शीं सोबतच्या परिषदेची शक्यता ट्रम्प यांनी फेटाळली, पण चीन दौरा करणार

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी शिखर परिषदेचा आपण विचारही करत नाही, परंतु शी यांच्या निमंत्रणावरून आपण चीनला भेट देऊ शकतो असा खुलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला. मात्र हा दौरा नक्की कधी होईल याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

“मी चीनला जाऊ शकतो, पण ते फक्त राष्ट्राध्यक्ष शी यांच्या निमंत्रणावरूनच होईल, जो सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. अन्यथा, मला काही रस नाही!,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सांगितले.

ट्रम्प आणि शी यांच्या सहाय्यकांनी या वर्षाच्या अखेरीस अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आशिया दौऱ्यादरम्यान नेत्यांमधील संभाव्य बैठकीबद्दल चर्चा केली आहे, असे सूत्रांनी यापूर्वी रॉयटर्सला सांगितले होते.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाय, या दौऱ्यात हे  दोन्ही नेते  पहिल्यांदाच आमनेसामने भेट घेतील, तेही अशा वेळी जेव्हा दोनही महासत्तांमधील व्यापार आणि सुरक्षाविषयक तणाव वाढलेला आहे.

बैठकीची योजना अंतिम झालेली नसली तरी दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या वेळी ट्रम्प थांबू शकतात किंवा 30 ऑक्टोबर – 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघांमध्ये चर्चा होऊ शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

नवीन दर आणि निर्यात नियंत्रणे वाढल्याने शी यांच्याशी होणाऱ्या बैठकीच्या कोणत्याही योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

चर्चेचा तिसरा टप्पा

जगातील सर्वोच्च दोन अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धाच्या केंद्रस्थानी असलेल्या दीर्घकालीन आर्थिक विवादांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने, तीन महिन्यांनी युद्धविराम वाढवण्याचा प्रयत्न करत, अमेरिका आणि चिनी आर्थिक अधिकारी सोमवारी स्टॉकहोममध्ये पाच तासांपेक्षा अधिक काळ चर्चेसाठी भेटले.

अमेरिकेचे ट्रेझरी चीफ स्कॉट बेसेंट हे अमेरिकेच्या वाटाघाटी पथकाचा भाग होते जे दुपारी मध्य स्टॉकहोममधील स्वीडिश पंतप्रधानांच्या कार्यालयातील रोसेनबाड येथे पोहोचले. व्हिडिओ फुटेजनुसार चीनचे उपपंतप्रधान हे लाइफेंग देखील कार्यक्रमस्थळी दिसले.

मे आणि जूनमध्ये बीजिंग आणि वॉशिंग्टनने प्राथमिक करार केल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनासोबत दीर्घकालीन कर करार करण्यासाठी चीनला 12 ऑगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या करारामुळे, वाढत्या जशास तसे असणाऱ्या टॅरिफ आणि दुर्मिळ खनिजांच्या कपातीचा अंत होईल.

दोन्ही बाजूंचे वाटाघाटी करणारे रात्री 8 वाजता (18.00 GMT) वाजता कार्यालयाबाहेर पडताना दिसले. मात्र त्यांनी पत्रकारांशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही. मंगळवारी चर्चा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

स्कॉटलंडमध्ये ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत झालेल्या विस्तृत पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी चर्चेचा उल्लेख केला.

“चीनने त्यांचा देश इतरांसाठी अधिक खुला करताना (तिथे असणारे निर्बंध हटविणे) बघायला मला  आवडेल,” असे ट्रम्प म्हणाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePralay, India’s First Quasi-Ballistic Conventional Missile, Test-Fired Successfully
Next articleOp. Sindoor हे ‘न्यू नॉर्मल’- जयशंकर; देशाची दहशतवादविरोधी भूमिका स्पष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here