भविष्यातील युद्धांसाठी ‘तंत्रज्ञान’ हेच प्रमुख शस्त्र: CDS अनिल चौहान

0

‘भारतातील तरूण पिढी आणि त्यांनी विकसीत केलेले आत्याधुनिक तंत्रज्ञान हे, भारताच्या उज्वल भवितव्याचा पाया आहेत’, असे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. आयआयटी बॉम्बे येथे आयोजित ‘टेकफेस्ट 2025’ (TechFest 2025) या कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी भारतातील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक युद्धभूमीच्या बदलत्या स्वरूपाचा आढावा घेतला. 

“आपल्याकडील तरूणांमध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्राला अद्ययावत तंत्रज्ञानाशी जोडण्याची ताकद आहे, त्यांच्यामध्ये आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे, आणि आपण एकत्र मिळून हे स्वप्न साकार करू” असे चौहान यावेळी म्हणाले.

 “उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान हैं आँखें, हर तरफ के जज्बात का ऐलान हैं आँखें, शबनम कभी, शोला कभी, तूफान हैं आँखें,” या कवितेच्या ओळी भारतातील नागरिकांना, विशेषत: नव्या पिढीला समर्पित आहेत” असे म्हणत, “कुठल्याही देशाची नवी पिढी हीच त्या राष्ट्राची ढाल असते, देशातील सुजाण नागरिक हेच देशाच्या संरक्षणाची पहिली फळी असतात” असे त्यांनी नमूद केले.

सुजाण, सतर्क आणि काहीतरी नवीन करुन दाखवण्याची जिद्द असलेले लोकच राष्ट्राच्या संरक्षणामध्ये, राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देतात, आणि टेकफेस्ट सारखे कार्यक्रम अशाच लोकांच्या नवकल्पनांना आणि प्रयत्नांना प्रेरित करतात, असे ते म्हणाले.

त्यांनी भारताचे धोरणात्मक संरक्षण उद्दिष्ट, तंत्रज्ञानाचा विकास, तिन्ही दलांचे एकत्रीकरण, भविष्यातील युद्ध आणि नाविन्यता, या विषयांचा देखील यावेळी आढावा घेतला.

चौहान म्हणाले की, “युद्धकला ही मानवी संस्कृती इतकीच जुनी आहे. वर्चस्व मिळवण्याची धडपड आणि आपल्याला हवे ते साध्य करण्यासाठी प्रसंगी केलेला हिंसेचा वापर, हे सर्व मूळ मानवी स्वभावाचा भाग आहेत. मानवी सभ्यतेचा जन्म झाल्यापासून युद्ध अस्तित्वात आहे. मात्र, जसे जग हळूहळू बदलत गेले, तसे युद्धाचे स्वरूपही बदलत गेले.”

त्यांनी पुढे जोडले की, “लढाई ही समाजाच्या उत्क्रांतीसोबत विकसित झाली आहे. जेव्हा माणूस शिकारी होता, तेव्हा लहान लहान टोळ्यांमध्ये युद्ध होत असत, जसा समाज कृषी युगाकडे वळला, तसतसे युद्धामध्ये सरंजामी प्रमुखांच्या हाताखालील सशस्त्र टोळ्यांचा आणि त्यानंतर राजे आणि सम्राटांच्या संघटित सैन्याचा समावेश झाला. औद्योगिक युगासह राष्ट्रांची आधुनिक सशस्त्र दले विकसीत झाली, जी संरचित, व्यावसायिक आणि उद्योग-सक्षम होती. राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी त्यांचे संघटन केले गेले.”

तथापि, सध्या आपण अशा युगाकडे पाहत आहोत, जिथे राष्ट्राची रचना करणारे मूलभूत घटक किंवा ज्याला आपण राज्याचे सार्वभौमत्व म्हणतो, त्यांना विविध बदलांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सीमा ओलांडून होत असलेली लोकांची मुक्त हालचाल, पैसा, व्यापार, डिजिटल चलने, वैयक्तिक विचार आणि संघटित विचारधारा यामुळे सार्वभौमत्वाच्या संकल्पनेला आणि समजुतीलाच आव्हान मिळत आहे.

