अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी मंगळवारी श्रीमंत गुंतवणूकदारांसाठी ‘Gold Card’ Visa ऑफर करण्याचा नवा प्रस्ताव जाहीर केला. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या EB-5 गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रमाला, हा व्हिसा पर्यायी ठरेल.
“ट्रम्प गोल्ड कार्ड,” असे या व्हिसा प्रोग्रामचे नाव असून, हे $5 मिलियन किंमतीवर उपलब्ध होईल, ज्यामुळे मोठ्या गुंतवणुकीच्या बदल्यात अमेरिकेची नागरिकता मिळवण्याचा मार्ग खुला होईल.
ओव्हल कार्यालयातून बोलताना ट्रम्प यांनी नमूद केले की, “हा नवीन व्हिसा कार्यक्रम यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींना नक्कीच आकर्षित करेल, जे केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकच करणार नाहीत, तर देशाचा कर सुद्धा भरतील आणि रोजगार निर्मितीला देखील हातभार लावतील.” ‘या कार्यक्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, ज्याचा फायदा व्यवसाय आणि कर्मचारी वर्ग दोघांना होईल,’ असेही ते म्हणाले.
“जे लोक श्रीमंत आहेत, यशस्वी आहेत, जे खूप पैसे खर्च करु शकतात, कर भरू शकतात आणि लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतात, ते हा प्रोग्राम यशस्वी करतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
EB-5 प्रोग्राम प्रभावी नाही?
वाणिज्य सचिव- हॉवर्ड लुटनिक यांनी या प्रस्तावाविषयी बोलताना सांगितले की, “ट्रम्प गोल्ड कार्ड” विद्यमान EB-5 व्हिसाची जागा घेईल, जो गेल्या 35 वर्षांपासून कार्यरत आहे.”
ते म्हणाले की, “काँग्रेसने 1990 मध्ये EB-5 कार्यक्रम तयार केला होता, ज्यांनी 10 किंवा अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या यूएस व्यवसायांमध्ये, किमान $1 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्यांना ग्रीन कार्ड देऊन परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले होते. मात्र EB-5 प्रोग्राम फसवणूक आणि अकार्यक्षमतेने ग्रस्त असल्यामुळे, त्याचे निराकरण करण्यासाठी नवीन गोल्ड कार्ड व्हिसा आणण्याचे ट्रम्प यांचे उद्दिष्ट आहे.”
“गोल्ड कार्ड व्हिसासाठी गुंतवणूकदारांसाठी प्रवेशाची किंमत वाढवून, उच्च गुंतवणूक थ्रेशोल्ड देखील आवश्यक असेल. EB-5 व्हिसाप्रमाणे, हा व्हिसा गुंतवणूकदाराला कायमस्वरुपी कायदेशीर निवासस्थान देऊ करेल आणि नागरिकत्वाचा मार्ग खुला करुन देईल,” असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या श्रीमंतांकडून अपेक्षा
ट्रम्प यांनी या नवीन व्हिसा कार्यक्रमाअंतर्गत, रोजगार निर्मितीच्या अटी कशा हाताळल्या जातील याबाबत सखोल माहिती दिली नाही, मात्र त्यांनी सूचित केले की “यामुळे आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण फायदे होऊ शकतात, ज्यात राष्ट्रीय कर्ज कमी करण्यासारखे अनेक मुद्दे समाविष्ट आहेत.” यावेळी ट्रम्प यांनी अंदाज वर्तवला की, केंद्र सरकार 10 मिलियन गोल्ड कार्ड विकून मोठ्या प्रमाणावर महसूल उभा करू शकते.
‘गोल्ड कार्ड’ श्रीमंत, यशस्वी आणि बुद्धीजीवी व्यक्तींना दिले जाईल आणि विविध कंपन्यांना या कार्यक्रमासाठी अर्जदारांची नावे सुचवण्याची मुभा असेल. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “यामुळे व्यवसाय-उद्योगांमध्ये कुशल लोकांची भरती करण्याची संधी मिळेल आणि गुंतवणूकदार व त्यांच्या कुटुंबांसाठी दीर्घकालीन निवास स्थिती सुरक्षित होईल.” त्यांनी यावेळी असेही नमूद केले की, “EB-5 च्या तुलनेत, गोल्ड कार्ड लागू करण्यासाठी काँग्रेसच्या परवानगीची आवश्यकता नाही, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होईल.”
डेटानुसार, जागतिक स्तरावर गुंतवणूकदार व्हिसा सामान्य आहेत आणि १०० हून अधिक देश असे समान प्रोग्राम पुरवतात. ज्यामध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, स्पेन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
ट्रम्प याचा प्रस्ताव जर प्रत्यतक्षात उतरवला गेला तर, गुंतवणूकदार इमिग्रेशनच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणू शकतील, जे सध्याच्या प्रणालीसाठी अधिक महाग मात्र सोपा पर्याय उपलब्ध करतील.
2022 च्या स्थितीनुसार, सुमारे 8 हजार लोकांना EB-5 व्हिसा प्रदान करण्यात आले होते, परंतु फसवणूक आणि कार्यक्रमाच्या कार्यक्षमतेबद्दल चिंता निर्माण झाल्यामुळे, त्यात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे गोल्ड कार्ड जर यशस्वी ठरले, तर उच्चभ्रू लोकांसाठी अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणात ते नवीन युगाची सुरुवात दर्शवू शकते.
टीम स्ट्रॅटन्यूज