रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर आपण नाराज असून युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये मॉस्को अडथळा आणत आहे असे वाटत असल्याने आपण रशियाच्या तेल खरेदीदारांवर 25 ते 50 टक्के दुय्यम शुल्क लादणार आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी जाहीर केले.
एनबीसी न्यूजने एका मुलाखतीच्या हवाल्याने सांगितले की, पुतीन यांनी गेल्या आठवड्यात युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वावरील विश्वासार्हतेवर टीका केल्यामुळे ट्रम्प नाराज आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. गेल्या तीन वर्षांच्या युद्धसंघर्षात शस्त्रसंधी संदर्भात दिसून येणाऱ्या उदासीनतेबाबत वाढती निराशा प्रतिबिंबित करणाऱ्या वक्तव्यांमध्ये, ट्रम्प म्हणाले की ते एका महिन्याच्या आत नवीन व्यापारविषयक निर्णय लागू करू शकतात.
“जर रशिया आणि युक्रेनमधील रक्तपात थांबवण्यासाठी करार होऊ शकला नाही आणि जर मला वाटत असेल की यात रशियाची चूक आहे, तर मी तेलावर, रशियातून येणाऱ्या सर्व तेलावर दुय्यम शुल्क लागू करणार आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
“जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर तुम्ही अमेरिकेत व्यवसाय करू शकत नाही, असे ट्रम्प म्हणाले. “सर्व तेलावर 25 टक्के आयात शुल्क, सर्व तेलावर 25 ते 50 टक्के आयात शुल्कदर असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मॉस्कोकडून या वक्तव्यावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. रशियाने अनेक पाश्चिमात्य देशांकडून घालण्यात आलेली बंदी आणि निर्बंधांना “बेकायदेशीर” म्हटले आहे. याशिवाय रशियाबरोबरच्या त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना आर्थिक फायदा घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी हा कट रचल्याचे म्हटले आहे.
फ्लोरिडाच्या पाम बीच येथील आपल्या इस्टेटमध्ये आठवड्याचा शेवट घालवणाऱ्या ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला सांगितले की, ते या आठवड्यात पुतीन यांच्याशी बोलणार आहेत. क्रेमलिनने गेल्या आठवड्यात व्हिडिओ फुटेजमध्ये म्हटले आहे की, अलीकडच्या काही महिन्यांत दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे दोन दूरध्वनी केले आहेत, परंतु त्यांचे यापेक्षा अधिकवेळा दूरध्वनी झाले असावेत.
जानेवारीत पदभार स्वीकारल्यापासून ट्रम्प यांनी युक्रेनमधील ‘पोरकट’ युद्ध संपवण्यावर भर दिला आहे.
झेलेन्स्की यांची सत्ता संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने नवीन निवडणुकांना परवानगी देण्यासाठी युक्रेनमध्ये तात्पुरत्या प्रशासनाची नियुक्ती केली जावी, असे पुतीन यांनी शुक्रवारी सुचवले.
ट्रम्प यांनी स्वतः युक्रेनमध्ये नवीन निवडणुकांचे आवाहन केले आहे आणि झेलेन्स्की यांचा हुकूमशहा म्हणून निषेध केला आहे.
शनिवारी फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी फ्लोरिडाला अचानक दिलेल्या भेटीदरम्यान त्यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर आणि गोल्फ खेळल्यानंतर ट्रम्प यांचे ताजे वक्तव्य प्रसिद्ध झाले.
स्टब यांच्या कार्यालयाने रविवारी सांगितले की त्यांनी ट्रम्प यांना सांगितले की रशिया-युक्रेन युद्धविराम घडवून आणण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे आणि ती 20 एप्रिल असावी असे सुचवले कारण ट्रम्प यांना तोपर्यंत पदभार स्वीकारून तीन महिने झाले असतील.
एकीकडे अमेरिकेचे अधिकारी कीववर एक महत्त्वपूर्ण खनिज करार स्वीकारण्यासाठी स्वतंत्रपणे दबाव आणत आहेत कारण अमेरिका अनेक वर्षांपासून युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांच्या उत्पन्नाची मागणी करत होती. अमेरिकेच्या प्रस्तावाबद्दल अधिक सांगण्यापूर्वी कीवच्या वकिलांना मसुद्याचा आढावा घेणे आवश्यक आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात व्हेनेझुएलामधून तेल किंवा वायू खरेदी करणाऱ्या कोणत्याही देशाकडून अमेरिकेच्या आयातीवर 25 टक्के दुय्यम शुल्क लादले आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांकडून अमेरिकेच्या आयातीविरोधात ते अशीच कारवाई करू शकतात असे त्यांनी रविवारी केलेल्या वक्तव्यांवरून सूचित होते, ज्यामुळे चीन आणि भारताला विशेषत्वाने मोठा फटका बसू शकतो.
ट्रम्प म्हणाले की, पुतीन यांना माहित आहे की मी त्यांच्यावर रागावलो आहे, परंतु “त्यांचे माझ्याशी खूप चांगले संबंध आहेत” आणि “जर त्यांनी योग्य गोष्ट केली तर माझा राग पटकन नाहीसा होतो.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)