
युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांचे पत्र आपल्याला मिळाले असून झेलेन्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या निराकरणासाठी वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी जाहीर केले.
“युक्रेन कायमस्वरूपी शांतता आणण्यासाठी शक्य तितक्या लवकर वाटाघाटीच्या टेबलवर येण्यास तयार आहे. युक्रेनियन नागरिकांपेक्षा इतर कोणालाही या शांततेचं महत्व कळणार नाही,” असे ट्रम्प यांनी मंगळवारी कॉंग्रेसला संबोधित करताना झेलेन्स्की यांच्या पत्राचा हवाला देत म्हटले.
शांततेसाठी रशियाही तयार
झेलेन्स्की यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याबरोबरच, “रशियाबरोबर आपली गंभीर चर्चा सुरू असून, ते शांततेसाठी तयार असल्याचे भक्कम संकेत मिळाले आहेत,” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
“ते सुंदर नसेल का?” असे म्हणताना “हा वेडेपणा थांबवण्याची वेळ आली आहे. हत्या थांबवण्याची वेळ आली आहे. हे निरर्थक युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला युद्धे संपवायची असतील तर तुम्हाला दोन्ही बाजूंशी बोलावे लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसला दिलेल्या भाषणात ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियासाठीच्या त्यांच्या योजनांची अधिक स्पष्ट रूपरेषा सांगणे अपेक्षित होते. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपमधील सर्वात मोठा संघर्ष संपवण्याची त्यांची योजना कशी आहे याबद्दल ट्रम्प यांनी कोणताही अधिक तपशील उघड केला नाही.
खनिज करार
ट्रम्प म्हणाले की युक्रेन अमेरिकेबरोबर खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. युक्रेनच्या संरक्षणासाठी अमेरिकेचा पाठिंबा कायम राखण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण आहे.
चार सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की लष्करी मदतीच्या बदल्यात ट्रम्प प्रशासन आणि युक्रेन या करारावर स्वाक्षरी करण्याची तयारी करत आहेत. अर्थात याआधी झेलेन्स्की या़ंच्याशी झालेल्या वादानंतर ट्रम्प यांनी हा करार स्थगित केला होता. मात्र फॉक्सच्या एका पत्रकाराने एक्सवर टाकलेल्या पोस्टनुसार, मंगळवारी, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, “करारावर स्वाक्षरी करण्याची कोणतीही तयारी सध्या नाही.”
ट्रम्प यांनीही खनिज कराराबद्दल कोणताही अधिक तपशील दिलेला नाही, त्यामुळे त्याचेही भवितव्य अद्याप अस्पष्टच आहे.
संबंध सुधारणार
मंगळवारी पहाटे, झेलेन्स्की यांनी गेल्या आठवड्यात ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या “खेदजनक” वादानंतर अमेरिकेशी संबंध सुधारण्याचे वचन दिले.
झेलेन्स्की म्हणाले की त्यांना “गोष्टी सुदारायच्या आहेत” आणि खनिज करारावर स्वाक्षरी करण्यासाठी “कोणत्याही वेळी आणि कोणत्याही सोयीस्कर स्वरूपात” ते तयार आहेत, जो ते ट्रम्प यांच्याशी ओव्हल ऑफिसच्या वादानंतर वॉशिंग्टनच्या भेटीदरम्यान टेबलवर तसाच ठेवून आले.
ट्रम्प यांनी युक्रेनची लष्करी मदत थांबवल्यानंतर, अमेरिकेचे धोरण वाढवण्यासाठी आणि रशियाबद्दल अधिक सलोख्याची भूमिका स्वीकारण्याच्या त्यांच्या ताज्या कृतीनंतर झेलेन्स्की यांचे हे विधान आले आहे.
“माझी टीम आणि मी कायमस्वरूपी शांतता मिळवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भक्कम नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहोत,” असे झेलेन्स्की यांनी एक्सवरील आपल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात अमेरिकेची लष्करी मदत थांबली असल्याचा उल्लेख नाही.
झेलेन्स्की यांची सलोख्याची मागणी
व्हाईट हाऊसमधील अनपेक्षित वादानंतर युक्रेनकडून कृतज्ञतेवर जोर देणे हा झेलेन्स्की यांच्या वक्तव्याचा स्पष्टपणे उद्देश होता, ज्यावर ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी झेलेन्स्की यांना पुरेशी कृतज्ञता व्यक्त केली नाही म्हणून फटकारले होते.
“युक्रेनला त्याचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी अमेरिकेने जे काही केले आहे त्याला आम्ही खरोखर महत्त्व देतो,” असे झेलेन्स्की यांनी लिहिले आहे. “वॉशिंग्टनमधील आमची बैठक अपेक्षेप्रमाणे झाली नाही. जो प्रकार घडला तो अत्यंत खेदजनक आहे. गोष्टी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे,” असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
झेलेन्स्की यांनी शांतता कराराच्या दिशेने एक मार्ग सुचवला आहे ज्याची सुरुवात कैद्यांची सुटका आणि रशियानेही तसे केले तर हवाई आणि सागरी हल्ले थांबवून होऊ शकते,” असे ते म्हणाले.
“मग आम्हाला पुढील सर्व टप्प्यांमध्ये खूप वेगाने पुढे जायचे आहे आणि एक मजबूत अंतिम करार मान्य करण्यासाठी अमेरिकेबरोबर काम करायचे आहे.”
भू राजकीय बदल
त्याआधी, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्मिहाल म्हणाले की युक्रेनचे सैन्य रशियन सैन्याच्या विरोधात युद्धभूमीवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करू शकते, परंतु कीव अमेरिकेला सहकार्य करत राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
“आम्ही सर्व उपलब्ध मार्गांद्वारे शांततेने अमेरिकेबरोबर काम करत राहू,” असे श्मिहाल म्हणाले. “आमची एकच योजना आहे – जिंकणे आणि टिकून राहणे.”
मॉस्कोमध्ये, क्रेमलिनने सांगितले की युक्रेनची लष्करी मदत अमेरिकेने बंद करून टाकणे हे शांततेच्या दिशेने टाकलेले सर्वोत्तम पाऊल आहे, अर्थात ते ट्रम्प यांच्या या निर्णयाला दुजोरा देण्याची वाट पाहत होते.
अमेरिकन डेमोक्रॅट्सनी ट्रम्प यांनी अचानक आपला रोख रशियाकडे वळल्याबद्दल आरडाओरडा केला आहे, जो वॉशिंग्टनसाठी अनेक वर्षांमधील सर्वात नाट्यमय भू-राजकीय बदल आहे. 1940 च्या दशकापासून अमेरिकेतील दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाखालील सरकारांनी आपला कट्टर शत्रू असलेल्या मॉस्कोपासून युरोपचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)