आज आपल्याकडे देशांची संघटित सशस्त्र दले आहेत, तसेच आपल्याकडे खाजगी सुरक्षा संस्था आहेत ज्या युद्धात सहभागी होतात. याशिवाय आपल्याकडील नागरिक, नेटिझन्स डिजिटल डोमेनमध्ये कार्यरत आहेत. आपल्याकडे संज्ञानात्मक (cognitive) क्षेत्रात धारणा घडवणारे सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत. त्यामुळे युद्धाचे रिंगण अनेक पटींनी आणि विविध पातळ्यांवर विस्तारले आहे.

जर आपण इतिहास पाहिला तर प्राचीन आणि मध्ययुगीन युद्धे, ही केवळ जमीनीवर अर्थात रणांगणावर लढली जायची, मात्र आज जमिनीपासून ते सागरी क्षेत्रापर्यंत आणि हवाई मार्गांपर्यंत युद्धभूमी विस्तारली आहेत आणि भविष्यातील युद्धे ही तंत्रज्ञानावर आधारित असतील, ज्याचे प्रत्युत्तर आपल्याला शत्रूपेक्षा अधिक अद्ययावत तंत्रज्ञानानेच द्यावे लागेल.

ते पुढे म्हणाले की, “आज आपण एका अशा युगाच्या उंबरठ्यावर आहोत, जिथे युद्ध काही नव्या आणि फारशा ज्ञात नसलेल्या क्षेत्रांमध्येही विस्तारत आहेत, जसे की सायबर (Cyber), अवकाश (space), इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि संज्ञानात्मक क्षेत्र (cognitive domain).

ही युद्धाची नवीन क्षेत्रे आहेत, जी आता केवळ लष्करी क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. आपण दररोज त्यांच्यावर अवलंबून असतो, ज्यामुळे ती भविष्यातील कोणत्याही युद्धासाठी महत्त्वपूर्ण आणि स्पर्धात्मक घटक ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले. 

“जेव्हा मी जुनी युद्धक्षेत्रे असा उल्लेख करतो तेव्हा त्यामध्ये जमीन, सागरी क्षेत्र आणि हवाई क्षेत्रातील युद्ध येतात, जी नेहमीच क्रूर आणि दीर्घकाळ टिकणारी असतात, ज्यामध्ये मनुष्यबळ, सामग्री, वेळ, पैसा आणि नैसर्गिक संसाधनांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होतो. आधुनिक युद्धातील याची दोन प्रमुख उदाहरणे म्हणजे युक्रेनचे युद्ध, जे चार वर्षांहून अधिक काळ चालले आहे आणि सुमारे तीन वर्षांपासून सुरू असलेले गाझा युद्ध.”

त्यांनी नमूद केले की, “भविष्यात होणारी युद्ध मात्र ही तोफखाने, रणगाडे, विमाने यांच्यापलीकडे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित युद्ध असतील, ज्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानात अप-टू-डेट राहणे आवश्यक आहे, जे आपण नवकल्पना (innovation), एकत्रीकरण आणि युद्धाच्या नवीन क्षेत्रांचा समावेश करून साध्य करू शकतो.”

ते पुढे म्हणाले की, नवीन क्षेत्रांमधील युद्ध ही वेगवान आणि स्मार्ट आहेत. त्यांचा कालावधी कमी आहे, मात्र युद्धाचा वेग (tempo) खूप जास्त आहे. यामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया अगदी कमी वेळात पूर्ण केली जाते आणि त्यादृष्टीने त्वरित कृती केली जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसून आले. 

“ही युद्ध मोहीम केवळ चार दिवस चालली, मात्र या कालावधीतही तिने भारताला निर्णायक विजय मिळवून दिला. युद्धाची ही गतिशीलता इस्रायल-इराण संघर्षात देखील दिसून आली, जिथे नवीन क्षेत्रांतील कृती; विशेषतः सायबर-सक्षम ISR (इन्फर्मेशन सर्व्हिलन्स अँड रिकॉनिसन्स), माहितीवर आधारित ऑपरेशन्स आणि लांब पल्ल्याच्या अचूक निशाण्यांमुळे धोरणात्मक परिणाम दिसून आले.”

