शटडाऊन दरम्यान ‘डेमोक्रॅटिक एजन्सी’मधील कपातीवर ट्रम्प यांचे लक्ष

0
सरकारी शटडाऊनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे बजेट संचालक रसेल वॉट यांची भेट घेऊन कोणत्या “डेमोक्रॅट एजन्सीज” कपातीचा सामना करू शकतात यावर चर्चा करण्याची योजना जाहीर केली. त्यांनी हे पाऊल राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या त्यांच्या धोरणाचा एक भाग असल्याचे सांगितले जाते.

“रॅडिकल लेफ्ट डेमोक्रॅट्सनी मला ही अभूतपूर्व संधी दिली यावर माझा विश्वास बसत नाही,” असे ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकाव असलेल्या राज्यांचा फेडरल वाहतूक आणि हरित-ऊर्जा निधी आधीच गोठवला आहे आणि काँग्रेसमधील पक्षपाती मतभेदामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या शटडाऊन दरम्यान आणखी फेडरल कामगारांना काढून टाकण्याची धमकी दिली आहे.

वर्षाच्या अखेरपर्यंत 3 लाख फेडरल कामगारांना कामावरून  काढण्याच्या मार्गावर ट्रम्प आहेत.

ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये प्रोजेक्ट 2025 मध्ये वॉट यांच्या सहभागाचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये रूढीवादी हेरिटेज फाउंडेशनची योजना असून फेडरल सरकारचे आकारमान आमूलाग्र कमी करण्याचे आवाहन त्यात केले जाते.

ट्रम्पच्या प्रशासनाने त्या योजनेचे अनेक मुद्दे आधीच अमलात आणायला सुरुवात केली आहे, जसे की शिक्षण विभाग बरखास्त करणे आणि प्रदूषणाशी लढण्यासाठी सरकारचे अधिकार कमी करणे.

हजारो फेडरल कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या की ट्रम्प हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकतात, परंतु त्यांनी याबाबतचा तपशील दिलेला नाही. असे होऊ नये म्हणून अनेक फेडरल कर्मचारी संघटनांनी खटला दाखल केला आहे, परंतु अशाच प्रकारचे खटले सुरू असताना फेडरल न्यायालयांनी टाळेबंदी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

विनियोग समितीतील सर्वोच्च डेमोक्रॅट सेनेटर पॅटी मरे यांनी ट्रम्प यांना इशारा दिला की अधिक नोकर कपात केल्याने सरकार बंद करणाऱ्या विधिमंडळाची कोंडी संपवण्यास मदत होणार नाही.

“जर राष्ट्राध्यक्षांनी अनेक लोकांना काढून टाकले तर ते त्यांच्या शटडाऊनमुळे नाही – कारण त्यांनी त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलाच आहे,” वॉशिंग्टन राज्यातील मरे यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. “कर्मचारी हे काही वाटाघाटीची साधने नाहीत आणि राष्ट्राध्यक्ष फेडरल कर्मचाऱ्यांना प्याद्यांसारखे वागवत आहेत हे वाईट आहे. धमक्या देणे आणि लोकांना दुखावण्याचा निर्णय घेतल्याने माझे मत जिंकणार नाही.”

1981 पासूनच्या या 15व्या सरकारी शटडाऊनमुळे वैज्ञानिक संशोधन, आर्थिक माहिती अहवाल आणि इतर अनेक उपक्रम स्थगित करण्यात आले आहेत. सामाजिक सुरक्षेसारखे प्रमुख लाभ कार्यक्रम मात्र त्यांची बिले पाठवत राहतील.

काँग्रेसमधील स्टॅण्डऑफमुळे एजन्सीच्या कामकाजासाठी सुमारे 1.70  ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी गोठवण्यात आला आहे, जो वार्षिक फेडरल खर्चाच्या अंदाजे एक चतुर्थांश इतका आहे. उर्वरित बहुतांश रक्कम आरोग्य आणि सेवानिवृत्ती कार्यक्रम आणि वाढत्या 37.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या कर्जावरील व्याजाच्या देयकासाठी जाते.

