तिबेटी बौद्ध धर्म हा चीनी बौद्ध धर्म नाही: बीजिंगच्या कथनाची पडताळणी

0
तिबेटी बौद्ध धर्म

17व्या शतकातील बौद्ध अध्यात्मिक नेत्याच्या जीवनावर आणि शिकवणीवर आधारित, अरुणाचल प्रदेशात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आणि अलीकडेच तवांगमधील बर्फाच्छादित शिखरावर चढाई केलेल्या गिर्यारोहण पथकाचा खरंच काही संबंध आहे का? याचा आढावा घेऊया.

आंतरराष्ट्रीय परिषद तवांगमध्ये पार पडली, जे सहावे दलाई लामा त्संग्यांग ग्यात्सो यांचे जन्मस्थान आहे. ग्यात्सो केवळ त्यांच्या अध्यात्मिक प्रवचनांसाठीच नव्हे, तर त्यांच्या प्रणयरम्य कविता आणि गाण्यांसाठीही ओळखले जातात, जी आजही तिबेटी समुदायांमध्ये लोकप्रिय आहेत.

अलीकडेच 29,000 फुटांहून अधिक उंचीचे जे शिखर सर करण्यात आले, त्याला ग्यात्सो यांचे नाव देण्यात आले, ज्यामुळे भारत आणि चीन यांच्यात बौद्ध धर्मावरून सुरू असलेल्या संघर्षात आणखी एका घटनेची भर पडली. हे नामकरण आणि ग्यात्सो यांच्याशी निगडीत ही आंतरराष्ट्रीय परिषद, तिबेटवरील चीनच्या प्रचारावर आधारित कथानकाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात.

या परिषदेला उपस्थित असलेले प्रख्यात तिबेटोलॉजिस्ट विजय क्रांती यांनी नमूद केले की, “बौद्ध धर्माचे स्वतःचे आंतरराष्ट्रीय राजकीय आणि राजनैतिक महत्त्व आहे, याची जाणीव अलीकडच्या काही वर्षांत भारत सरकारला होऊ लागली आहे.”

आणखी एक सुप्रसिद्ध तिबेटोलॉजिस्ट क्लॉड आर्पी यांनी यावेळी इशारा दिला की, “चीनी नेते तिबेटी बौद्ध धर्माच्या चिनीकरणाबद्दल उघडपणे बोलतात. याचा अर्थ तिबेटी बौद्ध धर्माचा नालंदेशी निगडीत मूळ आधार पुसून टाकणे आणि त्याऐवजी चीनी बौद्ध धर्म स्थापित करणे, हा त्यांचा उद्देश आहे जे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे.”

चीन तिबेटमधील स्थानांची नावे, विशिष्ट चीनी छटा देत बदलण्याचे उद्दिष्ट ठेवतो, जी जगभरातील तिबेटी लोकांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. हा मुद्दा परिषदेच्या विचारमंथनात येईल अशी अपेक्षा असतानाच, आंतरराष्ट्रीय तिबेट मोहिमेने अलीकडेच एका अहवालात इशारा दिला की, बीजिंग “नवीन युगात तिबेटचे शासन चालवण्याच्या पक्षाच्या धोरणाची पूर्ण अंमलबजावणी करण्यावर अधिक जोर देत आहे. “

तिबेटमधील कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते- ही मौबाओ यांच्या आवाहनानुसार “राजकीय निष्ठा आणि समाजवादी एकात्मता” अनिवार्य आहे. गांसू प्रांतातील लाब्रांग मठाला दिलेल्या भेटीदरम्यान, त्यांनी बीजिंगच्या राजकीय प्राधान्यांशी मठ संस्थांना जोडण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या चौथ्या पूर्ण सत्रात घेतलेल्या निर्णयानुसार, तिबेटने “चीनी राष्ट्रासाठी एक मजबूत समुदायिक भावना निर्माण केली पाहिजे,” तसेच, त्याने “चीनमधील धर्माच्या चीनीकरणाचे”ही पालन केले पाहिजे.

ही विचारसरणी शी जिनपिंग यांच्या धोरणाशी सुसंगत आहे, ज्यानुसार धार्मिक परंपरांनी ‘चीनी वैशिष्ट्यांशी’ जुळवून घेणे गरजेचे आहे. थोडक्यात, धार्मिक संस्था आणि मठांमधील जीवनावर सरकारचे अधिक नियंत्रण असेल. धार्मिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात देशभक्ती, राष्ट्रीय ओळख, चीनच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे कम्युनिस्ट पक्षाने ठरवलेले कथानक याला प्राधान्य दिले जाईल.

शासकीय निवासी शाळांमध्ये मुलांना केवळ मँडरिन भाषेत शिक्षण दिले जाते आणि त्यांना त्यांची मूळ भाषा वापरण्यास मनाई केली जाते, ज्यामुळे लहानपणापासूनच त्यांची मूळ ओळख मिटवून त्यांच्या ध्येयांवर आघात केला जात आहे. चीनने आणखी एक पाऊल पुढे टाकत, पंचन लामा यांना कालचक्र समारंभाचे अध्यक्षस्थान देऊ केले. ही गंभीर बाब आहे, कारण त्यांची नियुक्ती चीनी राज्याने केली आहे आणि त्यांची कोणतीही धार्मिक विश्वासार्हता नाही.

क्रांती यांनी अधोरेखित केले की, “चीनने अशी अनेक पाऊले उचलली आहेत, ज्यामुळे भारत सरकार आणि भारतातील लोक दोन्ही नाराज झाले आहेत आणि या कृतींमुळे अरुणाचल प्रदेशमधील लोकांच्या भावना अधिक दुखावल्या गेल्या आहेत.”

याचा अर्थ असा आहे की, भारताने जर याबाबत योग्यवेळी पावले उचचली नाही, तर तिबेटी बौद्ध धर्म हळूहळू चीनी बौद्ध धर्म बनेल. तिबेटवरील चीनच्या कथानकाला प्रत्युत्तर देण्यासाठी तवांगमधील आंतरराष्ट्रीय परिषदेची इथे मदत होईल. विद्वान आणि भिक्षू अनेक मुद्द्यांवर सखोल चर्चा करतील, त्यांच्या निष्कर्षांना दलाई लामा यांचे मार्गदर्शन असेल, ज्यामुळे त्यांना विश्वासार्हता प्राप्त होईल आणि पुढे जाऊन ते जगभरातील तिबेटी समुदायांपर्यंत हे ज्ञान पोहचवू शकतील.

ही परिषद अरुणाचल प्रदेशात होते आहे, ही बाब फार महत्त्वाची आहे, कारण या राज्याचे “बौद्ध धर्माच्या इतिहासात आणि भारत आणि चीनशी संबंधित मुद्द्यांमध्ये खूप महत्त्व आहे,” असे क्रांती म्हणाले.

आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सहावे दलाई लामा अरुणाचलमध्ये जन्मले होते आणि त्यामुळे भारताशी असलेले त्यांचे ऐतिहासिक नाते उघड आहे. ही परिषद तिबेटवरील चीनची पकड अस्थिर करू शकत नसली, तरी विचारांची निर्मिती करून आणि चीनच्या कक्षेत राहूनही खऱ्या तिबेटी स्वायत्ततेला बळकटी देण्यास मदत करू शकेल.”

मूळ लेखिका- अनुकृती

+ posts
Previous articleश्योक बोगद्याचे उद्घाटन, 5 हजार कोटींच्या 125 सीमावर्ती प्रकल्पांचा शुभारंभ
Next articleअणुऊर्जेवर चालणारे पहिले मालवाहू जहाज बनवण्याची चीनची योजना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here