ट्रम्प यांचा BBC वर मानहानीचा खटला, 10 अब्ज डॉलर्सच्या भरपाईची मागणी

0
BBC

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी, BBC वृत्तसंस्थेवर बदनामीचा खटला दाखल केला. ट्रम्प यांच्या भाषणातील एडिट केलेली एक क्लिप बीबीसीने चालवली, ज्यातून असे भासते आहे की, ट्रम्प यांनीच समर्थकांना यू.एस. कॅपिटलवर (संसद भवनावर) हल्ला करण्याचे निर्देश दिले होते. माध्यमांच्या ‘अन्यायकारक’ कव्हरेजविरुद्ध ट्रम्प यांनी सुरू केलेल्या लढाईला यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, ब्रिटनच्या सार्वजनिक मालकीची वृत्तसंस्था BBC ने, 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या भाषणाचे काही भाग एकत्र जोडून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या पहिल्या भागात ट्रम्प समर्थकांना संसद भवनावर मोर्चा काढायला सांगत असल्याचे दिसते, तर क्लिपच्या दुसऱ्या भागात ट्रम्प “जोरजार लढा द्या’ (fight like hell) असे म्हणत असल्याचे दिसते. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, या भाषणात जिथे त्यांनी शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले होते, तो भाग जाणूनबुजून वगळण्यात आला.

ट्रम्प यांनी त्यांच्या खटल्यात नमूद केले आहे की, BBC ने त्यांची बदनामी करत, फसव्या आणि अन्यायकारक व्यापार पद्धतींना प्रतिबंधित करणाऱ्या फ्लोरिडा कायद्याचे उल्लंघन केले. त्यांनी खटल्यातील या दोनही आरोपांसाठी प्रत्येकी 5 अब्ज डॉलर्स, म्हणजेच एकूण 10 अब्ज डॉलर्सच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

बीबीसीने याप्रकरणी ट्रम्प यांची माफी मागितली असून, त्यांची चूक मान्य केली आहे आणि या एडिटेड क्लिपमुळे, हिंसक कारवाईसाठी मुद्दाम उकसावले गेल्याचा चुकीचा आभास निर्माण होत असल्याचे कबूल केले आहे. परंतु त्यांच्यावर खटला दाखल करण्याकरिता कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी सोमवारी, मियामी फेडरल कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, “बीबीसीने माफी मागूनही, आपल्या गैरकृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप दर्शविलेला नाही किंवा भविष्यात पत्रकारितेतील असे गैरप्रकार टाळण्यासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण संस्थात्मक बदल केलेले नाहीत.”

‘टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांकडून जे अनिवार्य परवाना शुल्क आकारले जाते, त्यातून BBC ला निधी प्राप्त होतो, त्यामुळे ट्रम्प यांना मोठी रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागल्यास ते राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरू शकते,’ असे यूकेच्या वकिलांचे म्हणणे आहे.

ट्रम्प यांच्या कायदेशीर टीमच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “बीबीसीकडे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कव्हरेजमध्ये प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा दीर्घ इतिहास आहे, जो त्यांच्या स्वतःच्या डाव्या विचारसरणीच्या राजकीय अजेंड्यासाठी आहे.”

बीबीसीच्या प्रवक्त्याने सोमवारी रॉयटर्सला सांगितले होते की, “ट्रम्प यांच्या वकिलांशी या मुद्द्याबाबत आमचा पुढे काहीच संपर्क झालेला नाही. आमची भूमिका अजूनही तीच आहे.” खटला दाखल झाल्यानंतर प्रसारकाने टिप्पणीच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

बीबीसीतील राजीनामे

आपल्या 103 वर्षांच्या इतिहासातील, सर्वात मोठ्या संकटांपैकी एका संकटाचा सामना करत असलेल्या बीबीसीने म्हटले आहे की, “हा वादग्रस्त माहितीपट त्यांच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पुन्हा प्रसारित करण्याची त्यांची योजना नाही.”

2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी, बीबीसीच्या “पॅनोरमा” माहितीपट कार्यक्रमात दाखवल्या गेलेल्या क्लिपवरील वादामुळे प्रसारकासाठी जनसंपर्क संकट (public relations crisis) निर्माण झाले, ज्यामुळे त्यांच्या दोन सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे लागले.

ट्रम्प यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की, बीबीसीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेचे आणि आर्थिक स्थितीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

या माहितीपटाची पडताळणी आधीच झाली होती, कारण एका बाह्य मानक सल्लागाराने बीबीसीचा एक मेमो लीक केला होता, ज्यामध्ये हा माहितीपट कसा संपादित करण्यात आला याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. हा मेमो सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या या प्रसारकामध्ये असलेल्या राजकीय पूर्वाग्रहाच्या विस्तृत तपासाचा एक भाग होता.

हा माहितीपट युनायटेड स्टेट्समध्ये प्रसारित झाला नव्हता.

ट्रम्प यांनी यू.एस. मध्ये खटला दाखल केला असावा, कारण ब्रिटनमध्ये बदनामीचे खटले प्रकाशनानंतर एका वर्षाच्या आत दाखल करावे लागतात, आणि “पॅनोरमा”साठी ती मुदत संपली आहे.

ट्रम्प यांचे इतर खटले

अमेरिकेच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या संरक्षणावर मात करण्यासाठी, ट्रम्प यांना हे संपादन असत्य आणि बदनामीकारक होते, केवळ इतकेच सिद्ध करणे पुरेसे नाही, तर बीबीसीने प्रेक्षकांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली किंवा निष्काळजीपणे वर्तन केले हे देखील सिद्ध करावे लागेल.

कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रसारक असा युक्तिवाद करू शकतो की, हा माहितीपट सत्यावर आधारित होता आणि त्यांच्या एडिटींगमुळे कोणताही चुकीचा आभास निर्माण केला नाही. तसेच यामुळे ट्रम्प यांच्या प्रतिष्ठेला कुठल्याही प्रकारचा धक्का बसला नाही, असा दावाही ते करू शकतात.

नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीत पुनरागमन करत विजय मिळवल्यानंतर, ट्रम्प यांनी दाखल केलेल्या खटल्यांप्रकरणी, CBS आणि ABC यांसह इतर माध्यमांनी त्यांच्याशी समझोता केला आहे.

ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल आणि आयोवामधील एका वर्तमानपत्राविरुद्धही खटले दाखल केले आहेत, या सर्वांनीच गैरकृत्य केल्याचे नाकारले आहे.

जानेवारी 2021 मध्ये, यू.एस. कॅपिटलवर झालेल्या हल्ल्याचे उद्दिष्ट; 2020 च्या यू.एस. जो बायडन यांच्या ट्रम्प यांच्यावरच्या विजयाला काँग्रेसकडून प्रमाणित होण्यापासून रोखणे हा होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleराष्ट्राध्यक्ष लुला यांच्या भेटीपूर्वी भारत-ब्राझील सागरी संबंधांना चालना
Next article‘धुरंधर’: पाकिस्तानातील अराजकतेच्या विविध छटा उलगडणारा चित्रपट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here