दुबईत बरसला दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर

0
दुबई, संयुक्त अरब अमिराती, 16 एप्रिल 2024 मध्ये वादळी पावसात साचलेल्या पाण्यातून कार चालवताना. (रॉयटर्स/अब्देल हादी रामाही)

वाळवंटात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा काय होते याचा जरा अंदाज करा! संयुक्त अरब अमिरातीमधील अधिकाऱ्यांना याचा पुरेपूर अनुभव आला आहे. एका दिवसापेक्षा कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले, गाड्या रस्त्यांवर अडकल्या आणि पूर सदृश परिस्थिती पाहून लोक आश्चर्यचकित झाले. राष्ट्रीय हवामान केंद्राने मंगळवारी अल ऐनमध्ये 254 मि. मी. इतका विक्रमी पाऊस झाल्याची नोंद केली. 1949 मध्ये पवसासंबंधीची माहिती गोळा करण्यास सुरूवात झाल्यापासून देशात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, अनेक मेट्रो स्थानकं, मॉल्स, रस्ते, व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, दुबईत ठिकठिकाणी पाणी साचलं असून त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अनेकजण ही मुंबई नसून दुबई आहेत अशा शब्दांत या पूराचं वर्णन करत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या २४ तासांत १६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांमध्ये मिळून या भागात इतका पाऊस होतो. दोन वर्षांत जितका पाऊस होतो तितका पाऊस एकाच दिवसांत झाल्यामुळे दुबईतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

प्रवाशांनी थेट विमानतळावर येण्याचे टाळा. आपल्या विमान उड्डाणाची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी थेट वाहकांबरोबर चर्चा करा असा सल्ला देण्यात आला होता. “अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत शक्य तितक्या लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत”, असे विमानतळ प्राधिकरणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे.

दरम्यान, एमिरेट्सने आश्वासन दिले की पूरामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी योग्य ती मदत सुरूच राहील. अर्थात प्रस्थान आणि आगमन या दोन्हीमध्ये विलंब होणे अपेक्षित आहे. विमानतळाच्या वेबसाइटवर अनेक उड्डाणे लांबणीवर पडल्याचे दाखवले आहे.

दुर्दैवाने, देशाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या रास अल खैमाह येथे मंगळवारी सकाळी अचानक आलेल्या पुरात 70 वर्षीय एका वृद्ध व्यक्तीचे वाहन वाहून गेल्याने मृत्यू झाला. यूएईच्या शेजारील देश बहरीन, कतार आणि सौदी अरेबियामध्येही जोरदार पाऊस झाला आहे. ओमानमध्ये अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 शाळकरी मुलांचा समावेश आहे.

बुधवारी आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा टाइम्स ऑफ ओमानने दिला आहे. दुबईमध्ये सध्या आकाश निरभ्र असून, वादळानंतर काही रस्ते पूर्णपणे निर्जन पडले आहेत. सरकारने आपले कर्मचारी आणि शाळांसाठी दुसऱ्या दिवशी ऑनलाइन काम करणे अनिवार्य केले आहे.

पुरामुळे वाहून गेलेले रस्ते आणि घरे यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानाची छायाचित्रे युएईमधील मीडिया आणि समाजमाध्यमांवर झळकली. मंगळवारी व्हायरल झालेल्या अनेक पोस्टमध्ये रस्ते आणि कार पार्किंगचे तलावात रूपांतर झाल्याचे बघायला मिळाले. काही वाहने पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेख झायेद रोडसारख्या प्रमुख महामार्गांनाही पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे वाहतुक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

आकांक्षा एस
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleIndia Deploys Liaison Officers To Key US Commands
Next articleदुबईच्या पूराला क्लाउड सीडिंग जबाबदार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here