सुदानमध्ये भीती आणि उपासमारीचे सावट; सततच्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त

0

सुदानमधील अल-फाशीर RSF ने वेढलेल्या शहरात, सतत सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यांपासून आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यापासून बचावासाठी, तेथील रहिवाशी भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपत आहेत. येथील हल्ल्यांची तीव्रता सातत्याने वाढत असून विस्थापितांसाठीची शिबिरे, वैद्यकीय केंद्रे आणि मशिदी यांवर लक्ष्य साधले जात आहे, ज्यामुळे तिथे भीती आणि उपासमारीचे सावट पसरले आहे.

दुष्काळाने ग्रस्त असलेले अल-फाशीर शहर, हे सुदानच्या पश्चिमेकडील विशाल दारफूर प्रदेशातील सरकारी सैन्याचा मुख्य आणि शेवटचा गड आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून येथे सुदानचे सैन्य आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या निम-लष्करी गटामध्ये गृहयुद्ध सुरू आहे.

सत्ता मिळवण्यासाठी सुरू झालेल्या या आंतरिक संघर्षामुळे, आजवर अनेक जातीय हत्याकांडे घडली, परकीय शक्ती यामध्ये ओढल्या गेल्या आणि मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर धोक्यात आले.

सुदानच्या इतर भागांमध्ये सैन्याने काही प्रमाणात नियंत्रण मिळवले असले तरी, दारफूर हा RSF चा बालेकिल्ला आहे, जिथे ते एक समांतर सरकार उभारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच संघर्षामुळे देशाचे भौगोलिक विभाजन होण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, गेल्या 18 महिन्यांपासून RSF ने वेढा घातल्यामुळे दशलक्षाहून अधिक लोकांनी अल-फाशीरमधून पलायन केले आहे. मात्र, आता शहर सोडणे अधिक धोकादायक आणि न परवडणारे झाले आहे. अंदाजे 2.5 लाख नागरिक अजूनही तिथे अडकले असून, शहर उद्ध्वस्त झाल्यासा, मोठ्या प्रमाणावर प्रतिशोधात्मक हल्ले होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सर्वसामान्य नागरिकांवर ड्रोन हल्ले

अजूनही अल-फाशीर शहरात वास्तव्याला असलेल्या, अनेक रहिवाशांनी सततच्या हल्ल्यांपासून बचावासाठी भूमिगत बंकर खोदले आहेत, अशी माहिती असे फोनद्वारे संपर्क साधलेल्या अनेक रहिवाशांमार्फत तसेच उपलब्ध व्हिडिओ फुटेजद्वारे समजली.

रहिवाशांनी सांगितले की, ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्यासाठी ते आपल्या दिवसभरातील हालचाली मर्यादित ठेवतात आणि मोठ्या जमावांना टाळतात, तसेच अंधार पडल्यानंतर कमीत कमी दिवे लावतात.

तिथली भीषणता व्यक्त करताना स्थानिक पत्रकार मोह्याल्दीन अब्दल्ला म्हणाले की, “आम्ही फक्त रात्री किंवा सकाळी लवकर मृत लोकांना पुरू शकतो, आणि आता आमच्यासाठी हे सामान्य झाले आहे.” 

अन्य काही सांगितले की, “ड्रोन नागरिकांचा पाठलाग करून, ते सर्वजण एकत्र जमतील अशी ठिकाणं, जसे की दवाखाने किंवा अन्य जागांपर्यंत हल्ला करण्यासाठी येतात.” “जेव्हा तुम्ही चालत असता तेव्हा ड्रोनने तुम्हाला सहज आत शिरताना पाहू नये, यासाठी तुम्हाला सरडा किंवा पालीप्रमाणे भिंतीला चिकटून चिकटून चालावे लागते,” असे अल-फाशीरमधील साउदर्न हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एझेल्डिन असो यांनी सांगितले.

अब्दल्ला यांच्या मते, 30 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आठवड्यात- अल-फाशीरमधील अबू तालेब शाळेतील आश्रयस्थानी झालेले तोफगोळा हल्ले, ड्रोन हल्ले आणि RSF च्या छाप्यांमध्ये किमान 18 लोक ठार झाले. ते हल्ल्यांपूर्वी आणि नंतर दोन्ही वेळा त्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते.

व्हिडिओ फुटेजमध्ये शाळेचे तुटलेले छत, भग्न भिंती दिसत होत्या. शाळेच्या मैदानात जमीन उखरून बनवलेली बंकर्स दिसत होती, ज्याच्या प्रवेशद्वाराभोवती वाळूच्या पिशव्या ठेवल्याचे आणि एका मृतदेह पडल्याचे दृश्यांमध्ये दिसले.

नागरिकांचे RSF वर आरोप

अबू तालेब शाळा आणि अल-फाशीरमधील इतर ठिकाणांवरील घटनांबाबत टिप्पणी देण्यासाठी केलेल्या लेखी विनंत्यांना, लष्कर किंवा RSF यांपैकी कुणीच  प्रतिसाद दिलेला नाही.

फुटेजमध्ये दिसलेल्या नागरिकांनी हल्ल्यांसाठी RSF ला दोषी ठरवले.

