एलएसीवर टेहळणी वाढविण्याची गरज

0

कोणत्याही राष्ट्रासाठी गुप्तचर यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. याद्वारे संबंधित राष्ट्राच्या सैन्याला परिपूर्ण सेवा देणे तसेच त्याच्या सीमांचे रक्षण करून आपले ध्येय साध्य करता येते. गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे त्या राष्ट्राला प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC ) 2020मध्ये चीनने केलल्या आगळीकीमुळे भारताला जो सुरुवातीला धक्का बसला, त्यावरून गुप्तचर यंत्रणेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तंत्रज्ञान, कार्यक्षमता, स्रोतांची उपलब्धता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय या बाबतीत भारतात काही त्रुटी आहेत. पण, मग यावर उपाय काय?
————————————

पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) दोन वर्षांपूर्वी पूर्व लडाखच्या समोरील बाजूस मोठ्या संख्येने सैन्य जमवले आणि भारताने जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) मानली होती, तिथे अनेक ठिकाणी घुसखोरी केली. पँगॉन्ग त्सोच्या उत्तर किनार्‍यावर फिंगर 4 सारख्या काही ठिकाणी, पीएलए सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर परिसर व्यापला आणि रणगाडे व तोफा यांच्या मदतीने तटबंदी तयार केली. डेपसांग प्लेनसारख्या भागात चिनी सैन्याच्या एका लहान तुकडीने भारतीय गस्ती पथकाला आपल्या पारंपरिक गस्ती केंद्रांवर जाण्यापासून रोखले होते.

पीएलएच्या या आक्रमकतेला भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देणे हे ओघाने आलेच आणि त्यानुसार 15 जून 2020 रोजी गलवान नदीवर जोरदार धुमश्चक्री झाली, त्यात दोन्ही बाजूला प्राणहानी झाली. 1975नंतर एलएसीवरील लष्करी कारवाईत झालेले ही पहिलीच प्राणहानी ठरली. भारतीय लष्कराने वेगवान हालचाली करत, वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पँगॉन्ग त्सोच्या दक्षिण किनार्‍यावरील कैलास पर्वतरांगेवर कब्जा केल्याने लगेच दोन महिन्यांनी, म्हणजे ऑगस्ट महिन्यात पुन्हा एलएसीवर तणाव निर्माण झाला.

गलवान, पॅंगॉन्ग त्सो आणि गोगरा येथील सैन्य माघारी घेतल्यानंतर येथील तणाव थोडीसा निवळला आहे. येथील पेचप्रसंग संपुष्टात जरी आला तरी, एलएसीवरील स्थिती 2020 पूर्वीसारखी पूर्ववत होणार नाही. याचे एक कारण म्हणजे, एलएसीवर घुसखोरी करून पीएलएने सुरुवातीला जसे धक्के दिले होते, त्याची पुनरावृत्ती भारताला परवडणारी नाही. पूर्व लडाखमधील या पेचप्रसंगातून अनेक धडे घेण्यासारखे आहेत. एलएसीजवळ पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत करण्याची तसेच गुप्तचर यंत्रणांची क्षमता वाढविण्याची अतिशय गरज आहे, हा एक महत्त्वाचा निष्कर्ष यातून समोर येतो.

लडाखसारख्या समुद्रसपाटीपासून अतिशय उंच आणि अतिशय थंडगार प्रदेश तसेच मध्य आणि पूर्व सेक्टरमधील पाणथळ भागांतून भारत-चीन दरम्यानची एलएसी जाते. भौगोलिकदृष्ट्या काहीसा धोकादायक हा प्रदेश आहे, म्हणूनच तिथे पाळत ठेवण्यासाठी परिपूर्ण अशी यंत्रणा उभारणे आव्हानात्मक ठरते. मात्र, तंत्रज्ञान आणि लष्करी तुकडीच्या सहाय्याने या अडचणींवर बऱ्यापैकी मात करू शकतो.

