श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी अमरसुरिया तरअर्थमंत्रीपदी दिसानायके कायम

0
दिसानायके

हरिनी अमरसुरिया श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कायम राहणार असून राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा  कार्यभार कायम राहणार आहे. मोठ्या आर्थिक संकटानंतर मजबूत पुनर्प्राप्तीचे लक्ष्य दिसानायके यांनी ठेवले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दिसानायके यांच्या डाव्या आघाडीने 225 सदस्यांच्या संसदेत विक्रमी 159 जागा जिंकल्या आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे नेतृत्व करण्यासाठी ज्येष्ठ आमदार विजिता हेराथ यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाच्या दोन स्रोतांनी रॉयटर्सला सांगितल्याप्रमाणे,  सप्टेंबरमध्ये निवडून आल्यापासून दिसानायके यांनी मुख्य अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आहे, तेच यानंतरच्या काळातही त्या पदावर कायम राहतील. 1948 मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थानी आणण्याचा दिसानायके यांचा प्रयत्न आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) एक शिष्टमंडळ त्याच्या 2.9 अब्ज डॉलर कर्जाच्या तिसऱ्या आढाव्यासाठी सध्या कोलंबोमध्ये आहे. शिष्टमंडळ दिलेल्या कर्जावर सुमारे 3 कोटी 37 लाख डॉलर्सचा हप्ता जारी करेल अशी अपेक्षा आहे.

अध्यक्ष निवडण्यासाठी नवीन संसदेची गुरुवारी बैठक होणार असून दिसानायके त्यांचे प्रमुख धोरणात्मक प्राधान्यक्रम नव्याने स्थापन झालेल्या खासदारांसमोर मांडतील.

“हे सामर्थ्य जबाबदारीसह येते. लोकांप्रती असणारे आपले उत्तरदायित्व आणि या अधिकाराचा वापर विनम्रपणे, संयमाने आणि मर्यादांनी केला पाहिजे. या मंत्रिमंडळावर आणि संसदेवर माझा पूर्ण विश्वास आहे,” असे दिसानायके यांनी शपथविधीनंतर केलेल्या भाषणात सांगितले.

“ज्या खऱ्या कामावरून आपले मूल्यमापन केले जाईल ते आता सुरू होत आहे,” असेही ते म्हणाले.

2 कोटी 20 लाख लोकसंख्या असलेला श्रीलंका, 2022 साली परकीय चलनाच्या तीव्र टंचाईमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे जेरीस आला होता. यामुळे त्याची अर्थव्यवस्था प र डबघाईला आली आणि 2022 साली 7.3 टक्क्यांनी आणि गेल्या वर्षी 2.3 टक्क्यांनी ती संकुचित झाली.

राष्ट्रपतींना पुढील काही आठवड्यांत अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागेल, तसेच आयएमएफकडून मिळालेल्या कर्जात अडथळा न आणता नागरिकांवरील कर कमी करण्याचे आणि गंगाजळी वाढवण्याचे मार्ग शोधावे लागतील. हेच त्यांचे मुख्य निवडणूक वचन होते.

दिसानायके यांना रोखेधारकांसह 12.5 अब्ज अमेरिकन डॉलर कर्जाची पुनर्रचना पूर्ण करावी लागेल. याशिवाय विकासाला शाश्वत मार्गावर आणावे लागेल.

अनेक दशकांपासून कौटुंबिक पक्षांचे वर्चस्व असलेल्या देशात एक बिगर राजकीय व्यक्ती, दिसानायके यांनी सप्टेंबरमध्ये श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आरामात विजय मिळवला.

मात्र त्यांच्या मार्क्सवादी विचारांच्या नॅशनल पीपल्स पॉवर (एनपीपी) आघाडीला संसदेत केवळ तीनच जागा जिंकता आल्याने त्यांना ते विसर्जित करावे लागले आणि गेल्या आठवड्यातील गुरुवारी झालेल्या तात्पुरत्या निवडणुकीत नव्याने जनादेश मिळवावा लागला.

54 वर्षीय पंतप्रधान अमरसुरिया यांना सर्वाधिक पसंतीची मते मिळाली असून त्या एडिनबर्ग विद्यापीठातून सामाजिक मानववंशशास्त्रात डॉक्टरेट असलेल्या शिक्षणतज्ज्ञ आहेत. पंतप्रधान पदासोबतच त्या शिक्षण आणि उच्च शिक्षण खात्याची जबाबदारीही सांभाळणार आहेत.

 

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleSri Lankan President Retains Amarasuriya As Prime Minister, Keeps Finance
Next articleUnited States And Philippines Sign Intelligence-Sharing Pact

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here