थायलंडमध्ये क्रेन कोसळल्याने झालेल्या रेल्वे अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू

0
25

उत्तर-पूर्व थायलंडमध्ये बुधवारी एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात किमान 25 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 80 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुळांवर काम करणारी एक बांधकाम क्रेन तीन डब्यांवर कोसळल्याने हा अपघात झाला.

नाखोन रात्चासिमा येथे क्रेन कोसळली

ही दुर्घटना बुधवारी सकाळी बँकॉकपासून सुमारे 230 किलोमीटर ईशान्येस असलेल्या नाखोन रात्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात घडली. ही ट्रेन राजधानीतून उबोन रात्चाथानी प्रांताकडे जात असताना क्रेन कोसळली, ज्याखाली अनेक डबे चिरडले गेले आणि काही काळ आग लागली.

पोलिस कर्नल थत्चापोन चिन्नवाँग यांनी बचावकार्य सुरू असल्याची पुष्टी केली. त्यांनी रॉयटर्सला फोनवर सांगितले की, “मृतांचा सध्याचा आकडा 25 वर पोहोचला आहे. आणखी मृतदेहांचा शोध सुरू आहे.”

चौकशीचे आदेश

थायलंडचे परिवहन मंत्री फिफात रचकितप्रकर्ण यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये 195 प्रवासी होते. एका निवेदनाद्वारे त्यांनी अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, क्रेनच्या धडकेने झालेल्या तीन डब्यांपैकी दोन डब्यांमध्ये जीवितहानी झाली.

ही क्रेन एका हाय-स्पीड रेल्वे बांधकाम प्रकल्पाचा भाग होती, दुर्दैवाने ती कोसळली आणि जाणाऱ्या ट्रेनला धडकली, ज्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली. धडकेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली, तरी ढिगाऱ्यातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत होते.

परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये झुडपांच्या बाजूला उलटलेले डबे पडलेले दिसत होते. रॉयटर्सने पडताळणी केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये बचाव पथके अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना दिसत होती, तर इतरांना रुग्णवाहिकांकडे नेण्यात येत  होते.

हाय स्पीड रेल्वे प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात

कोसळलेली क्रेन सध्याच्या रेल्वे मार्गावर बांधल्या जात असलेल्या उन्नत हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या कामात गुंतलेली होती. क्रेनचा काही भाग नवीन मार्गासाठी डिझाइन केलेल्या काँक्रीटच्या खांबांवरच टिकून आहे. हा प्रकल्प थायलंडमध्ये सुरू असलेल्या अनेक प्रमुख पायाभूत सुविधांच्या विकासांपैकी एक आहे आणि याचा उद्देश लाओसमार्गे देशाचे रेल्वे नेटवर्क चीनशी जोडणे हा आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, बीजिंग या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. “चिनी सरकार प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला खूप महत्त्व देते आणि या परिस्थितीची चौकशी करत आहे,” असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, ज्या ठिकाणी अपघात झाला तो रेल्वे मार्गाचा भाग एका थाई कंपनीद्वारे बांधला जात होता.

थायलंडच्या वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, बँकॉक ते नाखोन राचासिमा या विभागापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे आणि लाओस सीमेजवळील नोंग खाईपर्यंतचा संपूर्ण मार्ग 2030 पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleRussia Looks to Latin America as New Pressure Point Against US, Eyes Missile Deployments Near American Shores
Next articleHyderabad-based Sigma Advanced Systems acquires UK precision engineering firm Nasmyth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here