तैवानवर ‘पोडुल’ चक्रीवादळाचे सावट; 5,000 लोकांना केले स्थलांतरित

0

तैवानमध्ये, बुधवारी दुपारी ‘पोडुल’ चक्रीवादळ (Podul Typhoon) धडकणार असल्याने, तैवानच्या दक्षिण आणि पूर्वेकडील अनेक मोठे भाग बंद ठेवण्यात आले आहेत. वादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी धोका प्रवण क्षेत्रातील शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, 5,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच शेकडो उड्डाणेही आज रद्द करण्यात आली आहेत.

तैवानमध्ये नियमितपणे टायफून येत असतात, जी सहसा पॅसिफिक महासागराकडे असलेल्या डोंगराळ आणि कमी लोकसंख्या असलेल्या पूर्व किनाऱ्यावरून येतात.

हवामान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यम क्षमतेचे हे ‘पोडुल’ चक्रीवादळ, ज्यामध्ये ताशी 191 किमी वेगाचे जोरदार वारे वाहत आहेत, तो अधिक तीव्र होऊन तैवानच्या दक्षिण-पूर्व भागातील ताईतुंग शहराकडे येत आहे आणि आज दुपारी जवळपासच्या भागात धडकण्याची शक्यता आहे.

मोबाईल संदेशाद्वारे सतर्कतेचा इशारा

बुधवारी सकाळी, ताईतुंगच्या काही भागांतील मोबाइल वापरकर्त्यांना एक मजकूर संदेश (text message) पाठवण्यात आला, ज्यात लिहिले होते की, “पोडुल टायफूनमुळे विनाशकारी वारे अपेक्षित आहेत. शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.” या संदेशात पुढील काही तासांत ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचे वारे वाहतील असा इशारा देण्यात आला होता.

एकूण नऊ शहरे आणि काही जिल्ह्यांनी, बुधवारी शाळा आणि कार्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये दक्षिण भागातील काओशुंग (Kaohsiung) आणि ताईनान (Tainan) या मोठ्या शहरांचा समावेश आहे. तैवानची आर्थिक राजधानी असलेल्या तैपेई (Taipei) शहरावर मात्र याचा कोणताही परिणाम झाला नाही.

जुलैमध्ये आलेल्या टायफूनमुळे, ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते आणि ज्यामध्ये तैवानच्या पश्चिम किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कामही प्रशासन करत आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, टायफून येण्यापूर्वी जवळपास 5,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम

बुधवारी, सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर तैवानच्या दोन मुख्य आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, चायना एअरलाइन्स आणि ईव्हीए एअर यांनी काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील रद्द केली आहेत.

तैवानमध्ये धडकल्यानंतर, हे वादळ तैवानच्या अधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर आठवड्याच्या शेवटी चीनच्या फुजियान (Fujian) प्रांताकडे जाण्याची शक्यता आहे.

सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत दक्षिण डोंगराळ भागात 600 मिमी (24 इंच) पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, दक्षिण भागातील काही ठिकाणी एका आठवड्यातच वर्षभराचा पाऊस झाला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि पूर आला होता, यात चार लोकांचा मृत्यू झाला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत–अमेरिका टॅरिफ तणाव, इंडो-पॅसिफिक ऐक्याला धक्का पोहचवेल का?
Next articleराफेलपासून ते पाणबुड्यांपर्यंत, प्रमुख संरक्षण खरेदीसाठी त्वरित निर्णयांची गरज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here