भारतीय लष्कराने एलएसीवर अतिरिक्त जवान पुन्हा तैनात केले आहेत. गस्त घालताना पाळत ठेवणे, चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चौक्या उभारणे अशी पावले उचलून येथील ताकद वाढवत येऊ शकते. तथापि, किती दूरपर्यंत लक्ष ठेवता येईल आणि सैनिक किती वेगाने हालचाल करू शकतात, याला काही मर्यादा आहेत. सैनिकांची दृश्यमानता वाढविण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रो-ऑप्टिकल उपकरणे, रडार आणि सहजगत्या लक्षात येणार नाही असे भूमीगत सेन्सर अशा प्रकारची मानवी आणि मानवविरहित टेहळणी प्रणाली उभारण्याची गरज आहे. ही टेहळणी यंत्रणा उंच टॉवर्स किंवा बांधलेल्या फुग्यांद्वारेही कार्यान्वित करता येईल.

चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसखोरी करू शकतील असे काही विशिष्टच मार्ग असल्याने केवळ त्यावरच लक्ष ठेवणारी टेहळणी यंत्रणा असली पाहिजे. संपूर्ण एलएसीवर पाळत ठेवणारी आवश्यकता नाही.

सध्या उपलब्ध तंत्रज्ञान ध्यानी घेता, या भूभागावर टेहळणी यंत्रणा कार्यान्वित करणे सुलभ आहे, असे वाटते. तथापि, एलएसीच्या आसपासचा भूभाग आणि हवामान हेच खरे मुख्य अडसर आहेत. अतिशीत तापमानाचा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो, तसेच काही तासांतच बॅटऱ्याही उतरतात. त्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्राने असा उपाय शोधला पाहिजे की, टेहळणी यंत्रणांना अखंडितपणे वीज उपलब्ध होऊ शकेल.

जमिनीवरील टेहळणी यंत्रणेला हवाई तसेच अंतराळ आधारित प्रणालीचेही पाठबळ मिळायला हवे. त्यात मिनी क्वाडकॉप्टर्सपासून हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स (एचएएलई) अशा मानवविरहित हवाई प्रणालीचा समावेश पाहिजे. उपग्रह तसेच हवाई दलाच्या विमानातून छायाचित्रण केल्यास संपूर्ण एलएसीवर बारकाईने लक्ष ठेवता येईल. भारताकडे केवळ लष्करासाठी असलेले उपग्रह नसल्याने मित्र राष्ट्रांशी गुप्त माहितीची देवाण-घेवाण तसेच व्यावसायिक उपग्रह छायाचित्रणाचा अवलंब केला पाहिजे.

मोठ्या प्रमाणावर डाटा अत्यंत गतीने ट्रान्समिशन करू शकेल, अशा कम्युनिकेशन नेटवर्कशी ही संपूर्ण टेहळणी यंत्रणा जोडणे आवश्यक आहे. याशिवाय, हे नेटवर्क लष्कराच्या संघटनात्मक पदश्रेणीच्या आधारे नसावे; अन्यथा ते ‘केवळ माहितीस्तव’ अशा मर्यादेत स्वरुपात राहील. उलट ते अशा प्रकारचे असावे की, विविध यंत्रणांकडून उपलब्ध प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक वापरकर्ते टेहळणी करू शकतील.

सर्वंकष टेहळणी यंत्रणा आपल्या बहुतांश समस्यांचे निराकरण करणारी असावी, जेणेकरून चिनी सैनिक पुन्हा अशा धक्कातंत्राचा वापर करणार नाहीत. शत्रूचा नेमका हेतू ओळखण्यासाठी सांकेतिक माहितीचा योग्य अर्थ लावला जात नाही, तोपर्यंत त्या माहितीचे काहीही महत्त्व नसते. उदाहरणार्थ, जानेवारी 2020मध्ये चिनी सैनिक मोठ्या संख्येने लडाखच्या समोरच्या भागात सैनिकी सराव करत असल्याचे लक्षात आले आणि त्याची नोंदही झाली. पण एलएसीच्या बाजूला तसेच ती ओलांडून लष्करी कारवाई करण्याचा चिनी सैनिकांचा हेतू तेव्हा उघड झाला नाही.

