जर निवडणुकीत पराभव झाला तर त्याला अंशत: ज्यू कारणीभूत – ट्रम्प

0
जर

जर 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत आपण उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत झालो त्यासाठी काही प्रमाणात ज्यू-अमेरिकन मतदार कारणीभूत असतील असे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले.
वॉशिंग्टन येथे झालेल्या इस्रायली-अमेरिकन कौन्सिलच्या राष्ट्रीय शिखर परिषदेला संबोधित करताना, माजी राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन ज्यू लोकांनी आपल्यापेक्षा हॅरिस यांना पाठिंबा दिल्याचे दुःख व्यक्त केले.
हॅरिस निवडणूक जिंकल्या तर दोन वर्षांत इस्रायलचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यांच्या मते त्या निकालासाठी ज्यू अंशतः दोषी असतील कारण ते डेमोक्रॅट्सना मतदान करत असतात.
“जर मी ही निवडणूक जिंकली नाही-आणि जर असे घडले तर यहुदी लोकांना खरोखरच बरेच काही गमवावे लागेल कारण जर 60 टक्के लोक शत्रूला मतदान करत असतील-तर माझ्या मते, इस्रायलचे अस्तित्व दोन वर्षांत संपुष्टात येईल,” असे ट्रम्प यांनी उपस्थितांना सांगितले.
मतदारांची विभागणी
हॅरिस यांना 60 टक्के अमेरिकन ज्यू नागरिकांनी मतदान केल्याचे ट्रम्प यांनी एका मतदानाचा हवाला देत सांगितले. 2016च्या निवडणुकीत त्यांना अमेरिकन ज्यू नागरिकांची 30 टक्क्यांपेक्षाही कमी मते मिळाली होती आणि 2020च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पराभूत झाल्याबद्दलही त्यांनी दुःख व्यक्त केले.
माजी राष्ट्राध्यक्ष कोणत्या मतदानाचा हवाला देत होते हे स्पष्ट झाले नसले तरी अलीकडील प्यू संशोधन सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 65 टक्के अमेरिकन ज्यू हॅरिस यांना  तर 34 टक्के ट्रम्प यांना पसंती देतात.
अमेरिकेतील ज्यूविरोधी कारवायांविरुद्ध लढण्यासाठी समर्पित असलेल्या आणि वॉशिंग्टन येथेच संध्याकाळी झालेल्या एका वेगळ्या शिखर परिषदेतही ट्रम्प यांनी अशीच टिप्पणी केली.
ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेने प्रमुख मतदारसंघ असलेल्या राज्यांमध्ये ज्यू मतदारांकडून मते मिळवण्याला प्राधान्य दिले आहे. अमेरिकन ज्यू लोकांनी अनेक दशकांपासून फेडरल निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे आणि ते अजूनही करत असतात. मात्र ज्यू मतांमधील फक्त एक लहान बदल नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवड निश्चित करू शकतो.
निवडणुकीची रणधुमाळी
उदाहरणच द्यायचं झालं तर पेनसिल्व्हेनियाच्या निर्णायक मतदारसंघात, 4लाखांहून अधिक ज्यू नागरिक आहेत. या राज्यात 2020 मध्ये 81हजार मतांनी बायडेन यांना विजय मिळाला होता.
आपल्या भाषणापूर्वीच्या निवेदनात, हॅरिस यांच्या मोहिमेचे प्रवक्ते मॉर्गन फिंकेलस्टीन यांनी ट्रम्प यांचे काही ज्यूविरोधी लोकांशी संबंध असल्याबद्दल टीका केली. ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुरुवारी आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की त्यांचा एक जावई ज्यू आहे.
आपल्या भाषणात ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनातील रिपब्लिकन गव्हर्नरपदाचे उमेदवार मार्क रॉबिन्सन यांच्या संदर्भात आदल्या दिवशी प्रकाशित झालेल्या सीएनएनच्या वृत्ताबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्या वृत्तात असा आरोप करण्यात आला होता की रॉबिन्सन यांनी एकदा एका संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या टिप्पण्यांमध्ये स्वतःला “काळा नाझी!” म्हटले आणि त्यांनी गुलामगिरी परत यावी याचे समर्थन केले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleश्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला
Next articleBiden, ‘Quad’ Leaders To Discuss Maritime Security With Growing China Tensions

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here