व्हेनेझुएलासोबत चर्चा सुरू; ट्रम्प 50 दशलक्ष बॅरल तेल विकण्याच्या तयारीत

0
venezuela-trump-oil
Venezuela and US National Security Strategy

मंगळवारी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या निर्बंधांमुळे अडकून पडलेले तब्बल 50 दशलक्ष बॅरल तेल परिष्कृत करून विकण्याची योजना जाहीर केली. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर वॉशिंग्टन व्हेनेझुएला सरकारसोबत समन्वय साधत असल्याचे हे अन्य संकेत मानले जात आहेत.

वॉशिंग्टन पोस्टने या प्रकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवार सकाळच्या छाप्यानंतर मादुरो न्यूयॉर्कमधील तुरुंगात मादक पदार्थांच्या आरोपांची प्रतिक्षा करत आहेत. या कारवाईत सुमारे 75 लोक मारले गेल्याचा अमेरिकेचा अंदाज आहे.

1989 मध्ये, पनामाचे नेते मॅन्युएल नोरिएगा यांना पकडण्यासाठी केलेल्या आक्रमणांनंतरची कदाचित ही सर्वात नाट्यमय लष्करी कारवाई असावी, ज्याद्वारे अमेरिकेने लॅटिन अमेरिकेत हस्तक्षेप करण्याची आपली तयारी पुन्हा सिद्ध केली आहे. मात्र, अमेरिकेने अद्याप या मोहिमेतील मृतांची अधिकृत संख्या जाहीर केलेली नाही.

काराकास प्रशासनानेही मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही, परंतु लष्कराने आपल्या 23 मृत जवानांची यादी प्रसिद्ध केली आहे. व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मादुरो यांच्या सुरक्षा दलाचा मोठा हिस्सा “निर्दयीपणे” संपवण्यात आला, तर क्युबाने सांगितले की, त्यांचे व्हेनेझुएलातील लष्करी आणि गुप्तचर यंत्रणेचे 32 सदस्य मारले गेले. व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षा डॅल्सी रॉड्रिग्ज यांनी मंगळवारी, या छाप्यात मारल्या गेलेल्या लष्करी सदस्यांसाठी एक आठवड्याचा शोक जाहीर केला.

या कारवाईमुळे रशिया, चीन आणि व्हेनेझुएलाच्या डाव्या मित्रराष्ट्रांनी निषेध व्यक्त केला आहे, तर अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

63 वर्षीय मादुरो यांनी सोमवारी, अमली पदार्थांच्या आरोपांवर आपण निर्दोष असल्याचे सांगितले. मॅनहॅटन कोर्टात पायात बेड्या आणि तुरुंगातील केशरी-तपकिरी रंगाच्या कपड्यांमध्ये उभे असताना त्यांनी आपण “सभ्य माणूस” आणि अजूनही व्हेनेझुएलाचे अध्यक्ष असल्याचे म्हटले.

अमेरिका व्हेनेझुएलाचे तेल ताब्यात घेणार

व्हेनेझुएलाच्या राजकीय भवितव्याबाबत अनिश्चितता कायम असताना, आणि अमेरिका दक्षिण अमेरिकेतील हा देश चालवणार असल्याचा दावा करत असताना, ट्रम्प सध्या रोड्रिग्झ आणि मादुरो सरकारमधील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करताना दिसत आहेत. यामुळे मोठी भूमिका मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या विरोधकांमध्ये निराशा पसरली आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केले की, व्हेनेझुएला 30 ते 50 दशलक्ष बॅरल प्रतिबंधित तेलाची विक्री करेल आणि ते ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांच्याद्वारे त्वरित राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत थेट अमेरिकेला पाठवले जाईल.

“हे तेल त्याच्या बाजार भावाने विकले जाईल आणि त्या पैशांवर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून माझे नियंत्रण असेल, जेणेकरून त्याचा वापर व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या लोकांच्या हितासाठी होईल याची खात्री करता येईल,” असे ट्रम्प म्हणाले. व्हेनेझुएलाच्या तेलाच्या अलीकडील किमतींच्या आधारे, हा व्यवहार 1.9 अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतो.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी, व्हेनेझुएलाचे तेल जप्त करण्यासाठी अद्याप कोणतीही कायदेशीर चौकट आखलेली नाही, तरीही अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या टँकर्सवर इराणी आणि व्हेनेझुएलाच्या तेलाची वाहतूक करण्यासाठी अमेरिकन निर्बंध तोडल्याचा आरोप केला आहे.

ट्रम्प यांनी असेही सुचवले आहे की, एक्सॉन मोबिल (XOM.N) आणि कोनोकोफिलीप्स (COP.N) यांसारख्या तेल क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या फायद्यासाठी, अमेरिका देशाच्या तेल पायाभूत सुविधांच्या पुनरु उभारणीसाठी मदत करेल. माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ, यांनी केलेल्या व्हेनेझुएलाच्या तेल राष्ट्रीयीकरणामुळे या कंपन्या प्रभावित झाल्या होत्या. तसेच तिथे कार्यरत राहिलेल्या शेवरॉन कॉर्प (CVX.N) ला देखील याचा फायदा होईल.