चौहान म्हणाले की, ही नवीन युद्ध क्षेत्रे अशी आहेत, जिथे तुम्ही प्रत्यक्षात शत्रू राष्ट्रांमध्ये ‘सिमेट्री’ (असमानता) निर्माण करू शकता आणि त्याआधारे युद्ध जिंकू शकता. जमिनीवरील युद्धात हे करणे तसे कठीण आहे, कारण प्रत्येक प्रकारचे युद्ध प्लॅटफॉर्म्स शेकडो वर्षांपासून बऱ्यापैकी आहेत तसेच आहेत, परंतु सायबरस्पेस सारख्या नवीन क्षेत्रांमध्ये तुम्ही हे साध्य करू शकता.

‘मल्टी-डोमेन ऑपरेशन्स हा आता पर्याय राहिला नसून, गरज बनली आहेत,’ यावर जोर देत त्यांनी सांगितले की, जिथे एका क्षेत्राचे परिणाम दुसऱ्या क्षेत्रावर त्वरित जाणवतील अशी बहुआयामी युद्धपद्धती विकसीत करण्याची गरज आहे. मल्टी-डोमेन ऑपरेशन्ससाठी मल्टी-डोमेन क्षमता आणि क्रॉस-डोमेन कमांड तसेच कंट्रोलची देखील आवश्यकता असेल. यासाठी केवळ लष्करी, नौदल आणि हवाई दलामध्येच नव्हे; तर सायबर क्षेत्र, अंतराळ क्षेत्र आणि संज्ञानात्मक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दलांमध्येही व्यापक समन्वय आणि नियंत्रण वाढवणे आवश्यक असेल.

ते पुढे म्हणाले की, “आपण अशा एका युगात प्रवेश करत आहोत जिथे, ‘काँटॅक्ट वॉरफेअर’ (थेट संपर्क युद्ध) आणि नॉन-काँटॅक्ट प्रकारच्या युद्धाचे मिश्रण असेल, जो प्रकार युरोपमधील काही ऑपरेशन्समध्ये पाहायला मिळाला. भविष्यात कायनेटिक वॉरफेअर आणि नॉन-कायनेटिक वॉरफेअरचे मिश्रण असेल, ज्यामध्ये नॉन-कायनेटिक वॉरफेअर सायबर आणि संज्ञानात्मक क्षेत्रात कार्यरत असेल.”

त्यांनी यावेळी उल्लेख केला की, राष्ट्राचे राजकीय हित हे नेहमीच सर्वोच्च असते. लष्करी कारवाया या राजकीय परंपरांच्या अधीन असतात आणि हे एक उघड सत्य आहे, विशेषतः भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये हा प्रभाव अधिक आहे. जर आपण या जगातील आपल्या सभोवतालचे संघर्ष पाहिले, तर आपल्याला दोन विरोधाभासी प्रकारचे संघर्ष आढळतात.

प्रथम, वाद मिटवण्यासाठी लष्करी शक्ती वापरण्याची वाढलेली प्रवृत्ती- जे युक्रेन, आर्मेनिया, सीरिया, इराण, गाझा, सुदान, आफ्रिका, थायलंड, कंबोडिया इत्यादी ठिकाणी दिसून येते, जिथे राष्ट्रांना बळाचा वापर करून त्यांची राजकीय उद्दिष्टे साध्य करायची आहेत.

ते म्हणाले की, “जेव्हा मी युद्ध म्हणतो, तेव्हा मी ‘घोषित युद्ध’ आणि ‘अघोषित युद्ध’ या दोन्ही प्रकारांविषयी बोलतो. युद्ध सातत्याने होत आहेत आणि हे दोन त्यातीलच विरोधाभासी ट्रेंड आहेत. राजकीय निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी ताकदीचा वापर केला जात आहे, परंतु तो ‘कॅलिब्रेशन’सह (मोजून-मापून) केला जात आहे. यामुळे अनौपचारिक किंवा अघोषित युद्धे निर्माण होतात. राष्ट्रांची पूर्ण-प्रमाणातील युद्धात किंवा घोषित युद्धात प्रवेश करण्याची इच्छा नसणे, जो जागतिक महायुद्ध II किंवा 1970 च्या युद्धातील ट्रेंड होता, त्याने आणखी दोन युद्ध प्रकारांना जन्म दिला आहे, ज्यातील एक मुख्य प्रकार म्हणजे दहशतवाद, ज्याने भारताला गेल्या अनेक वर्षांपासून रक्तबंबाळ केले आहे. मला वाटते की, “अशा प्रकारच्या युद्धाला केवळ ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या कृतींनीच रोखले जाऊ शकते.”

