारी, इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने, 16 शहरांसाठी तीव्र उष्णतेचा इशारा जारी केला होता, ज्यामध्ये फ्लोरेन्समध्ये तापमान 39 अंश सेल्सिअस (102 अंश फॅरेनहाइट) पर्यंत वाढण्याचा अंदाज होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअंदमान निकोबार मधील 30 विद्यार्थ्यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट
Next articlePakistan to Create Army Rocket Force Amid India Tensions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here