दोन दशलक्ष कामगारांच्या वेतनाला स्थगिती

सुमारे 20 लाख फेडरल कामगारांचे वेतन स्थगित करण्यात आले आहे, सुमारे 7 लाख 50 हजार कामगारांना काम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  सैन्य आणि सीमा गस्त एजंटांसारख्या इतरांना पगाराशिवाय काम करावे लागणार आहे. 15 ऑक्टोबरपूर्वी – ज्यावेळी पुढील वेतन जारी केले जाणार आहे – तोवर यावर जर तोडगा निघाला नाही तर अनेकांना वैयक्तिक पातळीवर त्रास सहन करावा लागू शकतो.

दीर्घकाळापर्यंत शटडाऊन सुरू राहिले तर हवाई प्रवासात व्यत्यय येऊ शकतो, लाखो अमेरिकन लोकांना देण्यात येणारी अन्न मदत धोक्यात येऊ शकते, निर्यात आणि गृहकर्ज अर्जांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

अर्थात मागील शटडाऊनचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर कायमचा व्यापक परिणाम झाला नाही. 2018 आणि 2019 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, इमिग्रेशनवरील वादामुळे, सर्वात जास्त काळ 35 दिवस शटडाऊन झाले होते.

मंगळवारी मध्यरात्री शटडाऊन सुरू झाले. मात्र तोपर्यंत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन यांचे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून 1 ऑक्टोबरपर्यंत एजन्सी कामकाज सुरू ठेवण्यास परवानगी देणाऱ्या खर्च विधेयकावर एकमत होऊ शकले नाहीत.

डेमोक्रॅट्सचा असा आग्रह आहे की कोणत्याही निधी विधेयकात वर्षाच्या अखेरीस संपणाऱ्या आरोग्य अनुदानांची मुदत वाढवली पाहिजे, तर रिपब्लिकन म्हणतात की दोन्ही मुद्द्यांवर स्वतंत्रपणे काम केले पाहिजे.

शुक्रवारपर्यंत शटडाऊन

कमीत कमी शुक्रवारपर्यंत, जेव्हा सिनेटच्या पुढील बैठकीत या समस्येवर चर्चा होईल, तोपर्यंत शटडाऊन कायम राहील. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात बहुमत आहे परंतु सिनेटच्या नियमांनुसार निधी विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांना किमान सात डेमोक्रॅट्सच्या मतांची आवश्यकता असेल.

दरम्यान, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की ते त्यांच्या विरोधकांना त्यांच्या पसंतीच्या सरकारी कार्यक्रमांना लक्ष्य करून त्यांच्यावर दबाव आणतील. डेमोक्रॅट्सनी म्हटले आहे की हे ओलीस ठेवण्यासारखे आहे जे नियमित अमेरिकन लोकांना कामावरून काढून टाकते आणि फेडरल खर्चावरील काँग्रेसच्या संवैधानिक अधिकाराचे उल्लंघन करते.

काँग्रेसने खर्चाची विधेयके मंजूर करण्याची जबाबदारी सोडून दिल्यास प्रशासन योग्य वाटेल त्याप्रमाणे खर्चाला प्राधान्य देऊ शकते असा युक्तिवाद करून रिपब्लिकन पक्षाने आतापर्यंत याबाबत फारशी चिंता दर्शवलेली नाही.

“जेव्हा काँग्रेस निधी बंद करते आणि निधी संपतो, तेव्हा ती संसाधने कशी खर्च करायची हे ठरवणे हे अमेरिकेचे कमांडर इन चीफ, म्हणजेच राष्ट्राध्यक्ष यांच्यावर अवलंबून असते,” असे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जचे सभापती माइक जॉन्सन यांनी पत्रकारांना सांगितले. “त्यांना सिनेटमधील डेमोक्रॅट्सनी दिलेली ही जबाबदारी आहे. ते त्याबद्दल तक्रार करू शकत नाहीत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleगाझा शहराकडे जाणारा मुख्य रस्ता सील, इस्रायलचा अंतिम निर्वासन इशारा
Next articleट्विटर भागभांडवलाचा एसईसी खटला टेक्सासमध्ये हलवण्यात मस्क अपयशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here