यातील दुसरा प्रकार म्हणजे ‘ग्रे झोन वॉरफेअर’, ज्यामध्ये ऐतिहासिक मतभेदांना लहान ऑपरेशन्सद्वारे वगळले जाऊ शकते, जे तुम्हाला दीर्घकालीन फायदे देऊ शकतात. आता प्रश्न असा आहे की, भारताने कोणत्या प्रकारच्या धोक्यांसाठी आणि आव्हानांसाठी तयार राहावे?

मला वाटते की, आपले शत्रू दोन प्रकारचे आहेत, एक अण्वस्त्र सज्ज राष्ट्रे आहे आणि दुसरी अण्वस्त्रधारी राष्ट्रे. म्हणूनच, आपण दोन्ही बाजूंनी निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध राहणे आणि त्यांचा सामना करण्याकरिता तयार असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

माझ्या मते, आपण दहशतवादाला आळा घालण्यासाठी कमी कालावधीच्या आणि उच्च-तीव्रतेच्या संघर्षांसाठी तयार असले पाहिजे, जसे की ‘ऑपरेशन सिंदूर’. दुसरे म्हणजे, आपण भूभागावरील केंद्रित आणि दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षासाठी तयार असले पाहिजे, कारण काही देशांसोबतचे आपले सीमावाद अजूनही कायम आहेत.

तिसरे म्हणजे, आपण नवीन क्षेत्रांचा फायदा करुन घेतला पाहिजे आणि कमकुवत शत्रूसोबत असामनता निर्माण करण्याच्या तत्वावर लढले पाहिजे. युद्धाच्या परिस्थितीत दहशतवादाचा धोका पुढेही कायम असेल, त्यामुळे त्याला संरक्षणात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही प्रकारातील प्रतिसाद देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे.

कुठलेही युद्ध जिंकण्यासाठी, प्रत्यक्षात आपल्याला प्रभावी ‘रणनीती’ (strategy) आखणे खूप गरजेचे आहे. रण म्हणजे युद्धभूमी आणि नीती म्हणजे धोरण. भारत अधिक सक्षम रणनीती आखण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, “आज अर्थातच आपण रणनीतीचा वापर व्यापक अर्थाने करतो, आपण व्यवसायिक रणनीती किंवा आर्थिक रणनीतीबद्दल बोलतो. परंतु मूलतः रणनीती म्हणजे उपलब्ध साधनांच्या आधारे उद्दिष्टे जुळवण्याचा प्रयत्न करणे.”

शतकानुशतके, रणनीती एका गोष्टीवर अवलंबून राहिली आहे, ती म्हणजे त्या देशातील भौगोलिक स्थिती किंवा तिथला भूप्रदेश. आजवरचा इतिहास पाहिला, तर भूप्रदेशाच्या काळजीपूर्वक आणि रणनैतिक वापरामुळे छोट्या लढायांपासून ते मोठ्या मोहिमांमध्ये निर्णायक निकाल मिळाले आहेत. तुम्ही कोणतीही लढाई पाहा, भूप्रदेश हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. अलीकडे प्रादेशिक आणि भौगोलिक समस्यांवर देखील तंत्रज्ञानाने मात केली असून, त्यामुळे लष्करी कारवायांमध्ये क्रांती घडत आहे, असे त्यांनी नमूद केले.

येणाऱ्या काळातील आधुनिक युद्धांचा सामना करण्यासाठी, आपण संरक्षण यंत्रणांमध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समावेश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, आणि यासाठी भारतातील उभरत्या तंत्रज्ञान निर्मात्यांची आणि त्यांच्या नवकल्पनांची साथ आम्हाला मिळते आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच, तंत्रज्ञानाशी जोडलेल्या नव्या पिढीला देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीसाठी हातभार लावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

संकलन- वेद बर्वे

+ posts
Previous articleIndia, UAE Troops Hone Urban Warfare Skills in Exercise Desert Cyclone-II
Next articleChina Deploys Over 100 ICBMs Near Mongolian Border: Pentagon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here