हॉटेलमधील परदेशी नागरिकांची हत्या सायनाइडमुळे : थायलंडचा दावा

0
परदेशी
17 जुलै, 2024 रोजी बँकॉक, थायलंड येथील लुम्पिनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रँड हयात एरावान हॉटेलमधील एका खोलीत मृतावस्थेत आढळलेल्या सहा परदेशी नागरिकांच्या प्रकरणानंतर पत्रकार परिषदेत मेट्रोपॉलिटन पोलिस ब्युरोचे उपायुक्त, पोलिस मेजर जनरल नोपासिन पून्सावत बोलत आहेत. (रॉयटर्स)

थाई अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या सहा परदेशी लोकांचे मृतदेह बँकॉकच्या आलिशान हॉटेलमध्ये सापडले, त्यांचा मृत्यू सायनाइडच्या विषामुळे झाला आहे.
मृतांमध्ये संशयित मारेकऱ्याचाही समावेश आहे.

पोलीस आणि रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की मृतदेहांच्या शवविच्छेदनादरम्यान आणि ग्रँड हयात एरावान हॉटेलमधील खोलीत – जिथे मंगळवारी रात्री उशिरा मृतदेह सापडले होते – पिण्याच्या ग्लासेसवर आणि चहाच्या भांड्यावर अतिशय जलद गतीने कार्यक्षम बनणाऱ्या, प्राणघातक रसायनाचे अंश सापडले. पोलिसांनी सांगितले की, मृत्यू पावलेल्या तीन महिला आणि तीन पुरुषांच्या नातेवाईकांनी सांगितले की,  गुंतवणुकीशी संबंधित कर्जावरून त्यांचा आपसात वाद झाला होता.

सायनाइड कसे मिळाले याचा पोलीस तपास करत आहेत.

मृत पावलेले सहाजण व्हिएतनामी वंशाचे होते. त्यापैकी दोघे अमेरिकेचे नागरिक होते. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने तपासात मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

“आम्ही असे गृहीत धरू शकतो की या सहाजणांचा मृत्यू सायनाइडमुळे झाला आहे,” असे चुलालोंगकोर्न रुग्णालयाच्या कोर्नकियात वोंगपायसर्नसिन यांनी पत्रकारांना सांगितले. पुढील चाचण्यांचे निकाल शुक्रवारी उपलब्ध होतील असेही ते पुढे म्हणाले.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की या संपूर्ण घटनाक्रमावर ते लक्ष ठेवून आहेत आणि स्थानिक अधिकारी पुढील तपासासाठी जबाबदार आहेत.

व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टी केली की मृतांपैकी चार व्हिएतनामी नागरिक होते आणि थायलंडमधील त्यांचे दूतावास अधिकारी या सगळ्या प्रकरणात उत्तम समन्वय साधत होते.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते फाम थू हँग म्हणाले की, आम्हाला आशा आहे की पीडितांचे कुटुंबीय लवकरच या मोठ्या दुःखावर मात करू शकतील.

एरावान समूह इआरडब्लू.बीकेद्वारा संचालित ग्रँड हयात एरावानमध्ये 350 हून अधिक खोल्या असून लक्झरी खरेदी आणि रेस्टॉरंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या लोकप्रिय पर्यटन जिल्ह्यात या हॉटेलची उभारणी करण्यात आली आहे.

सहा पर्यटकांच्या मृत्यूची बातमी थायलंडसाठी एक मोठा धक्का असू शकतो. महामारीनंतर घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी थायलंड महत्त्वपूर्ण अशा पर्यटन क्षेत्राकडे मोठ्या आशेने बघत आहे.

या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सरकार उत्सुक आहे कारण यंदा 3 कोटी 50 लाख परदेशी पर्यटक आणि कोट्यवधी डॉलर्स खर्च अपेक्षित असलेल्या पर्यटनक्षेत्रावर या बातमीचा वाईट परिणाम होऊ शकतो अशी सरकारला चिंता वाटते.

थाई पोलिस पुरावा कार्यालयाचे कमांडर त्रिरोंग फिवपन म्हणाले की, तपासात असे दिसून आले आहे की हॉटेलच्या खोलीतील पेयांमध्ये मृतांपैकी एकाने सायनाइड मिसळले होते.

“कर्मचाऱ्यांनी चहाचे कप, गरम पाण्याच्या दोन बाटल्या, दूध आणि चहाची भांडी ताब्यात घेतल्यानंतर… या सहाजणांपैकी एकाने सायनाइड आणले होते याला पुष्टी मिळाली.”

तृप्ती नाथ
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleDmitry Medvedev: Ukraine Joining NATO Would Mean War
Next articleCoast Guard Conducts Sea-Air Operation to Rescue Boat Off Kerala Coast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here