भविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी, लष्कराचा AI कडे वाढता कल

0
AI

भविष्यातील आधुनिक युद्धांचा सामना करण्यासाठी, भारतीय लष्कर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात AI तंत्रज्ञानाचा स्विकार करत आहे. मात्र हे केवळ स्वीकरण नसून, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वदेशी नवोक्रपमांना चालना देणे, डेटा एकत्रीकरण आणि राष्ट्रीय संरक्षण उद्दिष्टांशी जुळवून घेत ऑपरेशनल गरजा पूर्ण करणे, यावर भारतीय लष्कर भर देत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्सचे महासंचालक (DG EME) लेफ्टनंट जनरल राजीव कुमार साहनी, यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मिशनसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली तयार करण्यासाठी मागील 26 वर्षांतील ऐतिहासिक डेटा वापरण्यात आला आहे. या प्रणालींना ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान प्रत्यक्षात वापरण्यात आले, ज्यमध्ये त्यांना कमालीची अचूकता दाखवून दिली.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही आता केवळ AI चा प्रयोग करत नाही आहोत, तर एक पाऊल पुढे जाऊन त्याचा प्रत्यक्षात वापर करत आहोत. आम्ही आमच्या AI प्रणालींमध्ये मागील 26 वर्षांतील गुप्त आणि प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असलेला डेटा समाविष्ट केला आहे. यामुळे आम्हाला ऐतिहासिक संदर्भ प्राप्त होत नाहीत, तर भविष्यातील धोके ओळखून त्यावर जलद आणि अचूक प्रतिक्रिया देण्याची क्षमता देखील मिळते.”

ऑपरेश सिंदूरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अचूक वापर 

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारतीय लष्कराने देशांतर्गत विकसित केलेल्या AI प्रणालींनी निर्णायक भूमिका बजावली. ‘इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स कोलेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस सिस्टम (ECAS) ला’ प्रत्यक्ष कारवाईदरम्यान अद्ययावत करण्यात आले. ही प्रणाली विविध फ्रीक्वेन्सी सिग्नल स्कॅन करून, ते ऐतिहासिक ‘एमिटर डेटाबेस’शी जुळवते आणि अचूकपणे त्याचा स्रोत शोधून काढते.

लेफ्टनंट जनरल साहनी यांनी सांगितले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान, या प्रणालीने समोरून येणारा धोका ओळखून, त्याचे अचूक स्थान दाखवून देण्यात 99.4% अचूकता दाखवली. सीमेजवळ एखादी सिग्नल-उत्सर्जक यंत्रणा (emitter) सक्रिय झाली, की आम्ही ती मागील वीस वर्षांत कुठे आणि केव्हा दिसली होती, हे त्वरित शोधू शकतो, त्याची नेमकी ओळख (signature) समजू शकतो, आणि त्याच्या कार्यपद्धतीचा (pattern) अंदाजही लावू शकतो. ही अचूकता खरोखरच अतुलनीय आहे.”

अन्य उपयुक्त AI प्रणाली:

  • TRINETRA या प्रणालीद्वारे ‘प्रोजेक्ट संजय’ अंतर्गत एकसंध ऑपरेशनल चित्र स्पष्ट होते, ज्यामुळे विविध लष्करी युनिट्समध्ये समन्वय अधिक सुलभ आणि गतिमान होतो.
  • AI तंत्रज्ञानाने सुसज्ज, हवामानाचा अंदाज आणि धोका भाकीत करणाऱ्या प्रणाली या भारतीय हवामान खाते (IMD) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या डेटासह एकत्रित करण्यात आल्या असून, त्या लांब पल्ल्याच्या लष्करी नियोजनासाठी उपयुक्त ठरतात.
  • बॅटलफील्ड सर्व्हेलन्स सिस्टीम (BSS) आणि सेंसर-शूटर इंटिग्रेशन या प्रणालींच्या साहाय्याने, ऑप्टिकल आणि थर्मल अशा दोन्ही प्रकारच्या सेन्सर्सचा वापर करून, आपले लक्ष्य अधिक अचूकपणे आणि वेगाने निश्चित करता येते.

जनरल साहनी म्हणाले की, “या प्रणालींमुळे, लक्ष्य (टार्गेट) शोधणे, त्यासंबधी कारवाईचा निर्णय घेणे आणि प्रत्यक्ष कारवाई करणे या सर्व टप्प्यांमध्ये अधिक सुलभता प्राप्त होते, मानवी अवलंबित्व दूर होते आणि त्यामुळे शत्रूचा नाश करण्याची साखळी (kill chain) सोपी पण अधिक प्रभावी होते.”

चीन आणि पाकिस्तानशी तुलना

भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षमतेची, चीन आणि पाकिस्तानसोबत होत असलेल्या तुलनेविषयी, लेफ्टनंट जनरल साहनी यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.

“आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे, की चीन किती मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञान आणि त्यांच्या डेटा बेसचा वापर करत आहे. त्यांच्या रिअल-टाइम फीड्स पाकिस्तानसोबत शेअर होत असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. परंतु, मी देशवासियांना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की एआयच्या वापरात आपण कुठेही मागे नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “भारतीय लष्कर पूर्णपणे ‘स्वदेशी बनावटीची AI मॉडेल्स’ तयार करत आहे, जी परकीय डेटासेट्स किंवा प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून नाहीत. यामुळे ‘डेटा पॉइझनिंग’ सारखे धोके टाळता येऊ शकतात. अशाप्रकारचे धोके ओपन-सोर्स किंवा बाहेरून विकसित केलेल्या AI प्रणालींमध्ये असू शकतात.”

