श्वेतवर्णीय निर्वासितांना ट्रम्प चरित्राच्या वाटपाचा प्रस्ताव?

0

अमेरिकेत निर्वासित म्हणून येणाऱ्या श्वेतवर्णीय दक्षिण आफ्रिकन नागरिकांना देण्यात येणाऱ्या वेलकम किटमध्ये मुलांसाठी लिहिण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चरित्र देण्यात यावे असा प्रस्ताव मांडणारा एक ईमेल गेल्या आठवड्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याने पाठवला आहे. हा मेल रॉयटर्सच्या बघण्यात आला आहे.

रॉयटर्सने पाहिलेल्या 8 डिसेंबरच्या अंतर्गत ईमेलनुसार Donald Trump Biography for Kids: An Inspirational Story of One of America’s Most Famous Presidents हे ते पुस्तक असून  फ्रेड कूपर यांनी ते सुचवले होते. कूपर हे ट्रम्प यांनी नियुक्त केलेले अधिकारी असून, ते अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाच्या एका विभागात उप-सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.

8 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी तयार केलेल्या या 89 पानांच्या चरित्रात, रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रित करण्यात आले आहे. त्यानुसार ट्रम्प यांचे जीवन म्हणजे “निश्चितता, लवचिकता, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची एक उत्कृष्ट शिकवण आहे.”

कूपर यांनी वेलकम किटमध्ये अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचेही चरित्र समाविष्ट करण्याची सूचना केली होती. ट्रम्प यांनी जॅक्सन यांची प्रशंसा केली आहे, जे त्यांच्याप्रमाणेच एक लोकवादी नेते होते. मात्र गुलाम बाळगल्याबद्दल आणि मूळ अमेरिकन लोकांना त्यांच्या जमिनीवरून हाकलून दिल्याबद्दल जॅक्सन यांना ऐतिहासिक टीकेला सामोोरे जावे लागले आहे.

“मला वाटते की या पुस्तकांमुळे काही अडचण निर्माण होणार नाही?” असे कूपर यांनी ईमेलमध्ये ट्रम्प आणि जॅक्सन यांच्या चरित्रांची लिंक देत म्हटले. या चरित्रांसाठी अमेरिकन सरकार किती पैसे देणार आहे याचा उल्लेख ईमेलमध्ये केलेला नाही. आरोग्य आणि मानवी सेवा विभाग तसेच कूपर यांनी रॉयटर्सच्या प्रतिक्रियेसाठी केलेल्या विनंत्यांना प्रतिसाद दिला नाही.

जर या वेलकम किट्सना मंजुरी मिळाली, तर त्यामुळे हजारो श्वेतवर्णीय दक्षिण आफ्रिकन लोकांना निर्वासित म्हणून अमेरिकेत आणण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळणार आहे. मात्र या  कार्यक्रमाला दक्षिण आफ्रिकन सरकार आणि निर्वासित गटांकडून तीव्र विरोध झाला आहे.

जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी जगभरातील निर्वासितांच्या प्रवेशावर बंदी घातली होती, परंतु काही आठवड्यांनंतर त्यांनी बहुसंख्य कृष्णवर्णीय असलेल्या दक्षिण आफ्रिकेतून युरोपीय वंशाच्या आफ्रिकन लोकांना आणण्याचा प्रयत्न सुरू केला. ट्रम्प यांनी म्हटले आहे की हे लोक वंश-आधारित हिंसाचार आणि भेदभावाचे बळी आहेत, परंतु दक्षिण आफ्रिकन सरकारने हे दावे जोरदारपणे फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेच्या निर्वासित कार्यक्रमावर काम करण्यासाठी करार केलेल्या केनियन नागरिकांना आपण देशाबाहेर काढणार आहोत कारण ते अयोग्य व्हिसा वापरत आहेत असा खुलासा  बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी केला.

याआधी आलेल्या निर्वासितांना अमेरिकेचा इतिहास आणि संस्कृती स्पष्ट करणारी सामुग्री देण्यात आली आहे, मात्र त्यात सामान्यतः विशिष्ट अध्यक्षांचा किंवा विचारसरणीचा प्रचार केलेला नव्हता, असे तीन अनुभवी निर्वासित कार्यकर्त्यांनी सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज  

+ posts
Previous articleबांगलादेश: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतविरोधी भावनांमध्ये वाढ
Next articleभारताचा आखाती प्रदेशातील सामरिक प्रभाव वाढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here