राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी शपथ घेतल्यापासून काँग्रेसमध्ये केलेल्या आपल्या पहिल्या संयुक्त भाषणात त्यांनी 2 एप्रिलपासून भारत आणि चीनसह इतरही देशांवर परस्पर आयातशुल्क लादण्याचे वचन दिले.
“आमच्यावर इतर देशांनी जे काही शुल्क आकारले आहेत, त्यांच्या बदल्यात आम्ही त्यांच्यावर शुल्क आकारू,” असे ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले.
“सरासरी, युरोपियन युनियन, चीन, ब्राझील, भारत आणि इतर असंख्य देश आपल्याकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कापेक्षा खूपच जास्त शुल्क आकारतात. हे अत्यंत अन्यायकारक आहे,” ते म्हणाले.
“भारत आमच्याकडून 100 टक्के शुल्क आकारतो. ही व्यवस्था अमेरिकेसाठी न्याय्य नाही, ती कधीच नव्हती,” असे अलीकडेच भारतीय पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात नरेंद्र मोदी यांची भेट घेणाऱ्या ट्रम्प यांनी सांगितले.
“२ एप्रिलपासून, परस्पर शुल्क लागू होईल आणि ते आमच्यावर, इतर देशांवर जे काही शुल्क आकारतील, आम्ही त्यांच्यावर शुल्क आकारू,” असे ते म्हणाले.
‘मेक अमेरिका अफोर्डेबल अगेन’
अंड्यांच्या किमतीत झालेल्या वाढीसाठी ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, “अंड्यांचे दर नियंत्रणाबाहेर आहेत आणि मी अमेरिकेला पुन्हा परवडतील असे दर आणू असे वचन देतो.”
जानेवारीत पदभार स्वीकारल्यापासून आपण सुमारे 100 कार्यकारी आदेश आणि 400 कार्यकारी कृतींवर स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेचे कर्ज कमी करण्यासाठी गोल्ड कार्ड
ट्रम्प म्हणाले की, त्यांचे प्रशासन ‘गोल्ड कार्ड’ व्हिसा कार्यक्रम सुरू करत आहे, ज्यामुळे प्रतिभावान, मेहनती, रोजगार निर्माण करणाऱ्या लोकांना देशात आणण्यास मदत होईल.
“ते खूप पैसे देणार आहेत आणि त्या पैशाने आम्ही आमचे कर्ज कमी करणार आहोत,” असे त्यांनी आपल्या भाषणात माध्यमांना सांगितले.
गेल्या महिन्यात, डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली ज्याद्वारे श्रीमंत आणि पैसेवाल्या स्थलांतरितांना 50 लाख अमेरिकी डॉलर्स एवढी रक्कम भरून सहजपणे अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याची संधी देईल.
“आम्ही गोल्ड कार्ड्ची विक्री करणार आहोत”, असे ट्रम्प यांनी सीएनएनला सांगितले.
“आमच्याकडे ग्रीन कार्ड आहे. आता हे गोल्ड कार्ड आहे. आम्ही त्या कार्डाची किंमत सुमारे 50 लाख डॉलर ठेवणार आहोत. ते तुम्हाला ग्रीन कार्डचे विशेषाधिकार तर देईलच, शिवाय ते नागरिकत्वही मिळवून देईल. हे कार्ड खरेदी करून श्रीमंत लोक आपल्या देशात येतील,” असे गेल्या वर्षी मतदान जिंकून दुसऱ्यांदा सत्तेत परतलेले ट्रम्प म्हणाले.
अशा कार्डांची विक्री सुमारे दोन आठवड्यांत सुरू होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएस)