रशियातील महत्त्वाचे विरोधी पक्षनेते, ॲलेक्सी नवाल्नी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (1 मार्च) दुपारी मॉस्कोच्या बोरिसोव्स्कोये स्मशानभूमीत एका छोट्या चर्च सेवेनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. कडेकोट सुरक्षा व्यवस्था या वेळी ठेवण्यात आली होती. हातात फुले घेऊन हजारो मॉस्कोवासी अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगेत उभे राहून नवाल्नीच्या नावाचा जयघोष करत होते.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे कठोर टीकाकार असलेल्या 47 वर्षीय नवाल्नी यांचा 16 फेब्रुवारीला पश्चिम सायबेरियातील खार्प या दुर्गम भागातील आय. के. 3 पोलर वुल्फ या तुरुंगात मृत्यू झाला. नवाल्नी पाय मोकळे करण्याासाठी गेले होते. थोडं फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर ते अचानक कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. फसवणूक, घोटाळा आणि अतिरेकी कारवायांसाठी दोषी ठरवल्यामुळे ते 19 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. 2020 मध्ये त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. फ्लाइटमध्येच बेशुद्धावस्थेत सापडल्यामुळे, विमानाचे जर्मनीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तिथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुतीन यांच्याच सांगण्यावरून आपल्यावर विष प्रयोग झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. बरे झाल्यानंतर, अटकेची धमकी असूनही 2021 मध्ये नवाल्नी रशियाला परतले. रशियात पाऊल ठेवताच लष्कराने त्यांना अटक केली. नवाल्नी यांच्या मृत्यूला अध्यक्ष पुतीन जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय आणि जगभरातील नेत्यांनी केला होता.
“रासायनिक तपासणी”चे कारण देत अधिकाऱ्यांनी नवाल्नी यांचा मृतदेह आठवड्यापेक्षा जास्त काळ त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यास नकार दिला होता. नवाल्नीचे दफन गुप्तपणे केले जावे अशी वारंवार मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आई ल्युडमिला नवाल्नी यांनी नकार दिल्याचे पत्नी युलिया नवाल्नी यांनी 23 फेब्रुवारी रोजी जाहीर केले. त्यानंतर एका दिवसाने नवाल्नींचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
दफन विधींसाठी अनेक चर्चेस, अंत्यसंस्काराची तयारी करणारी पार्लर्स आणि इतर व्यावसायिक स्थळांनी त्यांच्या आवारात नवाल्नीसाठी कोणत्याही प्रकारच्या सेवा पुरविणे किंवा त्यासाठी परवानगी देण्यास नकार दिला. “त्यांच्यापैकी काही म्हणतात की जागेचे आधीच बुकींग झाले आहे. जेव्हा आम्ही ‘नवाल्नी’ आडनाव नमूद करतो तेव्हा काहीजण नकार देतात. एका ठिकाणी, आम्हाला सांगण्यात आले की अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्थांना आमच्यासोबत काम करण्यास मनाई आहे,” असे नवाल्नी यांच्या प्रवक्त्या किरा यार्मिश यांनी मंगळवारी सांगितले. “दिवसभर शोध घेऊनही आम्हाला फेअरवेल हॉल सापडला नाही.”
अखेरीस, मॉस्कोच्या आग्नेय भागातील रशियन ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ द आईकॉन ऑफ द मदर ऑफ गॉड सूथ माय सॉरोजने लहान स्वरूपात दफन विधीसाठी परवानगी देण्याचे मान्य केले. अंत्ययात्रेच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. अनेक पोलिस वाहनांनी चर्चकडे जाण्याचे रस्ते रोखून धरले होते. तरीही हजारो नागरिकांनी नवाल्नींना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुतर्फा गर्दी केली होती. नवाल्नींचा मृतदेह ज्या शवागारात ठेवण्यात आला होता त्यांनी तो कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात विलंब लावत असल्याच्या बातम्या त्याआधी प्रसारित झाल्या होत्या.
अंत्ययात्रेच्या एका फोटोनुसार नवाल्नींचा मृतदेह एका उघड्या दफनपेटीमध्ये पांढऱ्या आणि लाल फुलांनी झाकलेला असून त्यांचे आई आणि वडील जवळ बसलेले दिसले. अमेरिकेचे मॉस्कोमधील राजदूत लिन ट्रेसी, फ्रान्सचे राजदूत पियरे लेव्ही आणि जर्मन राजदूत अलेक्झांडर ग्राफ लॅम्ब्सडॉर्फ यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ मुत्सद्दी अंतयात्रेत सहभागी झाले होते.
नवाल्नी यांची पत्नी युलिया हिने आपल्या पतीचा लढा पुढे चालू ठेवण्याचे वचन दिले आहे. ती आणि त्यांची मुले, मुलगी दर्या आणि मुलगा झहकर जर्मनीत असल्याने अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाले नव्हते. मात्र युलियाने Instagram वर एक व्हिडिओ श्रद्धांजली म्हणून पोस्ट केला असून त्यात “26 वर्षांच्या अपार आनंदासाठी” तिने पतीचे आभार मानले आहेत. चर्चच्या पाद्रींनी अंत्यविधी पार पाडले. यावेळी नागरिकांना चर्चमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. नवाल्नी यांची शवपेटी नेली जात असताना, “आम्हाला माफ करा, आम्ही विसरणार नाही” अशा घोषणा लोकांनी दिल्या.
(अनुवाद : आराधना जोशी)