स्टार्मर यांच्या चीन दौऱ्याचा प्रारंभ; 2018 नंतर ब्रिटिश पंतप्रधान प्रथमच चीनमध्ये

0
स्टार्मर

ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर बुधवारी चीनमध्ये दाखल झाले असून, 2018 नंतर एखाद्या ब्रिटिश पंतप्रधानांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. पाश्चात्त्य देश आणि अमेरिका यांच्यातील संबंधांबाबत वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, लंडन बीजिंगसोबतचे राजकीय आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

स्टार्मर यांनी सांगितले की, “ब्रिटनने चीनशी संबंधित संभाव्य सुरक्षा जोखमींबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे, परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेने दिलेल्या आर्थिक संधींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.” विमानात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, चीनशी संवाद साधणे ब्रिटनच्या राष्ट्रीय हिताचे आहे. “चीनच्या बाबतीत शहामृगासारखी भूमिका घेऊन (डोळे झाकून) चालणार नाही,” असे सांगून त्यांनी या भेटीतून “वास्तविक प्रगती” होईल अशी आशा व्यक्त केली.

चीनच्या सर्वोच्च नेत्यांसोबत भेटीगाठी

50 हून अधिक वरिष्ठ व्यावसायिक नेत्यांच्या शिष्टमंडळासह चीनमध्ये दाखल झालेले स्टार्मर, गुरुवारी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि प्रीमियर ली कियांग यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, शुक्रवारी ते शांघायमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी रवाना होतील.

हाँगकाँगमधील बीजिंगच्या कारवायांमुळे, युक्रेन युद्धात चीनने रशियाला दिलेला पाठिंबा आणि चिनी सुरक्षा यंत्रणांकडून ब्रिटिश राजकारणी आणि अधिकाऱ्यांची हेरगिरी केली जात असल्याच्या आरोप, यामुळे गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले होते. मात्र, हा दौरा त्या संबंधांमध्ये संभाव्य सुधारणा किंवा बदल होण्याचे संकेत देतो.

बीजिंगसाठी, हा दौरा भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात स्वतःला एक स्थिर आणि विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून सादर करण्याची संधी आहे.

ट्रम्प यांच्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचे सावट

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या अनिश्चित धोरणांमुळे, युरोपीय सरकारांमध्ये अस्वस्थता वाढत असतानाच स्टार्मर यांचा हा दौरा होत आहे. वॉशिंग्टनकडून बसू शकणाऱ्या संभाव्य धक्क्यांपासून सावध राहण्यासाठी पाश्चात्य देशांनी चीनसोबतचा राजनैतिक संपर्क वाढवला आहे.

ग्रीनलँडबद्दलचे ट्रम्प यांचे विधान, चागोस द्वीपसमूहाचे सार्वभौमत्व मॉरिशसला हस्तांतरित करण्याच्या ब्रिटनच्या करारावर त्यांनी केलेली टीका आणि अफगाणिस्तानमधील नाटो (NATO) मित्रराष्ट्रांच्या भूमिकेबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांमुळे, गेल्या काही महिन्यांत लंडन आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच कॅनडालाही इशारा दिला होता की, पंतप्रधान मार्क कार्नी यांनी चीनशी व्यापार करार केल्यास त्यांच्यावर 100% टॅरिफ (शुल्क) लादले जाईल.

स्टार्मर यांनी सांगितले की, चीनसोबत मजबूत आर्थिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे अमेरिकेसोबतच्या ब्रिटनच्या घनिष्ठ संबंधांना तडा जाण्याचे काहीच कारण नाही. वॉशिंग्टनसोबतचे संरक्षण, सुरक्षा, गुप्तचर आणि व्यापार सहकार्य हे ब्रिटनच्या धोरणाचे केंद्रस्थान राहील, असे त्यांनी नमूद केले.

संवेदनशील मुद्द्यांवर मौन

चिनी नेत्यांसोबतच्या चर्चेचा संपूर्ण अजेंडा जाहीर करण्यास स्टार्मर यांनी नकार दिला. डिसेंबरमध्ये, राष्ट्रीय सुरक्षा गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या जिमी लाई यांच्या प्रकरणावर ते चर्चा करणार का, किंवा युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी रशियाला दबाव टाकण्याबाबत ते बीजिंगला विनंती करणार का, याबाबत त्यांनी कोणतीही पुष्टी केली नाही.

दोन्ही देशांमधील व्हिसा निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रगती होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच, ब्रिटनला अमेरिका आणि युरोप यांपैकी एकाची निवड करावी लागेल का, या विचाराला त्यांनी फेटाळून लावला आणि स्वतःचे वर्णन ‘राष्ट्रीय हितावर लक्ष केंद्रित करणारा व्यावहारिक नेता’ असे केले.

जागतिक आघाड्यांमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आणि चीनबाबतच्या दृष्टिकोनाचे पुनर्मूल्यांकन करत असताना, हा दौरा ब्रिटनसाठी एक महत्त्वपूर्ण राजनैतिक टप्पा मानला जात आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअमेरिकेच्या धोरण अनिश्चिततेदरम्यान स्थिर व्यापार भागीदार म्हणून चीनचा उदय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here