नियोजनाशी परिचित असलेल्या तीन सूत्रांनुसार, अमेरिकेच्या तेल कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हेनेझुएलातील गुंतवणुकीवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी व्हाईट हाऊसला भेट देण्याची शक्यता आहे.

विरोधकांकडून भूमिकेची मागणी

अमेरिका मुख्य मित्रदेश ठरल्यास, व्हेनेझुएला अमेरिकेचा ऊर्जा केंद्र बनेल, कायद्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित होईल, बाजारपेठा खुल्या होतील आणि निर्वासित परत येतील, असे विरोधी नेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना माचाडो यांनी सोमवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

तथापि, सीआयएने ट्रम्प यांना सांगितले आहे की, स्थिरता राखण्यासाठी रॉड्रिग्ज आणि मादुरो सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी सर्वात योग्य पर्याय आहेत, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या मते, ट्रम्प यांनी विरोधी नेत्या मचाडो यांच्याऐवजी रॉड्रिग्ज यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यामागे हे वर्गीकृत मूल्यांकन एक कारण होते.

मचाडो, ज्यांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी व्हेनेझुएलाला परतण्याची इच्छा आहे, त्यांनी सांगितले की रॉड्रिग्ज “मुळीच मवाळ नाहीत” आणि त्या व्हेनेझुएलातील दडपशाहीच्या मुख्य शिल्पकारांपैकी एक होत्या.

“मला वाटते हे स्पष्ट आहे की, युनायटेड स्टेट्सने त्यांना व्हेनेझुएलात लोकशाहीच्या दिशेने पूर्ण संक्रमणाचा मार्ग म्हणून गुन्हेगारी संरचना अधिक विस्कळीत करण्याबाबत काही कृती करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे मचाडो यांनी मंगळवारी सीबीएस न्यूजला दिलेल्या एका स्वतंत्र मुलाखतीत सांगितले.

ट्रम्प प्रशासनाने कट्टर गृहमंत्री डायोस्डाडो कॅबेलो यांना नोटीस दिली आहे की, जोपर्यंत ते रॉड्रिग्ज यांना अमेरिकेच्या मागण्या पूर्ण करण्यास आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करत नाहीत, तोपर्यंत ते त्यांच्या लक्ष्यांच्या यादीत अव्वल असू शकतात, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या तीन लोकांनी सांगितले.

मानवाधिकारांच्या व्यापक उल्लंघनाचा आरोप असलेल्या सुरक्षा दलांवर नियंत्रण ठेवणारे कॅबेलो, हे मादुरो यांच्या अशा काही निष्ठावंतांपैकी एक आहेत, ज्यांच्यावर ट्रम्प यांनी संक्रमण काळात स्थिरता राखण्यासाठी तात्पुरते शासक म्हणून अवलंबून राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रशासनाच्या विचारांशी संलघ्न असलेल्या एका सूत्राने सांगितले. कॅबेलो व्हेनेझुएलाच्या रस्त्यावर सुरक्षा दलांसह गस्त घालत आहेत.

“नेहमी निष्ठावान, कधीही गद्दार नाही. शंका म्हणजे विश्वासघात!…” अशा घोषणा व्हेनेझुएला सरकारने रात्रीच्या वेळी सोशल मीडियावर टाकलेल्या अनेक पोस्टपैकी एका पोस्टमध्ये दिल्या होत्या.

न्यूयॉर्क टाइम्सने अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, अमेरिका व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारवर चीन, रशिया, क्युबा आणि इराणच्या अधिकृत सल्लागारांना देशाबाहेर काढण्यासाठी दबाव आणत आहे. परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सोमवारी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबतच्या वर्गीकृत बैठकीत ट्रम्प प्रशासनाच्या मागण्यांची यादी सादर केली, असे टाइम्सने म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्ताची त्वरित पडताळणी करू शकले नाही.

मादुरो यांना ताब्यात घेतल्यापासून व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करणाऱ्या कोणालाही अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी, कॅराकॅसमधील घटनांचे कव्हरेज करताना 14 प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांना थोड्या काळासाठी ताब्यात घेण्यात आले आणि सोमवारी रात्री, शहराच्या आकाशात गोळीबार करण्यात आला. एका व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अनधिकृत ड्रोन्सना रोखण्यासाठी पोलिसांनी हा गोळीबार केला होता.

“कोणताही संघर्ष झाला नाही; संपूर्ण देश पूर्णपणे शांत आहे,” असे उप-समाचार मंत्री सायमन अरेचिडर यांनी पत्रकारांना सांगितले.

टीम स्ट्र्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleकेल्या गेलेल्या दाव्यांपेक्षा तारिक रहमान खरोखरच अधिक श्रीमंत आहेत का?
Next articleIAF Issues RFIs for Two New Counter-Drone Systems After Operation Sindoor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here