एआयमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकने आपल्या जगभरातील कार्यालयांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी मलेशियातील असल्याचे कंपनीने शुक्रवारी जाहीर केले. कर्मचाऱ्यांच्या कपातीमागे आशय निर्मितीसाठी एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा कंपनीचा निर्णय असल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनी यापूर्वीच रॉयटर्सला सांगितले होते की मलेशियामध्ये 700 हून अधिक कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. चीनच्या बाईटडान्सच्या मालकीच्या टिकटॉकने नंतर स्पष्ट केले की मलेशियात 700 नाही तर 500पेक्षा कमी कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलणे अधिकृत नसल्यामुळे नाव न छापण्याची विनंती करत स्रोतांनी सांगितले की कपात करण्यात आलेले बहुतांश कर्मचारी कंपनीच्या आशय नियंत्रण कार्याशी निगडीत होते. त्यांना बुधवारी रात्री उशिरा ईमेलद्वारे या कर्मचाऱ्यांना त्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
या संदर्भात रॉयटर्सशी बोलताना टिकटॉकने कर्मचारी कपातीच्या बातमीला दुजोरा दिला. कामात आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या कंपनीच्या व्यापक योजनेचा एक भाग म्हणून जागतिक स्तरावर शेकडो कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता आहे.
वेबसाइटवरील आशयाचा आढावा
वेबसाइटवर पोस्ट केलेल्या आशयाचे पुनरावलोकन करण्यासाठी टिकटॉक स्वयंचलित शोध आणि मानवी बुद्धी अशा दोघांचे मिश्रण वापरते.
कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जागतिक स्तरावर 200 हून अधिक शहरांमध्ये बाईटडान्सचे 1लाख10 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत.
एका सूत्राने सांगितले की, तंत्रज्ञान कंपनी पुढील महिन्यात आणखी कर्मचारी कपात करण्याची योजना आखत आहे कारण आपल्या काही प्रादेशिक कामकाजाचे एकत्रीकरण करण्याचा कंपनीचा विचार आहे.
टिकटॉकच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही हे बदल आशय संयोजनाच्या आमच्या जागतिक परिचालन मॉडेलला आणखी मजबूत करण्याच्या आमच्या सुरू असणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून करत आहोत.”
कार्यक्षमतेसाठी गुंतवणूक
यावर्षी विश्वास आणि सुरक्षितता या दोन गोष्टींसाठी कंपनी जागतिक स्तरावर 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल अशी अपेक्षा आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा 80 टक्के आशय आता स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे काढून टाकण्यात आल्याने कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल, असे प्रवक्त्याने सांगितले.
गुरुवारी पहिल्यांदा व्यावसायिक पोर्टल द मलेशियन रिझर्व्हने या कपातीची माहिती प्रसिद्ध केली.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणात नियामक दबावाला सामोरे जावे लागत असल्याने तिथे नोकऱ्यांमध्ये कपात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मलेशियन सरकारने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सोशल मीडिया ऑपरेटर्सना जानेवारीपर्यंत ऑपरेटिंग परवान्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मलेशियामधील सोशल मीडियावर आक्षेपार्ह आशयात मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आणि टिकटॉकसह इतरही कंपन्यांनाही त्यांच्या प्लॅटफॉर्मकडे लक्ष वाढवावे असे आवाहन केले गेले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)