औपचारिक युद्ध घोषणेशिवाय ड्रग्ज कार्टेल्सविरुद्ध कारवाई सुरूच राहील: ट्रम्प

0

गुरूवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, “लवकरच त्यांचे प्रशासन अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवायांबाबत काँग्रेसला तपशीलवार माहिती देईल.” यावेळी त्यांनी जोर देऊन हेही सांगितले की, “या कारवायांकरिता औपचारिक युद्ध घोषणा करण्याची आवश्यकता नाही.”

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, “त्यांच्या अँटी-ड्रग्ज मोहिमेचा पुढचा टप्पा जमिनीवरील कारवायांवर लक्ष केंद्रित करेल.”

अमेरिकन सैन्य कॅरिबियनमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे, ज्यामध्ये मार्गदर्शित-क्षेपणास्त्र विनाशक प्रणाली, F-35 लढाऊ विमाने, एक आण्विक पाणबुडी आणि हजारो सैनिकांची तैनाती समाविष्ट आहे.

“मला वाटत नाही की, आम्ही युद्धाची औपचारिक घोषणा करण्याची आवश्यकता आहे, कारण आपण फक्त अशा लोकांना टार्गेट करत आहोत, जे आपल्या देशात ड्रग्ज आणत आहेत. आम्ही त्यांचा बंदोबस्त करणार आहोत,” असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संशयित ड्रग्जवाहू जहाजांवर अमेरिकेचे हल्ले

सप्टेंबरच्या सुरुवातीपासून, अमेरिकेने कॅरिबियन आणि पॅसिफिक महासागरात संशयित अमली पदार्थ वाहून नेणाऱ्या जहाजांवर अनेक हल्ले केले आहेत, ज्यात जवळपास 40 लोक मारले गेले आहेत. पेंटागॉनने याविषयी फारशी माहिती दिली नसली तरी, त्यांनी सांगितले आहे की, यापैकी काही हल्ले हे व्हेनेझुएलाजवळच्या जहाजांवर करण्यात आले होते.

ट्रम्प यांनी अलीकडच्या आठवड्यात केलेल्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत सांगितले की, “आता हे अमली पदार्थ जमिनीवरून वाहून नेले जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे, आता पुढची मोहीम जमिनीवरील कारवायांविरुद्ध केली जाईल”

गुरुवारी काराकस येथे, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एका कार्यक्रमात बोलताना इशारा दिला की, “जर अमेरिकेने त्यांच्या देशात हस्तक्षेप केला, तर कामगार वर्ग विरोधात उभा राहील आणि सत्ता पुन्हा मिळेपर्यंत रस्त्यावर सर्वसाधारण बंडखोरीचा संप घोषित केला जाईल, आणि लाखो पुरुष आणि महिला रायफल घेऊन देशभर कूच करतील.”

मिळालेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात कॅरिबियनमध्ये झालेल्या अमेरिकी लष्करी हल्ल्यातून दोन संशयित अमली पदार्थ तस्कर बचावले, ज्यांना अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेवर आणले गेले आणि नंतर त्यांना त्यांच्या मायदेशात म्हणजे कोलंबिया आणि इक्वाडोरला परत पाठवण्यात आले.

गुरुवारी, त्याच कार्यक्रमात ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी, दोन वाचलेल्या तस्कऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी याची तुलना इराक आणि अफगाणिस्तान युद्धादरम्यानच्या रणांगणावरील कार्यपद्धतीशी केली.

हेगसेथ म्हणाले की, “त्या संघर्षांमध्ये, आम्ही रणांगणावर हजारो लोकांना पकडले आणि त्यापैकी 99% लोकांना त्यांच्या मायदेशातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. ते करणे आम्हाला फारसे आवडले नाही, पण तोच मार्ग योग्य वाटला, जो आम्ही इथेही आमलात आणला.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleसंयुक्त राष्ट्रसंघाच्या मतदानापूर्वी, क्यूबा भारताचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात
Next articleIndia-China Border In Sikkim Won’t be Easy To Resolve

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here