उदयोन्मुख तंत्रज्ञान आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत आहे: लष्करप्रमुख

0
उदयोन्मुख तंत्रज्ञान
दिल्ली डिफेन्स डायलॉग 2025 मध्ये, सीओएएस- जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी भाषण केले.

मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेमध्ये आयोजित, ‘दिल्ली डिफेन्स डायलॉग’ च्या दुसऱ्या आवृत्तीचा नुकताच समारोप झाला. यावेळी, उदयोन्मुख तंत्रज्ञान भारताच्या संरक्षण क्षमतांचे स्वरूप कशाप्रकारे बदलू शकते, याविषयी आढावा घेण्यात आला.

तंत्रज्ञान हा ‘पर्याय’ नाही, ‘ताकद’ आहे

“भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण आणि नवीन युगातील तंत्रज्ञानाची भूमिका” या विषयावरील आपल्या भाषणात, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, “जरी तंत्रज्ञान आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलत असले तरी, मानवी नेतृत्व आणि भौगोलिक स्थिती हे निर्णायक घटक राहतील.”

आपले निरीक्षण नोंदवताना त्यांनी सांगितले, “आज जगभरात सुरू असलेले 50 हून अधिक संघर्ष, हे “वर्चस्व मिळवण्यासाठीच्या शर्यतीला” अधोरेखित करतात. यापैकी युक्रेन संघर्ष हा ड्रोन, जॅमिंग सिस्टीम आणि अचूक शस्त्रास्त्र वापराच्या वास्तविक वेळेतील चाचणीचे मैदान ठरतो आहे.”

पुढे ते म्हणाले की, “भारतीय लष्कर सध्या परिवर्तनाच्या दशकातून जात आहे, जे मनुष्य बळ आणि प्रगत तंत्रज्ञान यांना एकत्रित करणाऱ्या पाच स्तंभांवर आधारित आहे.” यावेळी त्यांनी ‘5Ps कृती योजना’ सादर केली, ज्यात लष्कराची कार्यपद्धती (Procedures), प्रक्रिया (Processes), पेटंट (Patents), लोक (People), आणि भागीदारी (Partnerships) चा समावेश आहे. या योजनेचा उद्देश, शिक्षण संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यातील निकट सहकार्यातून नवकल्पनांना गती देणे हा आहे.

संतुलनाच्या महत्वावर भर देताना द्विवेदी म्हणाले की, “भारतासाठी जमीन (भूप्रदेश) हेच कायम विजयाचे खरे चलन राहील. आमची ताकद नेहमीच आमच्या सैनिकांमध्ये असेल, ज्याला भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड दिली जाईल, मात्र त्यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही.”  आधुनिक युद्धाच्या उत्क्रांतीमध्ये लोकशाहीकरण, प्रसार आणि विघटन हे तीन घटक महत्वाचे असल्याचे, त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानावर आधारित नेतृत्वासाठी DRDO आग्रही

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) चे अध्यक्ष समीर व्ही. कामत, यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारत आता तंत्रज्ञान स्विकारणाऱ्याच्या भूमिकेतून – तंत्रज्ञानचे नेतृत्व करण्याच्या मार्गावर आहे.” त्यांनी यावेळी नमूद केले की, एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेकडून-बहुध्रुवीय व्यवस्थेकडे होणारे संक्रमण, हे भारताला जागतिक संरक्षण क्षेत्रात ‘नवकल्पनांचे मुख्य केंद्र’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी आहे.

कामत यांनी स्पष्ट केले की, “2024 मध्ये संरक्षण विभागाच्या 90 टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स या देशांतर्गत (स्वदेशी) विकसित प्रणालींसाठी होत्या. हा आकडा पूर्वीच्या मोठ्या प्रमाणावरील आयातीच्या तुलनेत मोठा बदल दर्शवतो.” स्वदेशी नवकल्पना आणि खासगी क्षेत्राचा सहभाग यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांनी पुढील पाच वर्षांत संरक्षण R&D खर्च एकूण संरक्षण अर्थसंकल्पाच्या 5.5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला.

त्यांनी DRDO मधील अनेक सुधारणांची देखील रूपरेषा दिली, ज्यामध्ये दुहेरी विकास-आणि-उत्पादन भागीदार (DCPP) मॉडेल स्वीकारणे, MSMEs (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) आणि स्टार्ट-अप्सना पाठिंबा देण्यासाठी तंत्रज्ञान विकास निधीचा विस्तार करणे आणि प्रमुख शिक्षण संस्थांमध्ये 15 ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन करणे, यांचा समावेश आहे.

तरुण वैज्ञानिकांना पाठबळ देण्यासाठी, DRDO ने 5 ‘Young Scientist Laboratories’ ची स्थापना केली आहे, ज्यांचे नेतृत्व 35 वर्षांखालील संचालकांद्वारे केले जाते. या प्रयोगशाळा क्वांटम कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मानवी आणि मानवरहित टीम वर्क यांसारख्या विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करतात.

उद्योग, स्टार्टअप्स आणि आत्मनिर्भरतेचा संकल्प

संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीव कुमार यांनी, त्यांच्या भाषणात सांगितले की, “भारताचा आत्मनिर्भरतेचा संकल्प: नवकल्पना, आंतर-क्षेत्रीय सहकार्य, उद्योग आणि नवसंशोधकांना एकत्रित करण्यासाठी एका स्पष्ट सिद्धांताद्वारे प्रेरित असला पाहिजे. ते म्हणाले की, “आपण तंत्रज्ञान, नेतृत्व आणि सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचे संयोजन किती प्रभावीपणे करतो, यावर आपली संरक्षण क्षमता अवलंबून आहे.”

नवीन युगातील तंत्रज्ञानाचा जलद अवलंब करण्यासाठी, नागरी-लष्करी एकत्रीकरण, खरेदी प्रक्रियेतील सुलभता आणि भक्कम नवोन्मेष पाईपालाईनची निर्मिती, यांचे महत्त्व तज्ज्ञांनी यावेळी अधोरेखित केले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleलॅटिन अमेरिकेशी संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारताचे नवे पाऊल
Next articleहवाई दल प्रमुखांनी C-130J विमानातून उड्डाण करत केले न्योमा एअरफील्डचे उद्घाटन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here