मालदीवमधून भारतीय सैनिकांची शेवटची तुकडीही परतली

0
मालदीव
मोइझ्झू आणि मोदी यांची कोप28 दरम्यान झालेल्या भेटीचे संग्रहित छायाचित्र

राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमधून भारताने आपले सर्व सैनिक माघारी घेतले, असे मालदीव सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी यापूर्वी दिलेली 10 मेची मुदत लक्षात घेऊन भारताने त्याआधीच आपल्या सैन्याची शेवटची तुकडी मालदीवमधून माघारी बोलावली.

चीनचे खंदे समर्थक नेता म्हणून ओळखले जाणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आपल्या देशातून भारतीय लष्करी जवानांना माघारी बोलावण्याची मुदत 10 मे निश्चित केली होती. गेल्या वर्षी राष्ट्रपतीपदाच्या प्रचारादरम्यान मुइझ्झू सरकारच्या प्रमुख आश्वासनांपैकी भारतीय लष्कर मालदीवमध्ये असणार नाही हे एक होते.

राष्ट्रपती कार्यालयाच्या मुख्य प्रवक्त्या हीना वलीद यांनी माध्यमांशी बोलताना मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली आहे, या बातमीत तथ्य असल्याचे सांगितले. पण या तुकडीत नेमके किती सैनिक होते याची अचूक संख्या त्यांनी दिली नाही. तैनात असलेल्या सैनिकांच्या संख्येबद्दलचा तपशील नंतर जाहीर केला जाईल, असे त्या म्हणाल्या.

मालदीवने यापूर्वी सरकारी निवेदनात म्हटले होते की, देशात तैनात असलेल्या एकूण भारतीय सैनिकांपैकी 51 सैनिकांना सोमवारी भारतात परत पाठवण्यात आले. यापूर्वी सरकारने अधिकृत कागदपत्रांचा हवाला देत मालदीवमध्ये 89 भारतीय सैनिक उपस्थित असल्याची घोषणा केली होती.

मुइझ्झू यांनी सैन्य माघारीसाठी 10 मेची मुदत निश्चित केल्यानंतर, कोणताही संघर्ष टाळण्यासाठी भारताने या तारखेपूर्वी आपले सैन्य देशातून माघारी घेण्याचे मान्य केले.

गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारतीय कर्मचाऱ्यांची पहिली आणि दुसरी तुकडी याआधीच भारतात परतली असून आता तीन भारतीय विमानचालन मंच चालवण्यासाठी सक्षम भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्रमंत्री मुसा जमीर यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या एकाच दिवसात या घडामोडी घडल्या. या दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि मालदीवचे द्विपक्षीय संबंध तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यांवर व्यापक चर्चा झाली.

या बैठकीबाबत बोलताना जमीर म्हणाले की, दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी राष्ट्रपती मुइझ्झू लवकरच नवी दिल्लीला भेट देण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली.

हिंद महासागर प्रदेशात मालदीव हा भारताचा प्रमुख सागरी शेजारी आहे आणि ‘सागर’ (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) आणि मोदी सरकारच्या ‘नेबरहूड फस्ट’ यासारख्या उपक्रमांमध्ये त्याला विशेष स्थान आहे.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थेच्या इनपुट्सह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here