पाच वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार

0
यात्रा
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 27 जानेवारी रोजी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री यी यांच्याशी चर्चा केली

द्विपक्षीय संबंध सुरळीत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, भारत आणि चीन यांनी कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यास आणि दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाण सेवा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या बीजिंग दौऱ्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली, जिथे त्यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे मंत्री लियू जियानचाओ यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत राजकीय, आर्थिक आणि लोकांमधील परस्पर संबंध तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) दीर्घकालीन तणाव हे मुद्दे केंद्रस्थानी होते.

तिबेटमधील कैलास पर्वत आणि मानसरोवर यात्रा ही कोविड-19 महामारी आणि गलवान चकमकीनंतर सीमेवरील तणावामुळे 2020 मध्ये स्थगित करण्यात आली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) निवेदनात म्हटले आहे की, 2025 च्या उन्हाळ्यात ही तीर्थयात्रा पुन्हा सुरू होईल आणि विद्यमान करारांच्या आधारे संयुक्त यंत्रणेद्वारे यासाठीचा तपशील निश्चित केला जाईल.

द्विपक्षीय मुद्यांवर नव्याने संवाद

भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांच्या चीन भेटीत परराष्ट्र सचिव आणि उपमंत्री यांच्यात बैठक झाली, जी प्रमुख द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोबरमध्ये कझान येथील बैठकीत झालेल्या कराराच्या प्रगतीचा या चर्चेत आढावा घेण्यात आला. विश्वासाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि संबंध स्थिर करण्यासाठी लोक-केंद्रित उपक्रमांच्या महत्त्वावर दोन्ही बाजूंनी भर दिला.

या यात्रेच्या जोडीला, भारत आणि चीन यांनी सीमापार नद्यांसंदर्भात सहकार्य पुनरुज्जीवित करण्यासही सहमती दर्शवली. जलशास्त्रीय माहितीची देवाणघेवाण आणि पाण्याशी संबंधित इतर सहकार्य पुन्हा सुरू करण्यासाठी भारत-चीन तज्ज्ञ स्तरावरील यंत्रणेची लवकर बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. नदीच्या संदर्भात वरच्या भागातील एक देश म्हणून चीनचे स्थान लक्षात घेता, तिथून भारतात वाहत येणाऱ्या नद्यांवरील कोणत्याही बांधकामासंदर्भात निर्माण होणारे संभाव्य वाद कमी करण्यासाठी काळजीपूर्वक समन्वय साधणे आवश्यक आहे.

“दोन्ही बाजूंनी 2025 च्या उन्हाळ्यात कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला; संबंधित यंत्रणा विद्यमान करारांनुसार तसे करण्याच्या पद्धतींवर चर्चा करेल. सीमेपलीकडील नद्यांशी संबंधित जलशास्त्रीय माहितीची तरतूद आणि इतर सहकार्य पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारत-चीन तज्ञ स्तरीय यंत्रणेची लवकर बैठक घेण्याचेही त्यांनी मान्य केले,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

लोकांमधील परस्पर व्यवहारांवर भर

दोन्ही देश प्रसारमाध्यमे आणि विचारवंतांच्या संवादासह लोकांमधील परस्पर यवहार वाढवण्यासाठी देखील वचनबद्ध आहेत. एमईएच्या म्हणण्यानुसार, भारत आणि चीन यांनी थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्वतः सहमती दर्शविली असून तांत्रिक अधिकारी लवकरच यासंदर्भात नवीन नियमावली तयार करण्याच्या उद्देशाने वाटाघाटी करणार आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील लोकांमधील संपर्क आणि परस्परसंवाद अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.

“दोन्ही देशांमध्ये थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यावर त्यांनी तत्वतः सहमती दर्शवली; दोन्ही बाजूंचे संबंधित तांत्रिक अधिकारी लवकरात लवकर भेटतील आणि या उद्देशासाठी अद्ययावत आराखड्यावर बोलणी करतील,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

सीमेवर स्थिरताः परिस्थिती सामान्य होण्याची पूर्वअट

चीनबरोबरचे संबंध सामान्य होणे हे सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थिरतेवर अवलंबून आहे, यावर भारताने सातत्याने भर दिला आहे. डेमचोक आणि डेपसांग येथील सैन्यमाघारीच्या संदर्भात अलीकडील प्रगतीमुळे भारतीय आणि चिनी सैनिकांना सुमारे साडेचार वर्षांच्या विरामानंतर गस्त घालण्याचे काम पुन्हा सुरू करता आले आहे. अर्थात आव्हाने कायम आहेत आणि दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील निराकरण न झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संवाद सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे.

“एकमेकांसाठी अर्धा रस्ता पार करा”

चीनचे परराष्ट्रमंत्री यी यांनी भारत आणि चीन यांनी “एकमेकांसाठी अर्धा रस्ता पार करण्याची” तयारी आणि एकमेकांबद्दल कायम संशय घेण्याऐवजी परस्पर सामंजस्य आणि पाठिंब्याच्या दिशेने काम करण्याची गरज अधोरेखित केली. चीनचे भारतातील राजदूत झु फेहोंग यांनी एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, “चीन आणि भारताने या संधीचा फायदा घेत, परकेपणा आणि परस्पर संबंध कमी होण्याऐवजी ठोस उपाय शोधले पाहिजेत आणि संबंधांमध्ये सुधारणा साध्य करण्यासाठी वचनबद्ध झाले पाहिजे.”

पुढील वाटचाल

कैलाश मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणे आणि थेट विमान उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय हे दोन्ही देशांमधील विश्वासाच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वपूर्ण पावले आहेत. हे उपाय नेतृत्व पातळीवरील एक सामायिक स्वीकृती प्रतिबिंबित करतात की लोकांमधील परस्परसंबंध एकूण द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आधारस्तंभ म्हणून काम करू शकतात. मात्र, दीर्घकालीन समस्या, विशेषतः सीमेवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी निरंतर संवाद आणि ठोस कृतींवरच शाश्वत प्रगती अवलंबून असेल.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articlePurchase More US Defence Equipment: Trump To Modi
Next articleAero India 2025: MBDA Woos India With Cutting-Edge Missiles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here