इराणमध्ये इंटरनेट सुरू करण्याबाबत ट्रम्प-मस्क यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

0
इराणमध्ये

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की, इराणमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा करण्याबाबत ते अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याशी चर्चा करण्याची योजना आखत आहेत. इराणमधील सरकारविरोधी आंदोलने तीव्र होत असताना, तेथील अधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून देशभरातील इंटरनेट सेवा खंडित केली आहे.

जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, ते याप्रकरणी मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ (SpaceX) कंपनीची मदत घेणार का, जी कंपनी ‘स्टारलिंक’ ही उपग्रह इंटरनेट सेवा पुरवते (ज्याचा वापर यापूर्वी इराणमध्ये करण्यात आला आहे), तेव्हा ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, “मस्क अशाप्रकारचे मुद्दे हातळण्यामध्ये खूप निष्णात आहे, त्याची कंपनीही नावाजलेली आहे.” दरम्यान, मस्क आणि स्पेसएक्स यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गुरुवारी सुरू झालेल्या, इंटरनेट ब्लॅकआऊटमुळे इराणी नागरिकांचा बाह्य जगाशी संपर्क अत्यंत मर्यादित झाला आहे. सध्या सुरू असलेले आंदोलन हे, 2022 मध्ये महसा अमिनी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात उसळलेल्या आंदोलनानंतरचे, सर्वात मोठे जनांदोलन मानले जात आहे.

ट्रम्प आणि मस्क संबंधात सुधारणा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानामुळे, सार्वजनिक वादानंतर आता मस्क आणि त्यांच्यातील संबंध सुधारत असल्याचे संकेत मिळतात. मस्क यांनी ट्रम्प यांच्या आधीच्या अध्यक्षीय प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला होता आणि प्रशासनाच्या सरकारी पुनर्रचना योजनांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्यावर्षी मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रमुख कर कायद्याला विरोध केल्यावर त्यांच्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता, परंतु अलीकडे होत असलेल्या त्यांच्या सार्वजनिक भेटींमधून पुन्हा एकदा संबंधांमध्ये सलोखा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये हे दोघे एकत्र जेवण करताना दिसले होते. त्यांच्यातील सुधारत असलेल्या संबंधांचे आणखी एक उदाहरण म्हणजे, संरक्षण सचिव पीट हेगसेथ सोमवारी टेक्सासमधील मस्क यांच्या स्पेसएक्स सुविधेला भेट देणार आहेत.

मस्क यांनी यापूर्वी, इराणमधील सरकारी सेन्सॉरशिप टाळण्यासाठी तिथल्या लोकांना स्टारलिंक सेवा उपलब्ध करून देण्याला मान्यता दिली होती. 2022 च्या निदर्शनांदरम्यान, इंटरनेट सेवेवरील निर्बंधांनंतर सुरक्षित संवाद साधनांची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार, बायडन प्रशासनाने इराणमध्ये मर्यादित स्टारलिंक कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी मस्क यांच्यासोबत काम केले होते.

इंटरनेट बंदी आणि मानवाधिकारांविषयी चिंता

इराणमधील सध्याची निदर्शने, 28 डिसेंबर रोजी वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन सुरू झाली आणि झपाट्याने त्याचे रूपांतर, 1979 च्या इस्लामिक क्रांतीपासून सत्तेत असलेल्या धर्मगुरुंच्या नेतृत्वाविरुद्धच्या आंदोलनात झाले. मानवाधिकार संघटनांच्या अंदाजानुसार, त्यानंतर झालेल्या कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत.

अमेरिकेतील ‘ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी’ (HRANA) ने, 490 आंदोलक आणि 48 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तर अवघ्या दोन आठवड्यांत 10,600 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. इराणी अधिकाऱ्यांनी अधिकृत मृतांची आकडेवारी जाहीर केली नसून, रॉयटर्सही या आकडेवारीची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकलेले नाही.

युद्धजन्य प्रदेशांतील स्टारलिंकची भूमिका

स्टारलिंकचे कमी कक्षेतील उपग्रहांचे जाळे, युक्रेनसह अनेक संघर्षग्रस्त आणि संकटग्रस्त क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात आले आहे, जिथे रशियाच्या आक्रमणानंतर त्यांनी महत्त्वपूर्ण इंटरनेट सुविधा पुरवली होती. तथापि, रशिया-युक्रेन संघर्षाची तीव्रता वाढण्याच्या चिंतेमुळे ठराविक युक्रेनियन लष्करी कारवायांदरम्यान ही सेवा मर्यादित केल्याबद्दल, मस्क यांच्यावर टीकाही झाली आहे.

जर इराणमध्ये स्टारलिंक पुन्हा सक्रिय झाले, तर ते बंदीमुळे प्रभावित झालेले कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांसाठी संवादाचा महत्वपूर्ण दुवा ठरू शकते. तथापि, या हालचालींमुळे तेहरानचा रोष ओढवण्याची दाट शक्यता आहे, कारण इराण दीर्घकाळापासून आपल्या भूमीवर परकीय तंत्रज्ञानाच्या वापराला विरोध करत आला आहे.

ट्रम्प प्रशासनाने स्पेसएक्ससोबत समन्वय साधण्याची किंवा इराणला तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याच्या निर्बंध चौकटीतून मार्ग काढण्याविषयीची, आपली योजना अद्याप स्पष्ट केलेली नाही. तरीही, अध्यक्षांच्या टिप्पण्यांवरून असे सूचित होते की, मस्क यांच्याशी काही दिवसांतच याबाबत चर्चा सुरू होऊ शकते, ज्यामुळे वॉशिंग्टनकडून इराणमधील असंतोषाला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादात एक नवा राजनैतिक आणि तांत्रिक पैलू जोडला जाण्याची शक्यता आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleढाका JF-17 विमानांबाबत विचाराधीन; भारताला संयम राखण्याचे आवाहन
Next articleनिर्णयक्षमता आणि राष्ट्रीय इच्छाशक्ती हेच भारताच्या भविष्याचा गाभा: डोवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here