चीनमधील ग्वांगझोऊला चक्रीवादळाचा फटका, पाचजणांचा मृत्यू, 33 जखमी

0
सौजन्य - रॉयटर्स

दक्षिण चीनमधील ग्वांगझोऊ येथे आलेल्या चक्रीवादळात पाचजणांचा मृत्यू झाला असून 33जण जखमी झाले. चीनच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे. हाँगकाँगपासून सुमारे 80 मैल (130 किलोमीटर) अंतरावर असलेले ग्वांगझोऊ शहर ग्वांगडोंग प्रांताची राजधानी आहे.

1 कोटी 90 लाख लोकसंख्या असलेल्या ग्वांगझोऊ शहराला 3 स्तराच्या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पाचवा स्तर हा सर्वाधिक धोकादायक म्हणून ओळखला जातो. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या चक्रीवादळामुळे 141 कारखान्याच्या इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र निवासी इमारतींचे नुकसान झाल्याचे अद्याप कोणतेही वृत्त नाही.

बायुन जिल्ह्यातील लियांगटियन गावातील हवामान केंद्रामध्ये वाऱ्याचा कमाल वेग प्रति सेकंद 20.60 मीटर इतक नोंदवला गेला. स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजेपर्यंत बचाव आणि मदतकार्य पूर्ण झाले. चक्रीवादळाआधी दक्षिण चीनमध्ये अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे. बचाव कार्य सुरू असून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्वांगडोंग प्रांतात पुरामुळे 11लाख 10 हजारपेक्षा जास्त लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ग्वांगडोंगमधील पुरामुळे किमान चारजणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

16 एप्रिलपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चीनचे उत्पादन केंद्र आणि देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रदेशांपैकी एक असलेल्या पर्ल रिव्हर डेल्टाला मोठा फटका बसला असून ग्वांगडोंगमधील चार हवामान केंद्रांनी एप्रिलमध्ये विक्रमी पावसाची नोंद केली आहे. पर्ल नदीच्या खोऱ्यात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक पूर येतो, परंतु अलिकडच्या वर्षांत या प्रदेशाला अधिक तीव्र वादळांचा आणि पुराचा सामना करावा लागला आहे. हवामान बदलामुळे येत्या काही काळात ही वादळे अधिकाधिक तीव्र स्वरूपाची होतील तसेच त्यांची वारंवारता वाढेल असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

अमेरिकेत जितक्या प्रमाणात वारंवार चक्रीवादळे येतात तशी ती चीनमध्ये येत नाहीत. चीनमध्ये दरवर्षी सरासरी 100 पेक्षा कमी चक्रीवादळे येतात आणि 1961 पासून 50 वर्षांत देशात चक्रीवादळामुळे किमान 1,772 लोकांचा मृत्यू झाला आहे असे निरीक्षण 2015 मध्ये केलेल्या एका अभ्यासावर आधारित वैज्ञानिक लेखात नोंदवण्यात आले आहे.

या महिन्याच्या अखेरीपर्यंत जोरदार वादळांसह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा चीनच्या हवामान संस्थेने दिला आहे.

आराधना जोशी
(सीएनएनच्या बातमीवर आधारित)


Spread the love
Previous articleAbbas, International Leaders Will Hold Gaza Peace Talks In Riyadh This Week
Next articleलाल समुद्रात हुतींचा तेल टॅंकरवर हल्ला, अमेरिकेचे ड्रोनही पाडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here