“ते नागरिक आणि सैनिक यांमध्ये फरक करत नाहीत. माणूस दिसला की ते गोळीबार करतात,” असे उत्तर दारफूर आरोग्य मंत्रालयाच्या प्रमुख- खादीगा मुसा यांनी अल-फाशीरहून रॉयटर्सशी फोनवर बोलताना सांगितले.

दारफूरमधील युद्धादरम्यान, जातीय हिंसाचाराच्या मालिकेसाठी RSF आणि त्यांच्या सहयोगींना जबाबदार धरले गेले आहे. अमेरिकेने गेल्यावर्षी घोषित केले होते की, आरएसएफने जनसंहार (genocide) केला आहे. RSF मात्र हे आरोप नाकारते आणि “बंडखोर सैनिकांना न्यायालयासमोर उभे केले जाईल” असे सांगते.

12 ऑक्टोबरच्या निवेदनात, RSF ने म्हटले की: अल-फाशीर शहरात “नागरिक नाहीत, ते रिकामे आहे.” त्यांनी सांगितले की लष्कराने, सहयोगी स्व-संरक्षण सैनिकांनी आणि माजी बंडखोरांनी तेथील रुग्णालये आणि मशिदींना लष्करी छावण्या आणि रॉकेट लाँचर ठेवण्याच्या जागांमध्ये रूपांतरित केले आहे.

सुदानी सैन्यानेही अल-फाशीरमध्ये ड्रोनचा वापर केला असल्याचे मान्य केले आहे, मात्र त्यांनी नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी नाकारली आहे.

आश्रयस्थळ आणि मशिदीवर हल्ले

10 आणि 11 ऑक्टोबरदरम्यान, दार अल-अरकाम नामक विस्थापितांच्या एका आश्रयस्थानी, जे विद्यापीठ परिसरात असून तेथे एक मशीद देखील आहे, त्यावर वारंवार हल्ले झाले.

त्या केंद्राचे व्यवस्थापक हाशिम बोश यांनी सांगितले की, “या हल्ल्यांमध्ये 57 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 17 मुले आणि त्यात तीन नवजात बाळांचा समावेश होता.”

पहिल्या हल्ल्याचे वर्णन करताना बोश म्हणाले की, “शुक्रवारचा नमाज संपताच, त्यांनी थेट मशिदीवर हल्ले केले.” तर, “दुसरा हल्ला ड्रोनमधून करण्यात आला, ज्याने दुसऱ्या कंटेनरमध्ये बनवलेल्या आश्रयस्थानाकडे धाव घेत असलेल्या लोकांवर निशाणा साधला,” असे ते म्हणाले.

‘दुसऱ्या दिवशी पहाटे, नमाज चालू असताना आणखी चार तोफगोळे डागण्यात आले,’ असे बोश यांनी सांगितले. स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये काही रहिवाशांनी या हल्ल्यांची पुष्टी केली.

त्यांनी घेतलेल्या फुटेजमध्ये, चादरींनी झाकून ठेवलेले 10 मृतदेह, प्रार्थनेसाठीच्या छोट्या गालीच्याने झाकलेला एका मुलाच्या आकाराचा मृतदेह आणि कंटेनरच्या आत छिन्नविछिन्न अवस्थेतील काही मृतदेह दिसून आले.

येल ह्युमॅनिटेरियन रिसर्च लॅब (HRL) यांनी, 16 ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट प्रतिमांमध्ये दार अल-अरकामच्या इमारतींवर 6 ठिकाणी स्फोटांचे ठसे दिसले.

जीवघेणी भूक

HRL च्या मते, 4 ऑक्टोबरपर्यंत RSF ने जमिनीवरील तटबंदी वाढवून अल-फाशीरला जवळजवळ पूर्णपणे वेढा दिला आहे.

परिणामी, गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांनी इशारा दिला की- लोक प्राण्यांच्या खाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘अंबाझ’वर जगत होते, परंतु आता तेही उपलब्ध नाही.

स्थानिक नेटवर्क अल-फाशीर रेजिस्टन्स कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या मते, दररोज सरासरी 30 लोकांचा मृत्यू हिंसाचार, भूक आणि आजारांमुळे होत आहे.

अबू शौक इमर्जन्सी रिस्पॉन्स रूम या स्वयंसेवी नेटवर्कच्या मते, शहरातील रस्त्यांवर इतकी प्रेते विखुरली आहेत की त्यामुळे आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

माध्यमांशी बोललेल्या नागरिकांनी सांगितले की, ‘ते जीव वाचवण्यासाठी शहराबाहेर पडले तर अपहरण, लुटमार किंवा हत्या होण्याची भीती आहे.’

“अल-फाशीर आता नरक बनले आहे, पण इथून बाहेर पडणे इथे राहण्यापेक्षा अधिक धोकादायक आहे”, असे अबू शौक इमर्जन्सी रिस्पॉन्स रूममधील मोहम्‍मद नावाच्या सदस्याने सांगितले.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजागतिक हवाई शक्ती क्रमवारीतील भारताच्या प्रगतीमुळे चीन अस्वस्थ आहे?
Next articleनाग MK-2 ने सज्ज झोरावर रणगाडे लवकरच भारतीय सैन्यात समाविष्ट होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here