तैवान अमेरिकेसोबत लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या तयारीत…

0

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जाहीर केले की, ते परस्पर भेटी आणि लष्करी सरावांमधील सहभागाद्वारे, युनायटेड स्टेट्ससोबतचे आपले लष्करी सहकार्य वाढवण्याची योजना आखत आहे. आशिया-पॅसिफिकमधील वाढत्या सुरक्षा आव्हानांदरम्यान प्रादेशिक शांतता आणि स्थिरता मजबूत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

अन्य बहुतांशी देशांप्रमाणेच, अमेरिकेचे चीनने दावा केलेल्या तैवानसोबत कोणतेही औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत, परंतु अमेरिका तैवानचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय समर्थक आहे आणि कायद्यानुसार तैवानला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी साधने पुरवण्यास बांधील आहे.

संसदेला सादर केलेल्या एका अहवालात मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘युनायटेड स्टेट्स तैवानचा एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे.’

गुरुवारी, संरक्षण मंत्री वेलिंग्टन कू यांनी कायदेतज्ज्ञांच्या प्रश्नांना देण्यापूर्वी सांगितले की, “आमचे सशस्त्र दल तैवान-अमेरिका यांच्यातील संप्रेषण चॅनेल अधिक मजबूत करत आहे, तसेच संरक्षण आणि सुरक्षेवर बहु-डोमेन, बहु-स्तरीय धोरणात्मक सहकार्य पुढे नेत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “भविष्यात आम्ही हे सहकार्य टप्प्याटप्प्याने विस्तारण्याची आणि अधिक सखोल करण्याची योजना आखत आहोत.”

धोरणात्मक भागीदारी

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्या क्षेत्रांमध्ये उच्चस्तरीय धोरणात्मक आणि सुरक्षा धोरण संवाद आणि परस्पर भेटी, सरावांचे निरीक्षण आणि “तैवान सामुद्रधुनीमध्ये संयुक्तपणे शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी” ऑपरेशनल मुद्द्यांवरील चर्चा यांचा समावेश आहे.

दरम्यान, पेंटागॉनने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

तैवान आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्य आधीपासूनच दृढ आहे, ज्यामध्ये ॲरिझोना येथे तैवानच्या F-16 फायटर्सच्या पायलट्सना दिले जाणारे प्रशिक्षण सामाविष्ट आहे. परंतु, सहसा अशा उपक्रमांची संवेदनशीलता लक्षात घेता, ती सामान्य लोकांच्या नजरेपासून दूर ठेवली जातात.

चीनकडून वाढलेल्या लष्करी आणि राजकीय दबावाची तैवानने तक्रार केली आहे, ज्यात बेटाभोवती चीन करत असलेल्या नियमित युद्ध सरावांचा समावेश आहे.

तैवानच्या मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “चीन तथाकथित संयुक्त लढाऊ-सज्जता गस्त वापरून, “त्रास” देत आहे.

“या हालचालींचा उद्देश आमच्यावरील मानसिक दबाव वाढवणे, सामरिक प्रतिबंध आणणे, आमची संरक्षण क्षमता कमी करणे आणि तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला नकार देण्याची क्षमता प्रदर्शित करणे हा आहे. याद्वारे त्यांना एकत्रितपणे गंभीर प्रादेशिक सुरक्षा आव्हान निर्माण करायचे आहे.”

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने यावर कुठलीही त्वरित प्रतिक्रिया दिली नाही.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “ते गुप्तचर संसाधने आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण आणि सहकार्याच्या माध्यमांचा वापर करत आहे.” मंत्रालयाने पुढे जोडले की, “अशाप्रकारे तैवान चिनी लष्करी हालचालींना अधिक चांगल्या प्रकारे ट्रॅक करू शकतो, भविष्यातील संभाव्य कार्यवाहीचे मूल्यांकन करू शकतो तसेच, जलद प्रतिसाद सक्षम करण्यासाठी आणि अचानक हल्ला रोखण्यासाठी लवकर चेतावनी मिळवू शकतो.” मंत्रालयाने याबद्दल अधिक तपशील जाहीर केलेले नाहीत.

तैवानचे सरकार, बीजिंगचे सार्वभौमत्वाचे दावे फेटाळून लावते आणि ‘तैवानमधील लोकच त्यांचे भविष्य ठरवू शकतात,’ असे ठामपणे सांगतात.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)

+ posts
Previous articleअमेरिकन लष्कराचा संशयित ड्रग्जवाहू जहाजांवर हल्ला; पाच जणांचा मृत्यू
Next articleShift 97 Mk1A to Mk-2: Ex-IAF Chief’s Bold Call on LCA Orders

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here