जेव्हा शत्रूंचा हेतू ओळखण्यात आपण यशस्वी ठरतो, तेव्हा गुप्तचर यंत्रणेने त्रोटक किंवा थोडीशी माहिती समोर आणलेली असते. तथापि, नुसती कच्ची माहिती देऊन चालणार नाही, तर तिचे विश्लेषण करून तशी व्यूहरचना करणे जास्त महत्त्वाचे आहे. मानव आधारित हेरगिरी महत्त्वाची असली तरी, गुप्त माहितीच्या विश्लेषणासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्त होत असल्याचे पाहायला मिळते. उदाहरणार्थ, युक्रेनमधील रशियन सेलफोनच्या ‘हिट मॅप’वरून रशियन सैन्याचे लक्ष्य काय आहे, याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. आर्टिफिशिअल इंटलिजन्स (AI) मोठ्या प्रमाणावर डाटा मिळवू शकते, आगामी संभाव्य घटनांचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्यास सहाय्यभूत ठरते. विरोधकांचा हेतू ओळखण्याची प्राथमिक जबाबदारी गुप्तचर यंत्रणांची असली तरी, इतरांनी देखील त्यात कार्यक्षमता दाखवत भूमिका बजावली पाहिजे. चीनमधील भारतीय दूतावासातील अधिकारी तसेच साऊथ ब्लॉकमध्ये चीनशी चर्चा करणारे भारतीय अधिकारी, हे दोन्ही देशांकडून मिळणारे संकेत जाणून घेत असतील. त्यामुळे आपल्या विचारांशी तसेच मूल्यांकनाशी न जुळणारे गुप्तचर अहवाल राजकीय आणि लष्करी नेतॄत्वाने बिनकामाचे किंवा बिन महत्वाचे समजू नयेत.

शत्रू राष्ट्रांनी अचानक खेळलेली चाल ही सरकारला सर्वाधिक पेचात टाकणारी तसेच लष्करासाठी मोठा धक्का देणारी ठरू शकते. अचूक निर्णय शक्तीसाठी उपयोगी पडणाऱ्या एकात्मिक कृती आणि गुप्तचर कारवायांचा उल्लेख जगभरातील लष्कराकडून आय एस आय (इंटेलिजन्स सर्व्हिलन्स आणि रिकाॅनाइसन्स) असा केला जातो. मे 2020मधील चिनी सैन्याच्या कृतीने भारतीय लष्कराला सीमा व्यवस्थापनाच्या संकल्पनेबाबत फेरविचार करण्यास भाग पाडले. एलएसीजवळ गुप्तचर यंत्रणा तसेच टेहळणी यंत्रणेचे संयुक्त कार्य होणे आवश्यक आहे.

(लेखक हे नॉर्दन कमांडचे निवृत आर्मी कमांडर आहेत.)

अनुवाद – मनोज शरद जोशी


Spread the love
Previous articleEnigma Of Agnipath In Defence Forces
Next articleAkasa Air Receives First Of Its 72 Aircraft from Boeing
Lt Gen DS Hooda (Retd)
Lieutenant General Deependra Singh Hooda, PVSM, UYSM, AVSM, VSM & Bar, ADC (born 12 November 1956) is the former General Officer Commanding-in-Chief of the Indian army's Northern Command.[1] The General Officer was the Northern Army Commander during the 'surgical strike' in September 2016. He is most prominently known for his views on Kashmir with a strong emphasis on human rights. With a career spanning forty years, he has served on both the Northern and Eastern borders of India.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here