“आम्ही वापरत असलेली AI मॉडेल्स ही आमच्या स्वतःच्या डेटावर आधारित असून, भारतीय डेव्हलपर्सकडून ती तयार करण्यात आली आहेत, ज्यांना भारतातील एकंदर परिस्थिती- भूभागातील संभाव्य धोके, तणाव इत्यादींचा विचार करून प्रशिक्षित करण्यात आले आहे. यात कुठलाही परकीय पूर्वग्रह नाही, आणि हाच आपला रणनीतिक लाभ आहे.”

कमांडर्स पासून – फ्रंटलाईनपर्यंत वापर

ले. जनरल साहनी यांनी स्पष्ट केले की, “AI आता रणभूमीवर, प्रत्यक्ष वापरात आले आहे. आघाडीवरील कमांडर्स AI-आधारित ‘Change Detection Systems’, ‘ISR tools (Intelligence, Surveillance, Reconnaissance), आणि ‘Decision support systems’ चा वापर करत आहेत, जे मोठ्या प्रमाणात रिअल टाइम डेटा विश्लेषित करतात.

ते म्हणाले की, “पूर्वी गुप्त माहितीचे विश्लेषण करून कारवाई करण्यासाठी अनेक तासांचा कालावधी लागायचा. मात्र, आज AI टूल्स कमांडरला दोन-तीन तासांत किंवा त्यापेक्षाही कमी वेळात झालेले महत्वाचे बदल, जसे की सैन्य एकत्रित करणे, भूभागातील बदल, किंवा अन्य हालचालींचे अचूक विश्लेषण देऊ शकतात. हाच युद्धभूमीतील खरा प्रभाव आहे.

AI संचालित लष्करी आधुनिकीकरण
भारतीय लष्कराचे AI एकत्रीकरण, खालील सहा प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहे:

  1. पायाभूत सुविधा विकास
  2. AI चा युद्धासाठी वापर
  3. मानवी संसाधन कौशल्याचा विकास
  4. प्रशासन आणि धोरण
  5. आत्मनिर्भरतेचा वाढता जोर
  6. डिजीटल इंडिया, इंडिया AI मिशन आणि आत्मनिर्भर भारत, यांसारख्या राष्ट्रीय मोहिमांसोबत समन्वय.

काही प्रमुख उपक्रम:

  • आर्मी AI रिसर्च अँड इनक्युबेशन सेंटर (AARIC), बंगळुरू
  • लवकरच सुरु होणारे Unified AI Platform, जे गुप्तचर, लॉजिस्टिक्स व ऑपरेशनल प्रणालींचे एकत्रीकरण करणे.
  • डिफेन्स AI हबची निर्मिती, ज्यात ArtPark–IISc च्या सहकार्याने, जे AI प्रकल्प व्यवस्थापन, नैतिकता आणि चाचणी यावर लक्ष केंद्रित करेल.
  • विशिष्ट लष्करी उद्दिष्टांसाठी- विशिष्ट भाषांवर आधारित डोमेन मॉडेल्स, ज्यामध्ये पेटंट केलेले Small Language Models (SLMs) आणि एक समर्पित Large Language Model (LLM) तयार केले जात आहे.

ले. जनरल साहनी यांनी सांगितले की, “आम्ही आमचे स्वतःचे लष्करी LLM तयार करत आहोत, जे पूर्णतः देशांतर्गत पातळीवर प्रशिक्षित केले जात आहे. ही मॉडेल्स फक्त डेटा विश्लेषणासाठी नाही, तर Edge computing, Smart decision-making, आणि Mission continuity (सातत्यपूर्ण मिशन ऑपरेशन्स) साठी उपयुक्त असतील, आणि कुठल्याही अडथळ्यांचा सामना करण्यास सक्षम असतील.

AI युद्धभूमीच्या अधिक जवळ 

भविष्यात, भारतीय लष्कर AI चा वापर युद्धभूमीसाठी अधिक जवळून करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. यामध्ये खालील गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल:

  • स्वयंचलित (autonomous) प्रणाली
  • भविष्यवेधी लॉजिस्टिक्स
  • AI तंत्रज्ञानावर आधारित सायबर संरक्षण
  • उपग्रह फीड्सवर आधारित रिअल-टाइम बदलांचे विश्लेषण

साहनी यांनी सांगितले की, “आम्ही ‘Sensor-to-shooter’ ही एक साखळी प्रणाली विकसित करत आहोत, जिथे edge-deployed AI चा वापर करून जलद निर्णय घेता येतात. मात्र, याच मानवी हस्तक्षेप ही आमची मूलभूत गरज तत्वतः राहील.”

“आम्ही AI चा विकास केवळ दिखाव्यासाठी करत नाहीयोत, तर भविष्यातील मॉडर्न युद्धांसाठी त्याचा विकास करत आहोत. लष्कराची ऑपरेशनल सज्जता सातत्याने सुधारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर आणि वाढ करत आहोत. भविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी AI तंत्रज्ञानाला पर्याय नाही, त्यामुळे त्याच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यावर आमचा भर राहील.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleदार्जिलिंगमध्ये निसर्गाचा प्रकोप; भूस्खलनामुळे किमान 20 जणांचा मृत्यू
Next articleअफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीशी भारत करार करेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here